Login

डाव स्वराज्याचा-भाग 3

जलदकथा

जलदकथा लेखन स्पर्धा फेब्रुवारी 2026

विषय: खेळ नशिबाचा


डाव स्वराज्याचा - भाग 3

( मागील भागात---

सूर्याजी: "पश्चात्ताप मला नाही, सह्याद्रीच्या वाऱ्याला होईल... की त्याने एका लोभी माणसाला इतकी वर्षं स्वतःच्या कुशीत आसरा दिला. आबाजी लक्षात ठेवा, नशिबाच्या खेळात तुम्ही प्यादं आहात की खेळाडू, हे शेवटच्या चालीवरच कळतं...."

आबाजींना वाटलं त्यांनी सूर्याजीला हरवलंय, पण सूर्याजीच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं.)

आता पुढे--

आबाजी खलिता घेऊन पावसाची पर्वा न करता सिद्दी मसूदच्या छावणीत पोहोचले.

वाटेत त्यांना वाटलं की खलिता उघडून पहावा, पण त्यांनी विचार केला की,"मसूदच्या समोरच खलिता उघडेल आणि माझं नशीब उजळेल!"

आबाजी छावणीत पोहोचले.

सिद्दी मसूद मशालीच्या प्रकाशात बसला होता.

आबाजी: (गुडघे टेकून) "हुजूर! मी नशीब घेऊन आलोय तुमचं! शिवाजीच्या एका मावळ्याला मारून मी हा खलिता मिळविला आहे. शिवाजीची पुढची खेळी काय हे यांत दडलेलं आहे."

मसूदने खलिता घेतला, मोहोर तोडली आणि आतला कागद बाहेर काढला.

जसा मसूदने तो कागद वाचला, त्याचा चेहरा रागाने लालेलाल झाला.

त्याने आबाजींची मान पकडली आणि त्यांना जमिनीवर आपटले.

मसूद: (ओरडून) "हरामखोर! तुम्हारी हिम्मत कैसे हुयी यहा आने की.... और वो सुलतान... मेरेही सुभेदार अस्लम खान को हुक्म भेज रहा है...ये तुम्हारे पास कैसे आया ?"

मसूद रागाने तर आबाजी मात्र भीतीने थरथरत होता.

आबाजी: (थरथरत) "हुजूर... काय आहे त्या कागदात?"

मसूद: (कागद आबाजींच्या तोंडावर फेकत) "झुठे, मक्कार, फरेबी... शिवा क्यू भेजेगा ये हुक्म...तुम तो सुलतान के जासूस मालूम हो रहे हो..."

मसूद प्रचंड चिडला होता.

खलिता शिवाजीराजांचा नाही तर सुल्तानाचाच होता.

सुर्याजीने वाटेत जे शत्रू सैनिक मारले त्यातील एकाजवळ हा खलिता होता आणि सुर्याजीने तोच आपल्या कमरेला बांधून घेतला होता.

खलित्यात सुलतानाने सुभेदारासाठी हुकूम दिला होता की— 'सिद्दी मसूद गद्दार आहे, शिवाला पकडले नाही त्यामुळे त्याला ठार मारावे!'

सिद्दी मसूदने आबाजींना 'सुलतानाचा हस्तक' आणि 'फितूर' समजून त्याच रात्री फासावर चढवले.

आबाजींना वाटलं होतं की त्यांनी 'नशीब' चोरलंय, पण प्रत्यक्षात त्यांनी दुसऱ्याचं मरण स्वतःच्या नावावर करून घेतलं होतं.

सुलतानाने हा खलिता ज्या सुभेदारासाठी पाठवला होता, तो खलिता नशिबाने आबाजींमार्फत थेट मसूदच्याच हाती पडला.

मसूदने संतापून आबाजींचा शिरच्छेद करण्याचा हुकूम दिला.

आबाजींना वाटले की त्यांना नशिबाने 'संधी' दिली आहे, पण प्रत्यक्षात नशिबानेच त्यांना 'सापळ्यात' पकडले होते.

तिथे छावणीत आबाजींची धुलाई होत असताना, तिकडे झोपडीत सूर्याजी शुद्धीवर आला होता.

त्याने आपली बांधलेली दोरी एका धारदार दगडाने कापली होती.

खरं तर, जेव्हा सूर्याजीने झोपडीत प्रवेश केला होता, तेव्हाच त्याने कोपऱ्यात असलेली 'विजापुरी ढाल' पाहिली होती.

त्याला समजले होते की हा माणूस स्वराज्याचा मित्र नाही.

पण तो जखमी अवस्थेत होता, त्याला काही काळ विश्रांती हवी होती म्हणून त्याने नशिबावर अवलंबून न राहता स्वतःचा डाव टाकला, जो होता स्वराज्याचा डाव!

त्याने चपळाईने आबाजीची नजर चुकवून राजेंचा खलिता काढून आपल्या पायाच्या जखमेच्या पट्टीमध्ये लपवला.

आणि कमरेला होता शत्रूकडून मिळालेला खलिता.

आबाजींना वाटले की त्यांनी सूर्याजीला फसविले, पण सूर्याजीने त्यांनाच त्यांच्या लोभाचा शिकार बनवले होते.

गुंगीचे औषध टाकलेली कांजी सुद्धा त्याने एकच घोट घेऊन बाकी समोरच्या पाण्याच्या गडव्यात ओतून दिली होती आणि म्हणूनच लवकरच तो शुद्धीवर आला.

झोपडीमागे बांधलेला आबाजीचाच जुना घोडा घेऊन त्याने विशाळगड गाठले.

गडाच्या पायथ्याशी मसूदच्या छावणीत आधीच आबाजीमुळे गोंधळ उडाला होता.

राजेंचा खलिता सुखरूप नेताजी कडे पोहोचला.

त्यात लिहिले होते की, 'पन्हाळगडावरून राजे निसटून खोऱ्यात लपले आहेत, खलिता मिळताच गडावरून तोफ डागा आणि गनिमी काव्याने सिद्दीवर हल्ला करा.
तोफेचा आवाज ऐकताच राजे स्वतः त्यांच्या मावळ्यांसह समोरून वार करतील.
शत्रूला दोन्ही बाजूनी कोंडीत पकडून त्याचा नायनाट करायचा.'

आणि तसेच झाले.
बेसावध सिद्दीच्या सेनेची दाणादाण उडाली.
सुलतानाच्या हातून नाही तर राजांच्या हातून त्याला मरण प्राप्त झाले.

स्वराज्याचा भगवा डौलाने फडकत राहिला.

काही दिवसांनी, विशाळगडाच्या बुरुजावर सूर्याजी उभा होता.

महाराज: "सूर्याजी, तू त्या दिवशी खलिता बदलला नसतास तर?"

सूर्याजी: "जी... महाराज, नशीब आपल्याला फक्त एकदा संधी देतं. आबाजींना वाटलं की नशीब म्हणजे 'फितुरी', मला वाटलं नशीब म्हणजे 'निष्ठा'.
नशिबाचा खेळ हा कायम बुद्धीच्या आणि इमानाच्या पटावर खेळला जातो.
जो इमान विकतो, त्याला नशीब कधीच साथ देत नाही."

महाराज अभिमानाने आपल्या मावळ्याकडे बघत होते.

"खरंय सूर्याजी, नशीब हे एखाद्या तलवारीसारखं असतं.
ती कोणाच्या हातात आहे, यापेक्षा ती कशी वापरली जाते, यावर विजय अवलंबून असतो.
आबाजींना वाटलं नशीब त्यांच्या धुर्तपणात आहे, पण त्यांना हे माहीत नव्हतं की नशीब फक्त सत्याच्या आणि स्वराज्याच्या पाठीशी असतं."

गडावरून दिसणारा सह्याद्री आता अधिकच निळा आणि अभेद्य दिसत होता.

खेळ नशिबाचा होता, पण डाव स्वराज्याचा मांडून विजयही स्वराज्याचा झाला होता!

तात्पर्य काय तर----

खेळ नशिबाचा हा कधीच संपत नाही.
तो रोज नव्याने सुरू होतो.
आपण फक्त आपले कर्म चोख बजावायचे असते.
नशिबाच्या पटावर आपण केवळ प्यादी नसून, जर आपण जिद्द ठेवली तर वजीरही बनू शकतो.

समाप्त।


© डॉ समृध्दी अनंत रायबागकर, अमरावती

(टीप: सदरहू कथा संपूर्णतः काल्पनिक असून अश्या प्रकारची घटना इतिहासात घडली असल्याचा दावा लेखिका करीत नाही. त्यामुळे ही कथा ऐतिहासिक नसून काल्पनिक सदरात मोडणारी आहे, याची वाचकांनी नोंद घ्यावी)
0

🎭 Series Post

View all