Login

दिल्या घरी सुखी रहा? भाग -1

गोष्ट सासरच्या जाचाची
"वहिनी, आपल्या रमाला त्रास होतोय तिथं. तुम्ही एकदा जाऊन बघून तर या." काशी बाईंची जाऊ त्यांना म्हणत होती. "तुम्हाला तुमच्या लेकीची काळजी नाहीय का? अहो, आपल्या गावात बातमी पोहोचली म्हणजे खरंच असेल ना?" बोलता बोलता गंगेच्या डोळ्यांत पाणी आलं.

"अग, मुलीला सासरी थोडा त्रास सहन करावा लागतोच. त्यात काय विशेष? आपण काय मुलगी माघारी आणणार आहोत का? तिला तिथं जमवून घ्यावंच लागेल न!" काशी बाई.

"वहिनी, अजब आहे तुमचं बोलणं. आम्ही दोघं उद्या जाऊन काय ती शहानिशा करून येणार. जर वार्ता खरी असेल तर मात्र काय तो निर्णय घ्यावा लागेल."

म्हंटल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी गंगा आणि रमाचे काका तिच्या सासरी पोहोचले.

इकडे काशी बाई देवासमोर हात जोडून उभ्या होत्या. ' लेकीची काळजी कुठल्या आईला नसते? मला सारं काही ठाऊक आहे. पण सासरी दिलेली लेक माघारी आणली तर लोकं काय म्हणतील? अन् तिच्या आयुष्याचं वाटोळं होईल ते वेगळंच.'

गंगा आणि काकांना अचानक आलेलं बघून रमाच्या सासुबाई गांगरल्या. त्यांनी आपल्या मोठ्या सुनेला आत बोलावून घेतलं. "रमेला म्हणावं नवी साडी नेसून बाहेर ये आणि चेहऱ्यावर जरा हसू असू दे. उगीच दुःखाच्या डागण्या मिरवू नको म्हणावं."

चहा -पाणी झालं आणि रमा बाहेर आली. ती साऱ्या जगाचं दुःख चेहऱ्यावर घेऊन फिरत असल्यासारखी दिसत होती. डोळे खोल गेले होते. टवटवीत चेहरा निस्तेज, पांढरा पडला होता. केस विस्कटलेले दिसत होते अन् हातापायांच्या काड्या झाल्या होत्या.
"रमे, काय ग हे? खूप त्रास होतोय का तुला?" गंगा काकू जवळ जवळ किंचाळलीच. "तसं असेल तर स्पष्ट सांग."

"अहो, सून आहे ती या घरची. चार कामं जास्त करावी लागतात इतकंच." सासुबाई. "काय ग रमे? इथं त्रास होतो का तुला?" सासुबाईंची तीक्ष्ण नजर फक्त तिच्याच लक्षात आली. रमेने मानेनेच नकार दिला.

"नक्की?" गंगा काकू नरमाईने म्हणाली.

"ते काय आहे, रमेचा नवरा इथं नसतो ना. भाऊजी कचेरीच्या कामासाठी बाहेर गावी फिरत असतात म्हणून जरा एकटी पडते ती. बाकी आम्ही आहोतच. तुम्ही काळजी करू नका." मोठी जाऊ म्हणाली. "जा रमा. थोडी विश्रांती घे."

रमा आत गेली अन् काका, काकू जायला निघाले. ती आपल्या खोलीत जाणार इतक्यात सासुबाईंनी तिला हाताला धरून ओढलं. "तुझ्या माहेरची माणसं होती ना! चहा -पाणी आम्ही केलंय. तो भांड्यांचा ढीग कोण उपसणार? चल, पट्कन घासून घे."
हे ऐकून डोळ्यातलं पाणी अडवत रमाने भांडी हातात घेतली.
--------------------


"दादा, मला काहीही खरं वाटत नाहीय. आपली रमा तिथं सुखी नाहीय. तिला खूप त्रास होतोय. आम्ही स्वतः पाहून आलोय. तिची अवस्था बरी नाहीय." गंगा काकू पोटतिडकीने सांगत होती.

"मग काय करू? तिला माहेरी घेऊन येऊ का? अग, लोकं काय म्हणतील?" रमाचे वडील म्हणाले. "अजून तुझ्या दोन लेकरांची लग्नं व्हायची आहेत. माझा धाकटा लेकही शिकतोय. अशातच रमा परत आली तर त्यांची लग्नं कशी व्हायची?"

"त्याची काळजी करू नको दादा. मागल्या वाड्यातल्या चंपाने सासरच्या जाचाला कंटाळून विहिरीत जीव..तसं रमाचं काही व्हायला नको. बोलणारी लोकं बोलत असतातच. आपण दुर्लक्ष करायचं." रमाचे काका म्हणाले.
-------------------


"ही सारखी आपल्या खोलीत जाऊन काय करत असती कोण जाणे?" रमाच्या सासुबाई ओरडल्या आणि वाढलेलं ताट दाराच्या फटीतून त्यांनी आत सरकवलं.

आत रमा श्रीकृष्णाच्या छोट्याशा मूर्ती पुढं बसली होती. ताटात वाढलेलं शिळं अन्न बघून ती किंचित हसली. "तुला हा नैवेद्य चालेल ना? मग मलाही चालेल." घास गिळताना होणारा त्रास रमाने पाण्याच्या घोटासह गिळून टाकला.

जेवण झाल्यावर तिने आपल्या नवऱ्याला पत्र लिहिलं. "मला इथं खूप त्रास होतोय. तुम्ही लवकर निघून या." एका नोकरा करवी हे पत्र तिने पेटीत टाकायला म्हणून दिलं अन् नेमकं ते सासऱ्यांच्या हातात पडलं. घरात इतका आकांडतांडव झाला की रागाच्या भरात सासुबाईंनी रमावर हात उचलायला मागे - पुढं पाहिलं नाही. मोठा दिर अंगावर धावून आला तर धाकट्या नणंदेने तिला खोलीत डांबून ठेवलं. मोठ्या जावेला वाईट वाटत असलं तरी तिचं कुणापुढे काही चालत नव्हतं.

घरात कामं पडून राहायला लागली म्हणून दोन दिवसांनी खोलीचं दार उघडायला गेलेली सासरची माणसं रमाची अवस्था पाहून घाबरली. बेशुद्ध होऊन पडलेल्या रमाच्या हातात कृष्णाची मूर्ती होती अन् जेवायला दिलेलं शिळं अन्न ताटात तसंच पडून होतं.


क्रमशः


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →