डोळे उघडले. लेखिका -मीनाक्षी वैद्य.

एक छान शाॅर्ट फिल्म
शॉर्ट फिल्म – "शिस्त"
(फक्त संवाद)
सुजाता: ऐका ना... आई-बाबांना किती दिवस झाले भेटून? एकदा तरी जाऊ या.
रोहित: पुन्हा तोच विषय? मला त्यांच्याकडे जायचं नाही. पुन्हा तोच तोच विषय काढून नकोस.
सुजाता: पण का? ते तुमचे आई-बाबा आहेत.
नवरा: आई-बाबा? त्यांनी लहानपणापासून मला फक्त शिस्त... शिस्त... शिस्त! शिस्तीच्या कुंपणात अडकवलं.मित्रांसोबत फिरू दिलं नाही, उशिरा घरी यायचं नाही, मुलीसारखं सातच्या आत घरात.प्रत्येक गोष्टीवर बंधनं. माझं बालपणच हिरावून घेतलं त्यांनी.
सुजाता: खरंच? की त्यांनी तुम्हाला चुकीच्या वाटेवर जाण्यापासून वाचवलं हे चुकलंच. गुंड पक्याचे छान संस्कार झाले असते तुमच्यावर मग आजचा तडफदार रोहित घडला नसता.
रोहित: मला त्याबद्दल काही ऐकायचं नाही. हे दर दोन दिवसांनी तुझं हा विषय दळण थांबव.हा विषय इथेच संपला.

(दुसऱ्या दिवशी)

सुजाता: बाळा, मी सांगते तसं करशील?
अराध्य: हो आई... पण काय करायचं?
सुजाता: तुला आजोबांकडे जायचंय ना तुला आवडत नत्यांच्याकडे (आराध्य आनंदाने हो म्हणतो)मग मी सांगते तेवढं फक्त तुझ्या बाबांशी बोलायचं... बाकी काही नाही.
(सुजाता अराध्यच्या कानात काहीतरी सांगते.

(वडील टीव्हीवर क्रिकेट पाहत आहेत.)

अराध्य: बाबा... कार्टून लावा ना.
रोहित: पाच मिनिटं थांब. सामना संपत आलाय.

(मुलगा रिमोट हिसकावून घेतो.)

अराध्य: नाही! नेहमी तुमचंच का ऐकायचं? आता माझं कार्टून बघणार मी!
रोहित (जोरात ओरडतो) : आराध्य रिमोट दे. अरे! ही कसली पद्धत? मोठ्यांशी असं वागतात का?
अराध्य: का नाही? मला जे हवं ते मी करणार. माझे सगळेच मित्र असे वागतात.
रोहित: अराध्य आधी रिमोट दे... आणि नीट बोल. कोण मशाली मित्र आहे तुझे ?
आराध्य : नाही देणार रिमोट.
रोहित: मी तुला शिस्त शिकवतो आज!
(सुजाता बाहेर येते.)
सुजाता: काय झालं?
रोहित: बघ ना, कसा उलट उत्तर देतोय! अजिबात शिस्त राहिली नाही.
सुजाता: मग तुम्ही त्याला शिस्त लावा ना.
रोहित: नक्की लावणार! नाहीतर मोठेपणी याचं नुकसान होईल.
(क्षणभर शांतता. मुलगा निरागसपणे बोलतो.)
अराध्य: बाबा...
रोहित: काय?
अराध्य: तुम्ही म्हणता ना... आजोबांनी तुम्हाला शिस्त लावली म्हणून तुम्हाला ते आवडत नाही.
रोहित: हो...
अराध्य: म्हणून तुम्ही आजोबांवर रागावलेले असता?
(रोहित शांत.)

अराध्य: तुम्ही मला शिस्त लावली...की मी पण मोठा झाल्यावर तुमच्या वर रागाऊन मीही तुम्हाला सोडून देऊ का?
(पूर्ण शांतता.)
अराध्य: की तुम्ही आजी-आजोबांना घरी आणलं तर मीही शिकेन की आई-बाबांवर प्रेम कसं करायचं.
(रोहित च्या डोळ्यांत पाणी येतं.)
रोहित: (सुजाता कडे पाहत विचारतो) हे... तू शिकवलंस?

सुजाता: नाही... मी फक्त त्याला सत्य सांगितलं.
रोहित: मीच चुकलो... शिस्त म्हणजे बंधन समजलो... पण ती तर माझ्या आयुष्याची दिशा होती.
(रोहित फोन हातात घेतो.आणि आईवडिलांना व्हिडिओ काॅल करतो.)
रोहित: (थरथरत्या आवाजात) आई...
आई: (फोनवरून) हॅलो... कोण?
रोहित: आई... मी... रोहित बोलतोय.
(काही क्षण शांतता.)
आई: कसा आहेस बाळा?
रोहित: आई... मला माफ कर. खूप उशीर झाला... पण आता नाही. उद्या मी... सगळ्यांना घेऊन घरी येतोय.मला तुमच्या दोघांची खूप आठवण येते आहे. खूप वर्ष झाली आई माझ्या डोक्यावरून तुझा हात फिरला नाही.(रडायला लागतो.
(फोनच्या दुसऱ्या बाजूला हुंदका.)
आई: ये रे बाळा... आम्ही वाटच पाहत होतो.
रोहित: हो आई... यावेळी कायमची दरी मिटवायला येतोय.तुम्ही आमच्याकडे यायचं नेहमीसाठी. अराध्यला आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत.(पुढे रोहित काही बोलू शकत नाही रडू लागतो.

(स्क्रीन काळी होते.)

अंतिम संदेश:
"पालकांची शिस्त ही कैद नसते; ती आयुष्याला योग्य दिशा देणारी शिदोरी असते."
—-----------------------------------------
समाप्त
लेखिका -मीनाक्षी वैद्य


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →