मागील भागात आपण पाहिलं कि सायलीने आदित्यशी असलेला दुरावा कमी करण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला. तिने राग, वाद आणि तक्रारी बाजूला ठेवून नातं वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र आदित्यचं कोरडं आणि तुटक वागणं काही बदललं नाही.
त्याच्या वागण्यातल्या बदलामागचं कारण शोधण्यासाठी सायलीने त्याच्या कॉलेजमध्ये जाऊन सहकाऱ्यांशी चौकशी केली. तिथे सर्व काही सुरळीत असल्याचं समजलं. घरीही आदित्य नसताना तिने त्याच्या वस्तू तपासल्या, पण कोणताही संशयास्पद पुरावा मिळाला नाही. आता पाहूया पुढे,
घड्याळात सहा वाजले तशी आदित्यची चलबल वाढली इकडे सायली त्याच्या आवडीचा पराठा किचन मधून घेऊन आली.त्याच्या चेहऱ्यावरच मंद हसू पाहून सायलीच्या मनात आशेचा किरण जागा झाला.
ती हसत म्हणाली,
"चल, आज इतक्या दिवसांनी वेळ भेटला आहे तर आपण दोघं थोडा वेळ एकत्र बसूया... चहा आणि पराठे खाता खाता गप्पा पण होतील आधीसारख्या."
आदित्यने घड्याळाकडे पाहिलं आणि ती घाईत म्हणाला,
"नाही....आता नको....मला थोडं काम आहे."
"आत्ता? कसल? कॉलेजचं काम?"
तिने चकित होऊन विचारलं..
"हो... काही नोट्स तयार करायच्या आहेत.. इंटरनेट वर जी माहिती मिळते त्याच्या नोट्स मी स्टुडन्ट्स साठी तयार करतोय... मला तुझ्यापेक्षा उत्तम प्रोफेसर व्हायचं आहे ."
इतकं बोलून तो थेट आपल्या स्टडीरूममध्ये गेला.
सायलीही त्याच्या मागोमाग गेली. दार अर्धवट उघडंच होतं. आत आदित्य लॅपटॉप उघडून बसला होता. स्क्रीनवर कॉलेजचं पोर्टल उघडलेलं होतं. तो काही फाईल्स तपासत होता.
सायली दाराजवळ उभी राहून म्हणाली,
"आदित्य... इतका वेळ काम करतोस. थोडी विश्रांती घे. मी परत कॉफी करून आणते तुझ्यासाठी ."
तुकवर त्याने स्क्रीनवरून नजरही न हटवता उत्तर दिलं,
"नाही नको... मला काम संपवू दे.तू जा तुझी तुझी कामे आवर.."
आता जास्त काही बोलून उपयोग नाही असा विचार करून सायली शांतपणे मागे फिरली.
काही वेळाने ती कॉफीचा कप घेऊन पुन्हा आली. कप टेबलावर ठेवत ती म्हणाली,
"काम संपेपर्यंत कॉफी थंड होईल... सो पिऊन घे "
आदित्यने फक्त मान हलवली. पण त्याचं पूर्ण लक्ष लॅपटॉपवरच होतं.
सायली काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली.
"हा तोच आदित्य.आहे का??.. जो एकेकाळी माझ्यासोबत तासन्तास गप्पा मारायचा. आज त्याच्याकडे माझ्यासाठी दोन मिनिटांचाही वेळ नाही."
पण मनातलं दुःख लपवत ती खोलीबाहेर निघून गेली.
आदित्य मात्र तिच्याकडे न पाहता लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहत बसला होता... पण त्याच्या मनात नेमकं काय सुरू होतं, याचा अंदाज सायलीलाही येत नव्हता. शेवटी ती तिथून निघून गेली आणि आपल्या कामाला लागली.
इकडे रात्र झाली होती तरी आदित्य स्टडीरूममध्येच होता. घरभर शांतता पसरली होती कारण आरोही झोपून गेली होती. सायलीही तिच्या खोलीत पुस्तक हातात घेऊन बसली होती, पण तिचं लक्ष वाचन करण्यावर नव्हतंच.कारण आदित्य कसातरी जेवून पुन्हा लॅपटॉपवरच बसला होता. सायलीला अंदाज येत नव्हता त्याच्या वागण्याचा, तिच्या मनात येऊन देखील गेलं कि मला जास्त पगार आहे म्हणून हयाला असुरक्षित तर नाही ना वाटत??
इकडे स्टडीरूममधून अजूनही कीबोर्डवर टायपिंगचा आवाज येत होता.
रात्री जवळपास अकरा वाजले, तेव्हा आदित्य बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता.
सायलीने लगेच स्वयंपाकघरात जाऊन त्याच्यासाठी गरम दूध आणलं.
"घे... दिवसभर काम केलंस. थोडं बरं वाटेल."
आदित्यने तिच्याकडे पाहिलं. काही क्षण तो गप्प राहिला.
"एवढी काळजी करण्याची गरज नाही... उगाच माझी काळजी असण्याचं नाटक नको.."
तो कोरड्या आवाजात म्हणाला.
सायली फक्त हलकंसं हसली.
"आदित्य एकतर मी नाटक करत नाही आणि दुसरं म्हणजे आपल्या व्यक्तीबद्दल प्रेम असेल तर काळजी आपोआप वाटते, ती ठरवून करण्यासारखी गोष्ट नाही."
हे ऐकून आदित्य क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला, पण पुढच्याच क्षणी त्याने नजर वळवली.
"झोप. खूप उशीर झालाय."
एवढंच बोलून तो बेडरूम मध्ये न जाता पुन्हा ekda आपल्या स्टडीरूम मध्ये निघून गेला.
काय लपवत असेल आदित्य??
