"मी लग्ना आधीच सांगितले होते ना की गीतेशने त्याची अंडरवियर स्वतः धुवून काढावी." जीया रागाने बोलली.
"अगं हो पण बघत आहेस ना किती सर्दी झाली आहे त्याला. अशात पावडरच्या पाण्यातून काढली त्याची चड्डी तर काय बिघडणार आहे तुझं?" मालतीताईने तिला समजवण्याचा प्रयत्न केला.
"इतका पुळका येतोय तर या ना इथे मुलाचे करायला." जियाने उलट टोमणा मारला, "तिथे नातवाला पकडून काय बसल्या आहात."
"मग तु कशाला आहेस तिथे? माझ्या मुलाची कमाई गिळायला?" त्याही भडकल्या.
"म्हणजे दोन वेळचे जेवण आणि घराची निगा राखते, ऑफिसला जाते मी." जिया.
"अच्छा मला का माहित नाही आठवड्यातून चारदा बाहेरच खाता. घराचं म्हणशील तर बाईच सगळे करते. आणि सोड ती सात आठ हजाराची नोकरी. तितके तुझ्या येण्या जाण्यातच खर्च होतात." मालतीताईने तिच्या वीक पॉईंटवर बोट ठेवले.
"गीतेश तुझ्या आईला मी आणखी सहन नाही करू शकत. मी चालली माहेरी तुझं तु बघ." इतकं बोलून मोबाईल चक्क अंथरुणात सर्दीने बेजार पडलेल्या गीतेशवर फेकून ती जिया बॅगेत कपडे कोंबून फ्लॅट बाहेर पडली. तिकडे व्हिडीओ कॉल कट करून मालती ताईनेही मोठ्या मुलाला तात्काळ जळगाव वरून पुणे जायचे आहे असे सांगितले. मोठ्या सुनेने शिदोरी सोबत दिली. ती घेऊन दोघं मायलेक आपल्या चार चाकीने पुण्याला गेले. पोहोचल्यावर बघतात काय फ्लॅटचे दार उघडेच. हात ठेवताच उघडले, गीतेश बिछान्यात, सन्न ताप त्याला.
मालती ताईने त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवल्या. मोठ्या मुलाने डॉक्टरांना फोन करून बोलावले. डॉक्टरने गितेशला दवाखान्यात भरती करायचा सल्ला दिला. इकडे हे सर्व दवाखान्यात असतांना तिकडे जियाने तिच्या आई वडिलांना घडलेला किस्सा रंगून सांगून रात्रभरात रडून रडून डोळे लाल केले तसा त्यांनी सकाळीच गितेशच्या आई, मालती ताईला फोन केरून त्यांना काय हवं आहे? त्या मुलाच्या संसारात ढवळाढवळ का करत आहेत अशी विचारणा केली असता मालती ताईने त्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली.
पण त्यांची सुई एकाच गोष्टीवर अडकून होती. ती म्हणजे आमची मुलगी तुमच्या मुलाचे घाणेरडे केलेले कपडे धुणार नाही. मालती ताईने त्यांच्याशी हुज्जत न घालणेच योग्य समजले. दोन दिवसात सलाईन वगैरे घेऊन गितेश चालता फिरता झाला. तिसऱ्या दिवशी डॉक्टरने त्याला आराम करायला सांगून डिस्चार्ज दिला.
(एवढ्या हे अंडरवियर म्हणा की चड्डी पुरा खूप सुरू आहे. बायकोने नवऱ्याचे अंडरवेअर धुवावे की नाही सध्या या प्रश्नाने गंभीर स्वरूप घेतले आहे. याविषयीच्या एका लेखावर एका दादांची कमेंट वाचली की अशा विचारांच्या बायकोच्या नवऱ्याचा कधी अपघात झाला किंवा त्याला आजारपण आले तर त्याच्यासारखा दुर्दैवी कोणीच नाही.)
