Login

दुराग्रह

दुराग्रह
दुराग्रह

मुग्धा व मार्मिक चे लग्न अगदी थाटामाटात पार पडले. मुग्धा सासरी आली. सुरुवातीला ती थोडी,

कवीवर्य भा.रा. तांबे यांच्या ओळीप्रमाणे,

"नववधू प्रिया, मी बावरते; लाजते, पुढे सरते, फिरते.

याप्रमाणे तिची अवस्था होती. घरी मोठे कुटुंब. सासू-सासरे, दीर, ननंद. मुग्धाच्या आईकडे चौकोनी कुटुंब. आई-वडील एक भाऊ व मुग्धा. सासरी रूळायला तिला थोडा उशीर लागला. अर्थात सगळ्याच मुलींबाबत थोड्याफार फरकाने हे घडतचं. साधे छोटे रोपटे एका जागेवरून उपटून दुसऱ्या जागेवर लावल्यानंतर ते काही वेळासाठी कोमेजते. पण थोड्या दिवसात ते चांगले रूजते. तसेच काहीसे मुग्धाच्या बाबतीत झाले.

मुग्धा मुळातच हुशार मुलगी. उच्चशिक्षित असूनही तिला घरकामाची आवड असल्यामुळे तिने लवकरच सासरच्यांची मने जिंकून घेतली. मुग्धाच्या लग्नाला जेमतेम चार महिने झाले होते. एक दिवस मुग्धाच्या आजेसासुबाईंची फर्माईश," मुग्धा आता मला नातवाचं तोंड पाहायचं आहे हं. म्हणजे मी मरायला मोकळी बरं का. काय बोलावं मुग्धाला सुचेना. ती काहीच उत्तर न देता तिच्या बेडरूममध्ये निघून गेली.

ती मनातल्या मनात विचार करू लागली, लग्न काय फक्त मुलं जन्माला घालण्यासाठीच असतं का? एक तर नवरा बायकोला परस्परांबरोबर सर्वार्थाने रूळायला वेळ लागतो. लग्न अरेंज पद्धतीने असो वा प्रेम विवाह आपल्याला मूल कधी होऊ द्यायचं हे अनेकदा कुटुंबातले लोकचं का ठरवत असतात? अनेकदा माझ्या लग्न झालेल्या मैत्रिणींकडूनही मला हेच ऐकायला मिळालं आहे.

लग्न करून एका कायदेशीर नात्यात, जबाबदारीत एकमेकांसोबत असणं याला वेळ द्यावा लागतोच. नवरा बायकोचं एक सुंदर नातं निर्माण होणं, ते फुलणं, त्यात रूसवे फुगवे होत शेवटी दोघांची एकत्रित घडी बसणं या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. खास करून नवरा बायको ने याबाबतीत काय ते ठरवणं महत्त्वाचं असतं. याबाबतीत मुलींनी स्पष्ट आणि आग्रही असलं पाहिजे. कारण एकदाच मुल जन्माला आलं की अपूर्ण राहिलेलं शिक्षण, करिअर करण्यावर मर्यादा पडतात. म्हणूनच या सर्व गोष्टींचा विचार करणं नवरा बायकोचा वैयक्तिक प्रश्न असतो. पण लग्न होऊन काही महिने किंवा वर्ष झालं की लगेच एक दुसऱ्यांकडून विचारणा सुरू होते. कुजबुज सुरु होते.कुणी तर अगदी उघडपणे

तेवढ्यात मार्मिक घरी आला.

"काय झालं माझ्या राणीला? का असा चेहरा उतरला आहे?"मुग्धाला जवळ घेत मार्मिक म्हणाला.

"काही नाही रे"

आपल्या आजी म्हणाल्या की, मला नातवाचं तोंड पाहायचं आहे.

मग काय झालं? त्यात काय एवढं मनावर घेण्यासारखं? आपलं ठरलं आहे नां. मी सांगतो आजीला समजावून. मार्मिकने मुग्धाला आश्वस्त केले.

सौ. रेखा देशमुख
0