Login

दिसतं तसं नसतं!

एखादी व्यक्ती जशी दिसते तशी वागत नाही
दिसतं तसं नसतं

"आई आणि बाबा तुमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करायला मी तयार आहे. मुलगी जास्त सुंदर नसली तरी चालेल. खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि सर्वांचा आदर करणारी, सर्वांना प्रेम देणारी पाहिजे. नुसतंच शिक्षण नको तर त्याप्रमाणे विचार देखील हवेत."

अजयचं बोलणं ऐकून त्याला अनुमोदन देण्याच्या सुरात त्याची आई म्हणाली,

"हो रे बाबा तुझी मतं आम्हाला ठाऊक आहेत. तू दिसायला इतका राजबिंडा, तुझ्या मागे इतक्या मुली असतात तरीसुद्धा कोणत्याही मुलीला तू तुझ्याजवळ फिरकूसुद्धा दिलं नाहीस. तुला मुलगी चांगला संसार करणारीच हवी हे माहिती आहे मला."

अजय हा सुरेश प्रधान आणि रश्मी प्रधान यांचा एकुलता एक मुलगा होता. गावातल्याच एका कंपनीत तो सुपरवायझर पदावर कार्यरत होता. प्रधानांचे एक मित्र माधव साने हे मध्यस्थ म्हणून लग्न जमवत होते. त्यांनी अनघा राऊत या मुंबईत राहणाऱ्या मुलीचे स्थळ त्यांना सुचवले होते. अनघा अजयला साजेशी दिसायला सुंदर, गोरा रंग, रेशमी केस आणि मुख्य म्हणजे तिचे काळेभोर डोळे खूपच बोलके होते. प्रथमदर्शनी प्रधानांच्या घरात सर्वांनाच ती आवडली. मुख्य म्हणजे ती ज्या सरकारी कार्यालयात नोकरीला होती त्याची एक शाखा यांच्या गावात सुद्धा होती. अजय अनघाचे लग्न सर्वांनुमते ठरलं. दोघांची एकमेकांशी चांगली ओळख व्हावी म्हणून दोघे एकदा बाहेर गिरगाव चौपाटीवर भेटले. त्यावेळी थोडंफार जजबी बोलणं झाल्यावर अनघा जरा जोशातच म्हणाली,

" काय हो अजय तुमच्याकडे आता किती पैसे आहेत?"

अनघाचा हा प्रश्न ऐकून अजय संभ्रमात पडला. त्याने चमकून अनघाला विचारले,

"म्हणजे काय ?"

"नाही म्हणजे घराबाहेर पडताना तुम्ही किती पैसे खिशात ठेवता? मी बाहेर पडताना माझ्याजवळ सात आठशे रुपये तरी असतात." असं अनघा एकदम तोऱ्यात म्हणाली. सातशे आठशे रुपये तीस चाळीस वर्षांपूर्वी जरा जास्तच होते. यावर अजयने उत्तर दिलं,

"माझं नक्की काही नसतं. असतील त्याप्रमाणे पैसे घेऊन निघतो."

अजय आणि अनघाचे लग्न ठरल्यावर अगदी पहिल्या प्रथम ते दोघे फिरायला आले तेव्हा अनघाने हा प्रश्न अजयला विचारला. त्याला तिचं असं विचारणं अजिबात रुचलं नाही. त्यामुळे त्याचं तिच्याबद्दल मत 'आगावू मुलगी' असं झालं. तिच्या मनात नक्की काय आहे हे त्याला कळलंच नाही. तिच्याशी संवाद साधावा असेही त्याला वाटत नव्हते. एकदा त्याला वाटलं की ती त्याला आजमावून बघत आहे. आपण पण पैशाची गुर्मी दाखवतो का हे कदाचित तिला पहायचं असेल. तिच्याशी जुजबी बोलून त्याने तिचा निरोप घेतला.

घरी आल्यावर आई बाबांनी अजयला विचारले अनघा कशी वाटली. त्याच्या चेहऱ्यावर त्यांना एखाद्या मुलीला भेटून आल्याचे भाव दिसले नाहीत. त्यांनी अजयला खोदून विचारले असता त्याने झाला प्रकार सांगितला. तो असंही म्हणाला की ही मुलगी पैशाची मिजास दाखवणारी दिसते. आपण विचार करूया. उद्या उठून आपल्या डोक्यावर मिरे वाटणारी नसावी असं मला वाटतं. आई बाबा म्हणाले,

"अरे शहरातली मुलगी आहे म्हणून जरा जास्त धीट असेल. माधवकाका तर तिच्या बद्दल आणि घरच्यांबद्दल खूप चांगलं बोलत होते. नोकरी करते आणि तिला घरचंही सगळं नीट येतंय. मोठ्यांचा आदर करते . आणि काय पाहिजे. तू उगाच तिच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस. चांगली मुलगी आहे. सर्वांना पसंत आहे."

अजयने विचार केला ठीक आहे आई बाबांना पसंत आहे तर. कदाचित लग्नानंतर बदलेल.
नंतर अजुन तीन चार भेटीच्या वेळीही तिने काही ना काही आगावूपणा केला होता. हो ना करता अजयचे अनघाशी लग्न झाले. सगळे खूप खूष होते. सगळ्यांनाच नवीन सूनबाई आवडली होती. सुरुवातीला अनघा सगळ्यांशी खूप प्रेमाने, आपुलकीने वागली. लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांची अगत्याने देखभाल केली. कोणाला काय हवं नको ते जातीने पाहिलं. घरात हास्यविनोद होत होते. सगळ्यांच्या मनात तिने जागा निर्माण केली. सगळ्यांनी रश्मीताईंना सांगितलं सुनबाई अगदी आपल्या घराला साजेशी आहे. सगळ्यांशी खूपच आपुलकीने वागते आहे. या गोष्टीचं रश्मीताईंना पण समाधान वाटलं. चार पाच दिवसांत सगळे नातेवाईक आपापल्या घरी गेले. अनघाची पण रजा संपली. ती सरकारी कार्यालयात नोकरी करत होती. त्यामुळे तिला ह्या गावी बदली मिळाली होती. ती तिथे रुजू झाली.

सुरुवातीला ती सकाळी घरचे आवरून जावू लागली. नंतर काही दिवसांनी ऑफिस मधून आल्यावर ती खूप दमली आहे असे सांगून आराम करू लागली. ती दमते म्हणून अजयच्या बाबांनी फर्मान सोडले आणि रश्मीताईंना म्हणाले,

"घरातलं आता सर्व तूच पाहत जा. ती दमून येते आणि सकाळी पण तिची खूप घाई होते."

रश्मी ताईंना त्यात काही वावगं वाटलं नाही. त्यांनी पडत्या फळाची आज्ञा मानली. आई बाबा दोघेही अनघाचे खूप लाड करत होते. तिचा शब्द खाली पडू देत नव्हते. अजयला अनघा आवडली होती पण अजूनही तिचा तोरा कमी झाला नव्हता. त्यामुळे तो तिच्याशी तोलूनमापून बोलायचा. बाबा तर तिचे खूपच लाड करायचे. तिला नेहमी म्हणायचे,

"अगं आम्हाला मुलगी नाही ती हौस आम्ही तुझे लाड करून भागवू."

मग काय विचारायलाच नको. ती सर्वांसमोर अजयला कामं सांगू लागली. आईना पण काहीही बोलायला ती मागेपुढे पाहायची नाही.
बाबांनी अनघाला हवे ते कपडे घालण्याची मुभा दिली होती. ह्या सर्व लाडांचा व्हायचा तोच परिणाम झाला. ती घरातील महासत्ता झाली. ती अजयच्या बाबांना पण जुमानत नसे. खूपच उर्मटपणे वागू लागली. अजयने तिला सर्वतोपरी समजावण्याचा प्रयत्न केला पण फायदा झाला नाही. तिने हट्ट धरला की घर तिच्या नावावर करावे. आता मात्र बाबा सावध झाले. त्यांनी त्यांच्या मित्राच्या म्हणजे माधवच्या, ज्यांनी हे लग्न जमवले होते, कानावर सारा प्रकार घातला . त्यांनीही अनघाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती काही ऐकायला तयार नव्हती. शेवटी तिने एक झटका द्यायचा ठरवलं. तिने सांगितलं की माझ्या नावावर घर केलं नाही तर मी हे घर सोडून जाईन आणि घटस्फोट घेईन. तिला हे बोलताना काहीच वाटलं नाही.

इथे अजय आणि आई बाबांना काय करावे समजत नव्हते. अनघा पैशाचा रुबाब घरातील सर्वानाच दाखवत होती. तिची मनमानी घरातील वातावरण बिघडवत होती. घरात रोज कटकटी होत होत्या. ह्या मनस्तापाने बाबांना एक दिवस हार्ट अटॅक आला. ते पंधरा दिवस इस्पितळात होते. डॉक्टरांनी घरातल्यांना सांगितले की ह्यांना ताण येईल असे कोणी वागू नका. एव्हढं सगळं झालं तरी अनघाने तिचे पालुपद चालूच ठेवलं.
अजय आणि आई बाबांनी सल्लामसलत केली आणि ठरवलं की हिच्यात काही फरक दिसत नाही. आपण सरळ तिला जायला सांगू. कदाचित घरातून काढल्यामुळे तिच्या आचरणात फरक पडतो का पाहू नाहीतर अजय तू सरळ घटस्फोट दे. पाहू तरी काय होतंय. आम्ही तेव्हाच तुझं ऐकून योग्य तो निर्णय घ्यायला हवा होता असं आता मला वाटतंय.

नेहमीप्रमाणे अनघा घरी आल्यावर कटकट सुरू झाली. अजयने तिला सरळ सांगितलं की तुझं समान घे आणि चालू पड. आम्हला पुन्हा तोंड दाखवू नकोस. अनघाला वाटलं लोक काय म्हणतील ह्या भीतीने ते आपल्याला परत बोलावतील म्हणून तिने सरळ तिचं सामान घेतलं आणि माहेरी निघून गेली. तिथे तिने ती काही दिवसांसाठी आली आहे असं तिच्या आई वडिलांना सांगितलं.

अजयने त्याच्या वकीलांकरवी अनघाला घटस्फोटाची नोटीस पाठवली. तिच्या आई वडिलांना खूप मोठा धक्का बसला. त्यांनी अनघाला सासू सासऱ्यांची आणि अजयची माफी मागायला सांगितली. पण छे! पालथ्या घड्यावर पाणी. अनघाने सामंजस्याने घटस्फोट देण्यास नकार दिला कारण तिला अजय कडून पोटगी म्हणून मोठी रक्कम हडपायची होती. एकदा कोर्टात केस गेल्यावर थोडा वेळ लागतोच. तारखांवर तारखा पडून एकदाचा अजयला घटस्फोट मिळाला. ह्या सर्वात अजय आणि त्याचे कुटुंबीय ह्यांना खूप मनस्ताप झाला. अजयची पारख योग्य होती पण आईबाबा वरलिया रंगाला भुलले होते. म्हणूनच ठरवून लग्न करताना आई वडिलांनी मुलांवर दबाव आणू नये. मुख्य म्हणजे घाई करू नये. अर्थात शेवटी जे नशिबात असते ते घडतेच. जर आणि तर म्हणण्यात काहीच अर्थ नसतो. मुलगा किंवा मुलगी कोणाच्याही बाबतीत हे घडू शकते. लग्नामुळे एक मुलगा आणि मुलगी एकत्र येत नाहीत तर दोन कुटुंब कायमस्वरूपी एकमेकांशी जोडली जातात. दोन्ही बाजू जर समजूतदार असतील तर तिथे नंदनवन फुलायला काहीच हरकत नसते.

©️®️ सीमा गंगाधरे
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →