Login

देवकी

अवेळी गर्भारपण
देवकी


देवकी सकाळी उठताच तिला उलटीसारखं झालं आणि मळमळल्यासारखं व्हायला लागलं. आपण रात्री काय खाल्लं होतं ते ती आठवू लागली. जेवण नेहमीचेच साधं घेतलं होतं. तिने थोडी आवळा सुपारी चघळायला घेतली आणि कामाला लागली. देवकी साधारण पंचेचाळीसच्या आसपास होती. तिची मोठी मुलगी अरुणा वीस वर्षांची होती आणि धाकटा मुलगा अविनाश सोळा वर्षांचा होता. देवकीच्या पतीचा दिनेश यांचा फिरतीचा व्यवसाय होता. ते चार चार दिवस घरी यायचे नाहीत. अरुणाचे लग्न ठरलं होतं. त्या काळी लग्न लवकर व्हायची. देवकीने दोन दिवस वाट पाहिली. परंतु तिला तब्येतीत काही सुधारणा दिसेना. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने आपली शेवटची पाळी कधी आली होती ते आठवून पाहिलं. तिच्या वयानुसार पाळी अनियमित येत होती. त्या काळी लगेच कोणी डॉक्टरकडे जात नसत. बाळाच्या जन्माच्या वेळी डॉक्टरकडे जाणं व्हायचं. तिच्या आईच्या वेळी तर सगळी बाळंतपण घरीच व्हायची. ती आपली भीती कोणाजवळ बोलून दाखवू शकत नव्हती. दिनेश यायला पण वेळ लागणार होता. तिच्या सासूबाईंनी तिचा चेहरा वाचला,

"काय गं देवकी काय झालं. तू अशी सैरभैर का दिसतेस?"

त्या दोघींचं नातं सासूसुनेचं असलं तरी दोघी एकमेकीना खूप सांभाळून घ्यायच्या. आधी देवकी म्हणाली,

"काही नाही आई जरा बरं वाटत नाही." ती आईंची नजर चुकवू लागली. आईंच्या ते लक्षात आलं. त्या तिच्या जवळ गेल्या. तिच्या पाठीवर हात ठेवून तिला धीर देत म्हणाल्या,

"हे बघ देवकी जे काही असेल ते मला सांग. मला नक्की माहित आहे तू थोडेसे बरे नसताना तू इतकी सैरभैर होणार नाहीस. तू खूप सहनशील आहेस. मी तुझी सासू असले तरी आपल्यातलं नातं खूप वेगळं आहे. आपण दोघीही एकमेकीना सगळं सांगत असतो. बोल सांगून टाक सगळं."

"आई कसं सांगू समजत नाही. माझी काहीतरी गडबड झाली आहे असं वाटतंय. मळमळल्यासारखं होतं आहे. तसं काही असलं तर मी लोकांना तोंड कसं दाखवू. आता अरुणाचे लग्न पण जवळ येतंय."

"अगं हे आपल्या हातात असतं का? आपण शक्य ती काळजी घेतो पण कधी असं होऊ शकतं. तुला सांगते माझ्या जन्माच्या वेळी माझी आई आणि माझी सगळ्यात मोठी लग्न झालेली बहिण दोघी एकाच वेळी बाळंतीण होत्या."

"आई काय सांगता. तुमच्या आईला मेल्याहून मेल्यासारखं झालं असेल. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही. मला काळजी वाटते सर्वांना कसं सांगायचं."

"अगं या गोष्टी आपल्या हातात नसतात. देवाची ईच्छा समजून तो देईल ते दान स्वीकारायचं."

"आता हे घरी येतील त्यांना कळल्यावर ते काय बोलतील काय माहित. पुरुषी स्वभावाप्रमाणे सगळा दोष मलाच देतील. मला सगळ्यांचीच खूप भीती वाटते."

"हे बघ कोणी काहीही बोललं तरी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन."

चार दिवसांनी दिनेश घरी आल्यावर घाबरत घाबरत रात्री देवकीने त्याच्या कानावर घातलं,

"अहो मला पुन्हा दिवस गेले आहेत."

दिनेशच्या कानात कोणीतरी तप्त रस ओतल्यासारखं झालं. तो तिची मनःस्थिती समजून न घेता, सारा दोष तिलाच देत तिच्यावर कडाडला,

"काय सांगतेस! तुम्हा बायकांना काळजी घेता येत नाही का! आता घरात खाणारं एक तोंड वाढेल. एकंदरीत सर्व खर्च वाढेल. त्यात जर मुलगी झाली तर लग्नाचा खर्च झेलावा लागेल तो वेगळाच. आपल्या वाडीतली सुईण आहे तिला विचारून गर्भ पाडता येतो का बघ."

ही कल्पना देवकीला सहन होण्यासारखी नव्हती. तिने तिला हे गर्भारपण लाजिरवाणे असलं तरी हा टोकाचा निर्णय पटण्यासारखा नव्हता. तिने मुद्दाम खोटं सांगितलं. ती म्हणाली,

"मी विचारलं तिला पण आता हे होऊ शकत नाही."

दिनेश तणतणत म्हणाला,

"मग काय आता या वयात मिरवा पुढे पोट घेऊन."

दिनेशला काहीही देणंघेणं नसल्यासारखा तो वागत होता. देवकीला वाटत होतं दिनेशने तिला समजून घ्यावं. तिला आता काय वाटत असेल हे त्याला कळायला हवं. शेवटी काय स्त्रीच्या मनाची व्यथा पुरुषांना कळत नाही. ते फक्त स्वतःपुरती विचार करतात. सगळे भोग देवकीलाच भोगायचे होते.

जसजसे दिवस जात होते देवकीचे पोट दिसू लागले. अरुणाच्या हे लक्षात आल्यावर ती त्रासिक स्वरात म्हणाली,

"आई तू आता पुन्हा आई होणार आहेस. आता माझ्या मैत्रिणी आणि सासरचे लोक विचारतील. त्यांना मी काय उत्तर देऊ. मलाच आता खूप लाज वाटू लागली आहे."

देवकी काहीही उत्तर न देता गप्प राहिली. आपली मुलगी पण आपल्याला समजून घेऊ शकत नाही. तिनेही तिच्यापुरता विचार केला. सगळेच स्वार्थीपणे वागत होते. देवकीच्या मनात येत होतं योग्य वयात आई होणाऱ्या स्त्रीला किती सन्मान मिळतो. सर्वत्र तिचं खूप कौतुक होतं. नको त्या वयात गर्भार रहाणं म्हणजे फक्त मानहानी आणि सर्वांच्या कुत्सित नजरा झेलणे. सर्व काही करून पुरुष नामानिराळे राहणार आणि स्त्रीला घरातले अगदी आपली मुलगी पण समजून घेत नाही. पोट दिसू लागल्यावर देवकीला घराबाहेर पडावे असेही वाटत नव्हते. एक दिवस सासूबाईंना बरं नव्हतं म्हणून त्यांना घेऊन तिला डॉक्टरकडे जावे लागले. त्या दोघी बाहेर पडताच तिने पाहिलं तिच्या नेहमीच्या ओळखीतल्या चार बायका गप्पा मारत होत्या. देवकीला पाहून त्या तोंडाला पदर लावून खुसुखुसु हसू लागल्या. देवकीला मेल्याहून मेल्यासारखं झालं. आता ह्या पण आपल्याला विचारणार. तिच्या सासूबाईंना खूप राग आला. त्या तरातरा चालत जाऊन त्या बायकांना म्हणाल्या,

"काय गं तुम्हाला हसायला काय झालं. गर्भार बाई पहिली नाही का."

"अहो मावशी हसू नको तर काय करू. नातू खेळवायच्या वयात देवकी पुन्हा आई होणार आहे. आता अरुणाचे लग्न झाल्यावर तिला बाळ होईल त्याला खेळवायचे सोडून ही स्वतःच्या बाळाला खेळवत बसेल."

"अगं तुम्ही सर्व पण एक बाई आहात. एका बाईने दुसऱ्या बाईला समजून घ्यायला पाहिजे. आपल्याकडे पुरुषांपुढे बाईचे काय चालतं का? सरकार सांगतंय कुटुंब नियोजन करा पण कोण करतं. शहरात थोडी सुधारणा होते आहे हळू हळू. आपल्या सारख्या खेडेगावात सर्व व्हायला वेळ लागेल. उद्या तुमच्यापैकी कोणावर देवकी सारखी वेळ येईल. पण आपण सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घ्यायला हवं. आधीच लोक काय म्हणतील या भीतीने ती गांगरून गेली आहे. आता एकदा बाळ झालं आणि ते लहान असेपर्यंत दोन भावंडांमधला फरक जाणवेल. तोपर्यंत लोक बोलतील. लोकांची तोंडे आपण धरू शकत नाही. काही वर्षांनंतर सारं काही सुरळीत होईल. लोक विसरून जातील. "

"मावशी तू सांगतेस ते पटलं बघ आम्हाला. देवकी आता आम्ही पण तुझ्या बरोबर आहोत. तू काळजी करू नकोस. काहीही मदत लागली तर आम्हाला हाक मार."

देवकीला खूप बरं वाटलं. नवऱ्याने आपल्यालाच दोष दिला. त्याला कोणाला उत्तर द्यायचं नव्हतं त्यामुळे तो एकदम बेफिकीर होता. आपली सासू आणि या बायका तरी आपल्या बाजूने आहेत. खरं तर इतक्या वर्षांनी आई होणं सोपं नाही. देवकीने मनोमन देवाला प्रार्थना केली की ह्या सगळ्यातून सुखरूप सुटका होऊ दे.

©️®️सीमा गंगाधरे
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →