मागील भागात आपण पाहिलं कि, गेल्या काही आठवड्यांपासून सायलीने स्वतःमध्ये खूप बदल घडवून आणला होता. आदित्यचा राग, त्याची तुटक उत्तरं, टोमणे... हे सगळं ती शांतपणे सहन करत होती. त्याच्याशी वाद घालण्याऐवजी त्याला समजून घेण्याचा ती प्रयत्न करत होती. पण तिच्या प्रत्येक प्रयत्नाचं उत्तर तिला फक्त अबोला आणि दुर्लक्ष यातूनच मिळत होतं. आता पाहूया पुढे,
रात्रभर ती एकाच विचारात हरवून जायची.
"मी जर एवढी बदलले आहे... तरीही आदित्य माझ्यापासून एवढा दुरावलेला का आहे?"
कॉलेजमधून आल्यापासून तर ती अजूनच डिस्टर्ब होती, तिला वाटलं होत कॉलेज मध्ये काहीतरी कारण असेल पण तस नव्हतं, त्यामुळे आदित्यच्या वागण्यामागचं कारण शोधण्याचा सायलीने पुन्हा एकदा प्रयत्न केला.
दुसऱ्या दिवशी आदित्य कॉलेजला गेल्यानंतर तिने त्यांच संपूर्ण घर नीट पाहिलं. त्याचं स्टडी टेबल, पुस्तकांचं कपाट, लॅपटॉप बॅग, ड्रॉवर... प्रत्येक गोष्ट तिने काळजीपूर्वक तपासली.
तिला वाटलं होतं, कदाचित एखादं पत्र, रिपोर्ट, कर्जाची कागदपत्रं किंवा असं काहीतरी सापडेल ज्यामुळे त्याच्या बदललेल्या स्वभावाचं कारण समजेल.
पण...सगळं अगदी व्यवस्थित होतं.
तिला ना कोणते संशयास्पद कागदपत्र भेटले , ना कुणाचे मेसेज, ना कोणतं बिल, ना कोणतं रहस्य सापडलं.
तिला ना कोणते संशयास्पद कागदपत्र भेटले , ना कुणाचे मेसेज, ना कोणतं बिल, ना कोणतं रहस्य सापडलं.
तिने आदित्यचं कपाट उघडून पाहिलं, तर त्याचे कपडेही नेहमीप्रमाणे व्यवस्थित ठेवलेले होते. स्टडी टेबलावर फक्त कॉलेजच्या फाईल्स, काही पुस्तकं आणि लॅपटॉपची बॅग एवढंच होतं.
सायलीने एक दीर्घ श्वास घेतला, व स्वतःच्या मनाशीच म्हणाली,
"म्हणजे त्याच्या आयुष्यात अशी कोणतीच गोष्ट नाही...ज्याने तो एवढा चिडचिडा व्हावा... पण मग त्याच्या मनात नेमकं काय चाललंय? का असं वागत असावा तो???"
तिच्या मनातला गोंधळ आणखी वाढला.
तिने हळूच सगळं पूर्वीसारखं जागेवर ठेवलं आणि सोफ्यावर येऊन बसली.
आज पहिल्यांदाच तिला जाणवलं...
"काही प्रश्नांची उत्तरं वस्तूंमध्ये सापडत नाहीत... ती माणसाच्या मनात दडलेली असतात. आणि आदित्यच्या मनापर्यंत पोहोचण्याचा रस्ता अजूनही तिच्यासाठी बंदच होता... लव्ह मॅरेज होऊन सुद्धा मला माझ्या नवऱ्याच्या मनातली गोष्ट कळू नये, ह्यापेक्षा वाईट काहीच नाही..."
ती थोडी हताश तर झाली पण त्या दिवसानंतर सायलीने स्वतःला आणखी बदलण्याचा प्रयत्न केला. आदित्यशी वाद घालणं, त्याच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं, तक्रारी करणं... तिने हळूहळू सगळंच सोडून दिलं. आता ती फक्त घरात शांतता राहावी यासाठी प्रयत्न करत होती.
आरोहीची काळजी तर ती घेतच होती, पण त्याचबरोबर आदित्यच्या प्रत्येक गोष्टीचीही ती न बोलता काळजी घेऊ लागली. त्याला काय आवडतं, काय नको, त्याची वेळ, त्याच्या सवयी... सगळं ती पूर्वीपेक्षा जास्त जपायला लागली.
अश्याच एका संध्याकाळी कॉलेजमधून घरी आल्यावर आदित्यने टेबलावर गरमागरम चहा आणि त्याच्या आवडीचा नाश्ता पाहिला. काही न बोलता तो बसला. सायलीने शांतपणे त्याच्यासमोर कप ठेवला.
सायलीच्या वागण्यातला बदल आदित्यच्या नजरेतून सुटला नव्हता. आधीसारखी ती आता कोणत्याही गोष्टीवर प्रतिवाद करत नव्हती. त्याच्या रागावर ती शांततेने उत्तर द्यायची.
चहाचा घोट घेत तो तिरकासपणे म्हणाला,
"काय गं, आजकाल एवढी शांत कशी? की वाद घालायचा कंटाळा आलाय?कि सूर्य पूर्व दिशा सोडून पश्चिमेकडे उगवला आहे??"
ते ऐकून सायली हलकंसं हसली.
"कंटाळा वादांचा नाही आला... आपल्या नात्यातल्या दुराव्याचा आला आहे... माझ्यासाठी आपलं नातं महत्वाचं आहे, आणि त्यासाठी त्या बिचाऱ्या सूर्याने आपली दिशा का बर बदलवावी?"
आदित्यने चहाचा कप खाली ठेवतं विचारलं,
"म्हणजे?नक्की काय म्हणायच आहे तुला?"
तस सायली त्याच्या बाजूला जाऊन बसली, तिने त्याच्या गळ्यात आपले हात गुंफले आणि हसून म्हणाली,
"कारण पूर्वी आपण दोघंही भांडत होतो. त्या प्रत्येक वादात आपण दोघंही हरत नव्हतो कि जिंकत नव्हतो .पण ह्याने आपल्यातला दुरावा वाढला आणि त्याचा परिणाम आपल्या दोघांवर होतो म्हणून ठरवलं, निदान माझ्याकडून तरी हा दुरावा वाढायला नको."
क्षणभर आदित्य तिच्याकडे पाहत राहिला.
"तू आधीसारखी राहिली नाहीस."
तो सहज बोलून गेला.
सायलीने हसत उत्तर दिलं,
"चुकतोस आदित्य माणसं कधीच बदलत नाहीत. परिस्थिती त्यांना बदलायला शिकवते... थांब मी तुझ्या आवडीचा पराठा आणते.. "
इतकं बोलून ती स्वयंपाकघराकडे निघून गेली, आणि आदित्य तिच्याकडे बघत राहिला... तेवढ्यात घड्याळाने सहा वाजल्याचा ठोका दिला...
काय होईल आदित्य सुद्धा त्याच्या बाजूने प्रयत्न करेल का??
