Login

वाटणी... संपत्तीची की नात्यांची? (भाग१)

संपत्तीच्या वादात रक्ताची नाती विसरलेल्या दोन भावांची कथा...
          वाटणी... संपत्तीची की नात्यांची? (भाग १)

     गावातील पाटील वाड्याचा दिवाणखाना आज भावकी च्या माणसांनी गच्च भरला होता....पण वातावरणात आनंदाऐवजी खूप तणाव होता.... घरचे मोठे कर्ते पुरुष, अण्णासाहेब, आजारी असल्यामुळे अंथरुणाला खिळले होते, आणि नेमकी याच संधीची वाट त्यांचे दोन्ही मुले शशांक आणि मिलिंद बघत होते...आधी जीवाला जीव देणारे हे दोघे भाऊ लग्न झाल्यावर काही वर्षातच एकमेकांच्या विरोधी व्हायला लागले आणि त्यामुळे अण्णा नेहमी विचारात असायचे...

आज वकिलांसमोर अण्णासाहेबांच्या इस्टेटची वाटणी होणार होती आणि सगळे जमले होते

"अण्णांनी नेहमीच मिलिंदला जास्त झुकतं माप दिलंय. पुण्यातील तो मोक्याचा प्लॉट मलाच मिळायला हवा," शशांकने चहाचा कप जोरात टेबलावर ठेवत आपला आवाज चढवला.

    त्याची पत्नी, सुलेखा, आगीत तेल ओतत म्हणाली, "हो ना! आणि आम्हीच काय ते नेहमी मोठ्या घराची जबाबदारी घ्यायची? मिलिंद आणि त्याची बायको तर फक्त सणासुदीला येतात आणि मिरवून जातात!"

    मिलिंदने तोंड उघडण्यापूर्वीच त्याची पत्नी, स्वाती, कडाडली, "सुलेखावहिनी, जीभ सांभाळून बोला! आम्ही मुंबईला राहतो कारण मिलिंदची तिथे नोकरी आहे आणि राहिला प्रश्न प्लॉटचा, तर अण्णा आजारी पडल्यापासून हॉस्पिटलच्या चकरा मिलिंदने मारल्यात, तुम्ही फक्त इथे बसून हुकूम सोडलेत... आमचे जाणे होणार नाही तू बघ तुला समजते सगळे...आम्ही सुद्धा गुमान करत राहलो सगळं...

  "स्वाती! वहिनींशी कसं बोलावं हे कळत नाही का तुला?" शशांकने रागाने उभे राहत टेबलावर हात मारला....

"आणि दादा, तुम्ही तरी कुठे माझ्या बायकोचा आदर केलाय?" मिलिंदही जागेवरून उठला....दोघे भाऊ एकमेकांसमोर उभे ठाकले, डोळ्यात अंगारे फुगत होते.

या सगळ्यात बिचारी कोपऱ्यात बसलेली त्यांची वृद्ध आई, सुमतीबाई, डोळ्यातले पाणी पदराने पुसत होत्या... "अरे थांबवा रे हे! तुमचे अण्णा वरच्या खोलीत मृत्यूशी झुंज देत आहेत, आणि तुम्हाला पैशांची पडलीये? लाज वाटू द्या जरा!"पण पैशाच्या मोहापुढे आईच्या आसवांची किंमत शून्य झाली होती.... दोघेही तू त्याला सांग... त्याला सांग करत होते...

"वकील साहेब, तुम्ही कागदपत्रं काढा. आज काय तो निर्णय होऊनच जाऊ दे... कुणाला कोणाची तोंडं बघायची हौस नाहीये इथे... सगळे आपापल्या कामात गुंतले आहे" शशांक म्हणाला.

    वकील साहेबांनी शांतपणे आपल्या बॅगेतून एक फाईल काढली....सगळ्यांच्या नजरा त्या कागदांवर खिळल्या होत्या.... खोलीत इतकी शांतता पसरली की घड्याळाचा टिक-टिक आवाजही स्पष्ट ऐकू येत होता....वकिलांनी चष्मा नीट केला आणि वाचायला सुरुवात केली...

क्रमशः
  


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →