Login

दिखाव्यापुरतं व्रत

.....
हे काय वहिनी , आज कशाला ऑफिसला जातेस वटपौर्णिमा आहे आज विसरलीस का ?
घरातली कामे आवरून निघणाऱ्या मानसीला रियाने म्हणजेच नणंदेने मोठ्याने विचारले. त्यांचा आवाज ऐकून वंदनाबाई ( मानसीच्या सासूबाई ) खोलीतून बाहेर आल्या.

काय गं मानसी , कालच तुला सांगितलं ना रिया माहेरी येणार आहे आणि इथेच दोघी वटपौर्णिमेची पूजा करा मग कशाला हे ऑफिस आज ?

दोघींचे लागोपाठ प्रश्न ऐकून मानसीच्या कपाळावर आठ्या पडल्या. शेवटी काहीश्या निर्धारानेच तिने उत्तर दिलं.
कशाला करू हे वटपौर्णिमेचं व्रत? जन्मोजन्मी हा नवरा पदरात पाडून घ्यायला ? लग्न झाल्यापासून गेली पाच वर्षं ही पूजा करत आले पण त्याच्या वागण्यात काय फरक पडला का ?

वंदनाबाई - अगं असं काय बोलतेस? सुवासिनी आहेस तू. कसंही वागला तरी नवरा आहे तुझा तो . आणि आपली परंपरा , सण आपण नाही करणार तर कोण करेल ?

पक्का संशयी आणि बाहेरख्याली असणारा तुमचा मुलगा एकतर माझ्या नशिबी पडला आणि वरून त्याला सात जन्म आणखी सहन करू असं म्हणताय का तुम्ही ?
मानसीने एक तिरकस कटाक्ष टाकत वंदनाबाईंना विचारले.

त्यावर रियाने आईची बाजू सावरत उत्तर दिले, वहिनी अगं यात आईचा काय दोष ? दादा आधी असं वागत नव्हता पण काय माहित काय झालं त्याला ? आणि सहन करायचं म्हणशील तर माझाही नवरा तापट आणि व्यसनी आहे तरी मी घेते ना जुळवून.
शिवाय माझ्या सासूबाई अजूनही सासऱ्यांच्या धाकात आहेत.

वंदनाबाई - तुझे सासरे तर मला किती मारायचे पण तरी त्यांच्या मरणापर्यंत मी त्यांची सेवाच केली . मुळात आमची हिंमतच नव्हती तेव्हा कसली.

मानसी - हो ना मग तुम्हीच ठरवा पुढचे सात जन्म तुम्हालाही हाच नवरा हवासा वाटतो का ?
निदान मला तरी नाही. म्हणूनच सण व्रत , उपास तापास तर मी करेलच पण अश्या नवऱ्यासाठी अजिबात नाही

रिया - अगं पण वहिनी व्रत नाही केलंस तरी दादा सुधारणार आहे का? नाही ना ? उलट सणवार साजरा केलास तर तेवढाच तुला विरंगुळा रोजच्या व्यापातून.

विरंगुळा करण्यासाठी इतरही चांगल्या गोष्टी , छंद आहेतच ताई.
ज्या नवऱ्याला माझी किंमत नाही त्याच्यासाठी दिवसभर उपवास धरणं ,वटपूजन करणं निदान दुसऱ्यांसाठी दिखावा करणं मला मान्य नाही. त्यामुळे मला हे दिखाव्यापुरतं वटपौर्णिमेचं व्रत नको.

दोघींना निरुत्तर करून मानसी शांतपणे निघून गेली.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →