दोष.. -1
"पाच वर्षं झाली लग्नाला. दर सणाला कुणीतरी विचारतं, गोड बातमी कधी ? मी काय सांगू ? सूनबाई, तुझ्या माहेरी काही दोष वगैरे नाही ना ? एकदा तपासून घे बाई. आमच्या घराण्यात असं कधी झालं नाही."
सासूबाईंनी, विजयाताईंनी, धनश्रीच्या पाठीवर हात फिरवत हे म्हटलं. प्रेमानेच म्हटलं, त्यांच्या मते. दिवाळीचा फराळ करता करता. आणि धनश्रीच्या हातातला चकलीचा सोऱ्या जागेवरच थांबला.
हे नवीन नव्हतं. पाचव्या वर्षापासून "दोष" हा शब्द या घरात रुजला होता. सुरुवातीला "देवाची इच्छा", मग "जरा उशीर होतोय", आणि आता "दोष". आणि तो शब्द नेहमी एकाच दिशेने वळायचा. धनश्रीकडे. कुणी थेट बोलायचं नाही. पण नणंद तिच्या दोन मुलांना घेऊन आली की सासूबाई सुस्कारा सोडायच्या.
शेजारच्या बायका "अजून नाही ?" म्हणून धनश्रीकडेच बघायच्या. आणि अभिजित.. तिचा नवरा.. विषय निघाला की उठून जायचा. "आई, जाऊ दे ना" एवढंच म्हणायचा आणि निघून जायचा.
पाच वर्षांत काय काय झालं नव्हतं ? दुसऱ्या वर्षी सासूबाईंनी कुलदेवीला नवस बोलला. तिसऱ्या वर्षी कुणीतरी सांगितलेला उपास, सलग सोळा सोमवार. चौथ्या वर्षी एका बाबाकडे नेलं, "अंगारा लावून ठेव" म्हणून. आणि प्रत्येक उपाय धनश्रीने केला, कारण नाही म्हटलं तर "हिला मूल नकोच आहे" असं ऐकावं लागलं असतं.
अभिजित या सगळ्यात "आई म्हणते तर कर ना" म्हणून बाजूला उभा असायचा. नणंद मुलांना घेऊन आली की सासूबाई नातवाला मांडीवर घेऊन धनश्रीकडे बघत "याच्या मामीला कधी कळणार" म्हणायच्या. आणि धनश्री हसायची. हसणं शिकावं लागतं. पाच वर्षांत ते जमलं होतं.
मागच्या महिन्यात नणंदेच्या धाकट्याचं बारसं झालं. पाळण्याजवळ उभ्या असलेल्या धनश्रीच्या हातात कुणीतरी बाळ दिलं आणि म्हटलं, "अंगाला लागू दे, गोड बातमी येईल."
बायका हसल्या. सासूबाई हसल्या. आणि धनश्रीने बाळ छातीशी धरून हसल्यासारखं केलं, कारण त्या क्षणी रडता येत नव्हतं. अभिजित हॉलच्या दारात उभा होता. त्याने ते ऐकलं, आणि तो बाहेर निघून गेला.
कार्यक्रम संपेपर्यंत परत आला नाही. घरी येताना गाडीत धनश्रीने विचारलं, "तुम्ही निघून का गेलात ?" तो म्हणाला, "फोन आला होता." तिने पुढे विचारलं नाही. त्याच्या फोनवर त्या दुपारी एकही कॉल आला नव्हता, हे तिला रात्री कळलं.
धनश्रीने स्वतःच्या तपासण्या दोन वर्षांपूर्वीच केल्या होत्या. डॉक्टरांनी "तुमच्यात काही अडचण दिसत नाही, मिस्टरांना पण एकदा तपासून घ्या" असं सांगितलं होतं. तिने अभिजितला सांगितलं, तेव्हा तो म्हणाला होता, "बघू ग, ऑफिसची गडबड आहे. पुढच्या महिन्यात."
पुढचा महिना कधी आला नाही. आणि धनश्रीने आग्रह केला नाही, कारण या घरात पुरुषाला "तपासून घे" म्हणणं म्हणजे काय होतं, हे तिला माहीत होतं.
दिवाळीनंतर सासूबाईंनी थेट फर्मान काढलं. "आमच्या भजनी मंडळातल्या पाटीलबाईंच्या सुनेला त्या नवीन डॉक्टरकडे यश आलं. तिकडे जा. दोघं." धनश्रीने अभिजितकडे बघितलं. त्याने मान डोलावली, "जाऊ." पण जायच्या दिवशी सकाळी "साईटवर तातडीचं काम आलंय, तू जाऊन ये आधी, मी पुढच्या वेळी" असं म्हणून तो निघून गेला.
धनश्री एकटीच गेली. रिक्षात बसताना तिला जाणवलं, या पाच वर्षांत प्रत्येक दवाखान्यात ती एकटीच गेली होती. देवळात, बाबाकडे, उपासाला.. सगळीकडे सासूबाई बरोबर असायच्या. दवाखान्यात मात्र ती एकटी. जणू देवाकडे मागायचं ते दोघींनी, आणि तपासायचं ते तिने एकटीने.
डॉक्टर सुळे शांत, पन्नाशीच्या बाई होत्या. त्यांनी जुने रिपोर्ट बघितले, नवीन तपासण्या सांगितल्या, आणि आठवड्याने रिपोर्ट घ्यायला बोलावलं. धनश्री गेली तेव्हा त्या फाईल चाळत होत्या.
"धनश्री, तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. दोन वर्षांपूर्वीही होते, आताही आहेत. तुमच्यात कुठलीच अडचण नाही."
"धनश्री, तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. दोन वर्षांपूर्वीही होते, आताही आहेत. तुमच्यात कुठलीच अडचण नाही."
धनश्रीने सुटकेचा श्वास सोडला. "मग.. मग आता ?"
"आता मिस्टरांच्या तपासण्या." डॉक्टर थांबल्या. "पण एक विचारते. तुमचे मिस्टर अभिजित देशपांडे ना ? साईट इंजिनिअर?"
"हो.. का ?"
डॉक्टरांनी चष्मा काढला. "कारण त्यांची फाईल माझ्याकडे आधीच आहे. चार महिन्यांपूर्वीची. ते एकटे येऊन तपासण्या करून गेले. रिपोर्टही घेऊन गेले. मी त्यांना दोघांना बोलावलं होतं, ते आले नाहीत." त्या थांबल्या. "म्हणजे तुम्हाला याबद्दल काहीच माहीत नाही ?"
धनश्रीच्या हातातली फाईल खाली पडली. चार महिने. दिवाळी. "तुझ्या माहेरी दोष नाही ना ?" आणि तिचा नवरा शेजारी उभा होता तेव्हा. गप्प.
"डॉक्टर.. त्यांचा रिपोर्ट.. काय होता ?"
डॉक्टर सुळेंनी तिच्याकडे बघितलं, आणि त्यांच्या नजरेतच उत्तर होतं.
डॉक्टर सुळेंनी तिच्याकडे बघितलं, आणि त्यांच्या नजरेतच उत्तर होतं.
