मागील भागात आपण पाहिलं कि,गेल्या काही दिवसांपासून सायलीने नातं पुन्हा पूर्वीसारखं व्हावं म्हणून स्वतःमध्ये अनेक बदल केले होते. आदित्यचा राग सहन करत, त्याच्या आवडी-निवडी जपत, प्रत्येक गोष्ट शांतपणे हाताळण्याचा ती प्रयत्न करत होती. पण तिच्या प्रत्येक प्रयत्नाकडे आदित्यने दुर्लक्षच केलं. तो पूर्वीप्रमाणेच तिरसटपणे बोलत होता.
सगळे प्रयत्न करून झाल्यावर सुद्धा आदित्य मध्ये काहीच बदल झालेला दिसत नव्हता, त्यामुळे सायलीला वाटू लागलं कि , कदाचित त्याच्या कॉलेजमधील कामाचा ताण, जबाबदाऱ्या किंवा इतर काही कारणामुळे तो इतका बदलला असेल. म्हणूनच सत्य जाणून घेण्यासाठी तिने स्वतःच आदित्यच्या कॉलेजमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
अगदी दुसऱ्याच दिवशी सायलीने स्वतःच्या कॉलेजमधून हाल्फ डे घेतला आणि थेट आदित्यच्या कॉलेजमध्ये गेली . तिकडे जाताना तिच्या मनात असंख्य प्रश्न होते.
"कदाचित कामाच्या ताणामुळे तो एवढा बदलला असेल..."
ती स्वतःलाच समजावत होती.
स्टाफरूमबाहेर तिला आदित्यचे दोन सहकारी भेटले, तिने त्यांना ओळखलं कधीतरी तिने त्यांना आदित्य सोबत फोटो मध्ये पाहिलं होत. त्यामुळे ती डायरेक्ट त्यांच्याजवळ गेली.
"नमस्कार, मी सायली... आदित्यची पत्नी."
"अरे वा! या ना मॅडम,.. आदित्य आता कदाचित लेक्चर मध्ये असेल. तुम्ही बसा मी बोलावतो त्यांना.."
ते प्रोफेसर हसत तिला म्हणाले..
" अहो नाही..मी तर सहज इथून जात असताना आली... म्हंटल तो फ्री असेल तर भेटेन पण असुदे ... थांबते थोडा वेळ, मग जाईन मी...
तिने सहज म्हंटल तस त्यांनी तिच्यासाठी चहा मागवला.
थोडा वेळ सहज गप्पा झाल्यावर सायलीने धीर करून विचारलं,
"खरं तर मला एक गोष्ट विचारायची होती. अलीकडे आदित्य खूप चिडचिडा झाला आहे. कॉलेजमध्ये काही कामाचं प्रेशर आहे का? किंवा काही अडचण आहे का? किंवा प्रिंसिपलचा काही दबाव..."
ते ऐकून ते प्राध्यापक हसत हसत उत्तरले...
"अहो नाही हो मॅडम...अजिबातच असं नाही. आदित्य सर तर इथले सगळ्यात शांत आणि संयमी प्राध्यापक आहेत. विद्यार्थ्यांशीही छान वागतात."
त्यांचं बोलणे पूर्ण होईपर्यंत दुसरे प्राध्यापक म्हणाले,
" अहो लेक्चर झाले कि लगेच ते स्वतःच्या लॅपटॉप वर बसतात. आताही लेक्चरच्या आधी सकाळपासून लॅपटॉपवर प्रोजेक्टचं काम करत होते. मध्येच आम्ही काही विचारलं की हसत-खेळत उत्तर देतात. खरं सांगायचं तर कॉलेजमध्ये त्यांना कधी रागावताना आम्ही पाहिलंच नाही."
ते ऐकून सायली कसतरी हसली.. पण तिच्या मनात मात्र विचारांचं वादळ उठलं.
"म्हणजे कॉलेजमध्ये सगळं सुरळीत आहे... मग घरी आल्यावर फक्त माझ्याशीच तो एवढा तुटक का वागतो? माझं नेमकं काय चुकतंय?"
त्या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. त्याच उत्तर तिला शोधायचं होत. म्हणून आदित्यला न भेटताच ती शांतपणे तिथून निघाली. मात्र त्या दिवसापासून तिच्या मनात एक नवीन शंका घर करून बसली होती माझं काय चुकतंय? कि घरी आल्यावर हा एवढा चिडचिडा होतो.
सायली शोधेल का ह्याच उत्तर??
