भाग १ — आनंदाची चाहूल
दिराच्या लग्नासाठी म्हणून आम्ही सगळे राहत्या घरी आलो होतो.
घरात आधीपासूनच लगबग होती. लग्नाचं घर म्हणजे तसंही प्रत्येक दिवस सणासारखाच. कुणी कपड्यांच्या घड्या घालत होतं, कुणी पाहुण्यांच्या फोनवर फोन करत होतं, कुणी लग्नाच्या तयारीची यादी घेऊन इकडून तिकडे धावत होतं. घरात सतत कुणाच्या ना कुणाच्या आवाजाची चाहूल असायची.
आणि त्या सगळ्या गोंधळात माझ्या आयुष्यात मात्र एक अशी बातमी येऊन उभी राहिली, जिच्यामुळे बाकीचं सगळं जगच काही काळासाठी थांबल्यासारखं वाटलं.
मी आई होणार होते.
सुरुवातीला ती बातमी माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या दोघांच्या मनातच होती. आनंद होता, भीती होती, काळजी होती… आणि सगळ्यात जास्त होतं ते म्हणजे एकमेकांकडे पाहून न बोलताही समजणं.
पण बातमी घरात कळली आणि मग माझ्याभोवतीच्या सगळ्या जगाचा रंगच बदलला.
“आता जपून राहायचं.”
“वेळेवर खायचं.”
“जास्त थकायचं नाही.”
“लांबचा प्रवास नको.”
“डॉक्टरांनी काय सांगितलं ते नीट पाळायचं.”
सूचना सुरू झाल्या.
सासूबाईंची काळजी, सासऱ्यांचे अधूनमधून होणारे प्रश्न, नणंदेची आपुलकी आणि माझ्या नवऱ्याची तर अक्षरशः सतत माझ्यावर नजर.
मी एखादं काम करायला उठले की,
“ठेव, मी करतो.”
मी जिना चढायला लागले की,
“हळू.”
मी जेवणात एखादी गोष्ट नाकारली की,
“काय खावंसं वाटतं ते सांग.”
अचानक मी घरातली ‘मी’ राहिले नव्हते.
मी आता कुणाची तरी आई होणार होते.
आणि हे जाणवणं किती वेगळं असतं, हे त्या काही दिवसांत मला कळलं.
दिराचं लग्नही धूमधडाक्यात पार पडलं. घरात आलेले पाहुणे, लग्नाची धावपळ, हसणं, गप्पा, विधी… त्या सगळ्यात माझा तो महिना कधी निघून गेला कळलंच नाही.
पण लग्नाची लगबग संपली आणि माझ्या मनात दुसराच विचार सुरू झाला.
आपण आता कुठे राहायचं?
पुण्यात परत गेलं की पुन्हा तेच.
सासू-सासरे, नणंद आणि आम्ही.
माझं ऑफिस वर्क फ्रॉम होम देऊ शकत होतं. डॉक्टरही आपल्या शहरात होते. माझं माहेर अवघ्या वीस मिनिटांवर होतं. बाकीचे मामा-मामी, काका-काकू, चुलत भावंडं, नातेवाईक… सगळे जवळपास.
आणि आयुष्यात पहिल्यांदाच मला वाटलं—
“जर ऑफिसने एवढी मोठी सोय करून दिली आहे, तर या काळात आपल्या गावी राहिलं तर?”
इथे डॉक्टर सहज उपलब्ध होते.
गरज पडली तर आई-बाबांकडे जाता येणार होतं.
काही अडचण आली तर नातेवाईक जवळ होते.
आणि सगळ्यात महत्त्वाचं…
माझ्या बाळाच्या आयुष्यातले पहिले काही महिने मला माझ्या माणसांमध्ये जगता आले असते.
लग्नानंतरच्या सणांसाठी, समारंभांसाठी, आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणांसाठी आपण कायम पुण्याला जाऊन सगळं करायचं का?
की कधीतरी स्वतःच्या गावात, स्वतःच्या माणसांमध्येही राहायचं?
हा प्रश्न मी नवऱ्यासमोर ठेवला.
त्याने फार विचार केला नाही.
“तुला आणि बाळाला जिथे जास्त सोयीचं आणि सुरक्षित वाटेल, तिथे राहूया.”
आणि मग निर्णय झाला.
आम्ही काही काळ इथेच राहणार होतो.
माझ्या मनात कुठेतरी एक छोटीशी मुलगी आनंदाने उड्या मारत होती.
कारण आई होण्याच्या प्रवासात मला पहिल्यांदाच माझ्या आईची गरज पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त जाणवत होती.
कदाचित मातृत्वाची हीच गंमत असावी.
आपण स्वतः आई होण्याच्या उंबरठ्यावर आलो की आपल्याला आपली आई पुन्हा एकदा नव्याने समजायला लागते.
तिची माया.
तिची काळजी.
तिचं “जेवलीस का?”
तिचं “थकली असशील.”
तिचं काही न बोलताही जवळ असणं.
माहेर अवघ्या वीस मिनिटांवर असूनही त्या वीस मिनिटांचं अंतर मला कधी कधी खूप मोठं वाटायचं.
आणि म्हणूनच मला या शहरात राहण्याचा निर्णय मनापासून आवडला होता.
लग्नानंतरच्या आयुष्यात पहिल्यांदा मला वाटत होतं—
“कदाचित आता माझंही थोडं मनासारखं होईल.”
आणि मग आली ती तारीख…
माझ्या डोहाळ्यांच्या कार्यक्रमाची.
सासूबाई आणि नणंदेने खूप प्रेमाने सगळं ठरवलं होतं.
कपडे.
फुलं.
हळदीकुंकू.
ओटी.
माझ्यासाठी आवडीचे पदार्थ.
घरातली सजावट.
सगळं इतकं सुंदर होतं की काही क्षणांसाठी मी माझ्या सगळ्या चिंता विसरले.
नऊवारीच्या साडीचा पदर सांभाळत मी आरशासमोर उभी होते.
पोटावर हात ठेवला.
आत माझं छोटंसं बाळ शांतपणे वाढत होतं.
“तुझ्यासाठी आहे हे सगळं,” मी मनातल्या मनात त्याला म्हणाले.
सासूबाईंनी माझी ओटी भरली.
नणंदेने माझ्या कपाळावर कुंकू लावलं.
सगळ्यांनी माझ्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
त्या दिवशी मला खरंच खूप छान वाटलं.
मला वाटलं—
“हो… हेच तर हवं होतं मला. माझ्या बाळासाठी सगळे एकत्र.”
पण त्या आनंदाच्या दिवसाला अजून महिनाही पूर्ण झाला नव्हता…
आणि घरात पुन्हा एकदा सामानाची बांधाबांध सुरू झाली.
पुण्याला जायची.
सासू-सासरे म्हणाले,
“नणंदेला थोडं सेटल करून येतो.”
तिचं काही काम होतं.
तिची तब्येत ठीक नव्हती.
तिथे काही व्यवस्था बघायची होती.
एक ना एक कारण होतंच.
मी त्यांचं सामान भरताना शांतपणे पाहत होते.
माझ्या डोहाळ्यांच्या कार्यक्रमात माझ्यासाठी एवढी लगबग करणारे हेच लोक…
माझ्या बाळाच्या येण्याच्या आधी माझ्याजवळ थांबून माझ्यासोबत हा काळ जगण्यासाठी मात्र एक महिना देखील काढू शकत नव्हते.
तेव्हा मनात पहिल्यांदा एक विचार आला.
“काही लोकांचं ‘कुटुंब’ म्हणजे खरंच एकमेकांना कधीच न सोडणं असतं का?”
आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला पुढच्या काही दिवसांत मिळणार होतं.
पण त्याआधी…
माझ्या आयुष्यातल्या एका माणसाने मला पुन्हा एकदा जाणवून दिलं—
मी या प्रवासात एकटी नाही.
तो माझा नवरा होता.
आणि कदाचित…
माझ्या बाळाचा पहिला खरा आधारही.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
