सायली ऑफिसमधून घरी आली, तेव्हा घरात अगदी शांतता होती. हॉलमध्ये आदित्य लॅपटॉपवर ऑफिसचं काम करत बसला होता. त्यांची मुलगी आरोही जमिनीवर रंगीत पेन्सिली घेऊन चित्र काढण्यात रमली होती. तिची शाळेची बॅग तशीच सोफ्यावर पडली होती आणि डबाही अजून उघडलेला नव्हता कि तिचा स्कूल युनिफॉर्म बदलला नव्हता.
हे दृश्य पाहताच सायलीच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली मात्र राग व्यक्त न करता ती शांत स्वरात म्हणाली,
"आदित्य, ऑफिसचं काम महत्त्वाचं आहे, हे मला माहीत आहे. पण आरोही शाळेतून आल्यापासून तू अजून तिच्या बॅगेमधला डबा काढलेला नाही, शिवाय तिचे कपडेही बदललेले नाहीत. थोडं तिच्याकडेही लक्ष द्यायला हवं ना?"
तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच आदित्यने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि तिरसटपणे तिला म्हणाला,
"सुरू झालं का पुन्हा? ऑफिसमधून आली की तुला माझ्यातच चुका दिसतात. दिवसभर मी काय करतो, याचा कधी विचार केलास? एक दिवस आरोहीचे कपडे काय बदलायला उशीर झाला म्हणून एवढ काय बिघडलं? "
सायली काही क्षण तशीच उभी राहिली. तिचा हेतू वाद घालण्याचा नव्हता; फक्त आरोहीची काळजी होती. पण आदित्यच्या अश्या शब्दांनी तिच्या मनाला पुन्हा एकदा वेदना झाल्या.
ती काही बोलत नाही हे पाहून आदित्य अजूनच बडबडू लागला...
"आजकाल रोज हेच सुरू असतं तुझं! घरी पाऊल टाकलं की माझ्या चुका काढायला सुरुवात. मला हे आता अजिबात सहन होत नाही." तो चिडून म्हणाला.
तेव्हा मात्र सायलीने स्वतःला शांत ठेवत उत्तर दिलं,
"मी तुझ्या चुका काढत नाहीये, आदित्य. मी फक्त एवढंच म्हणतेय की आरोही अजूनही शाळेच्या कपड्यांत आहे. दुपारपासून तिने काही खाल्लंही नाही. तू थोडंसं तिच्याकडे लक्ष दिलं असतंस तर मला बोलायची वेळच आली नसती."
"मग काय? प्रत्येक गोष्ट मीच करायची का? मीपण दिवसभर ऑफिसमध्ये काम करून आलोय. घरी आल्यावरही मला शांत बसायचा अधिकार नाही का?"
आदित्यचा आवाज आणखी चढला. आता मात्र सायलीने त्यावर काहीच उत्तर दिल नाही. तिने आरोहीला जवळ घेत तिचे कपडे बदलले. तिला दूध दिलं आणि प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवला. बाहेरून ती शांत दिसत होती; पण आतून मात्र तिचं मन तुटलं होत.
तिच्या डोळ्यांसमोर त्यांच्या लग्नाच्या सुरुवातीचे दिवस तरळून गेले. हा तोच आदित्य आहे का जो तिच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घ्यायचा, तिच्या चेहऱ्यावर हास्य आणायचा. आज मात्र त्याच्या शब्दांत प्रेमापेक्षा चिडचिड आणि तिरस्कार जास्त जाणवत होता.
ती विचारातच होती कि तेवढ्यात आरोहीच्या हातून दुधाचा ग्लास खाली पडला. काचेचे तुकडे सगळीकडे विखुरले.
हा आवाज ऐकताच आदित्य संतापाने उठला.
"हेच बाकी होतं! एक मुलगी सुद्धा नीट सांभाळताही येत नाही तुला? दिवसभर करतेस तरी काय?"
तो जोरात ओरडला.
आरोही घाबरून सायलीला बिलगली. तीने तिला कुशीत घेतलं आणि स्वतःच्या डोळ्यांत आलेलं पाणी तिने कसंबसं डोळ्यातच थांबवलं.
"फक्त ग्लास पडला आहे पण त्याहून जास्त आरोही घाबरली आहे, तिला शांत करू दे."
ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली.
आदित्यने काही उत्तर दिलं नाही. रागाने दार आपटत तो बाल्कनीत निघून गेला. घरात पुन्हा एकदा शांतता पसरली... पण ती शांतता मनाला बोचणारी होती.
क्रमश
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
