Login

डाव स्वराज्याचा-भाग 1

जलदकथा
जलदकथा लेखन स्पर्धा फेब्रुवारी 2026

विषय: खेळ नशिबाचा


डाव स्वराज्याचा - भाग 1

13 जुलै 1660 ची ती काळरात्र.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं जावळीचं खोरं.

रात्रीचा प्रहर आणि त्यात कोसळणारा मुसळधार पाऊस.

आषाढातली ती रात्र वैऱ्यासारखी अंगावर धावून येत होती.

सह्याद्रीच्या काळजातून उमटणारे विजांचे कडकडाट आणि मुसळधार पाऊस यामुळे आसमंत हादरून गेला होता.

आकाश काळ्या ढगांनी झाकोळले होते आणि अधूनमधून विजांचा कडकडाट रात्रीच्या त्या भीषण शांततेला चिरत होता.

या घनघोर अंधारात एक घोडा वेगाने दौडत होता.

घोड्याच्या टापांचा आवाज पावसाच्या थेंबांशी स्पर्धा करत होता.
घोड्यावर स्वार होता— सूर्याजी.

विशी-पंचविशीचा हा तरुण मावळा, ज्याच्या डोळ्यात स्वराज्याबद्दलची भक्ती आणि जिद्दीची आग होती.

त्याच्या कंबरेला एक छोटी मोहरबंद पिशवी (खलिता) बांधलेली होती.
हा नुसता खलिता नव्हता, तर ते होतं स्वराज्याचं नशीब ज्याच्या जोरावर शिवरायांनी स्वराज्याचा डाव आखला होता.

पन्हाळगडाला असणाऱ्या शत्रूच्या वेढ्यातून निसटून सूर्याजी तुफान वेगाने विशाळगडाकडे निघाला होता.

तानाजी पालकरांना स्वराज्याचा खलिता पोहचवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.

शिवरायांचा निरोप वेळेत त्याला पोहोचवायचा होता.

विजांच्या लख्ख प्रकाशात विशाळगडाची रांग एखाद्या अजगरासारखी दिसत होती.

सूर्याजीचा श्वास धपापत होता.
जोरदार पावसामुळे वाट निसरडी झाली होती.

"अजून थोडं... फक्त कोसभर अंतर..." सूर्याजी स्वतःशीच पुटपुटला.
अचानक, मागून घोड्यांच्या टापांचा आवाज आला.

"वो देखो ! चिर के रख दो इस शिवा के वाफादार को!," शत्रूचा सरदार ओरडला.

सूर्याजीने घोड्याला टाच मारली, पण घोडा निसरड्या कड्यावरून घसरला.
सूर्याजी एका बाजूला फेकला गेला आणि घोडा थेट दरीत कोसळला.
सूर्याजीने डोळे मिटले. त्याला वाटलं, खेळ संपला.

सूर्याजीचे नशीब पहा, घोड्याने ऐन वेळी दगा दिला आणि शत्रूच्या चार सैनिकांनी त्याला घेरले.

पण तो हरला नाही.

झुंज देताना तो जखमी झाला, पण त्याने चौघांनाही लोळवले.
आता अडचण होती ती वेळेची आणि त्याच्या जखमांची.

अंधारात रस्ता शोधत असताना सूर्याजीला दूरवर मिणमिणता प्रकाश दिसला.

मदत मिळण्याच्या आशेने सूर्याजी त्या दिशेने गेला.

बघतो तर काय तिथे एक छोटी झोपडी होती.

एक वृद्ध गृहस्थ, आबाजी, आपली औषधे तयार करत बसले होते.

"बाबा, आसरा द्या" धापा टाकत झोपडीबाहेरून सूर्याजी आवाज देऊ लागला.

जखमी सुर्याजीला बघताच आबाजींनी त्याला आत घेतले, "पोरा, इतक्या रात्री, वादळवाऱ्यात या मृत्यूच्या दारात काय करायलास इकडं ?"

सूर्याजीने विश्वासाने म्हणाला, "बाबा, घोडं घसरलं अन म्या जखमी झालो. लय जरुरी कामासाठी निंघालो व्हतो . पण म्हाये नशीबच थिटे. जखमी झालो, घोडं दरीत गेलं अन वेळ बी कमी हाय......"

आबाजीने सुर्याजीच्या कंबरेला अडकवलेला खलिता पहिला आणि म्हणाले, "नशीब थिटे कायचे रे, ते फक्त परीक्षा घेत रायते. गडावर जायाचं हाय काय?
माया पोरगा गडावरच असते, गुप्त वाट दावतो तुले गडाकडची. काळजी नगं करुस."

"बाबा...पाणी...पाणी द्या," सुर्याजीला बोलताना धाप लागली होती.

आबाजीने पाण्याचा लोटा त्याला दिला.

"हे घे. पाणी पी. गरम कांजी करून देतो तुला, ताकद येईल त्यानं."

सुर्याजीने पाणी पिले.

आबाजी कांजीचा वाडगा घेऊन तोवर आलाच.

कांजीचा वाडगा सुर्याजीने हाती धरताच आबाजीचे डोळे लकाकले.

'आज आपलं नशीब लय जोरावर हाय,' असा विचार आबाजीच्या मनात आला.

पण त्यांना कल्पना नव्हती.

नशिबाचा खरा खेळ तर पुढे सुरू होणार होता.

क्रमशः

© डॉ समृध्दी अनंत रायबागकर, अमरावती


(टीप: सदरहू कथा संपूर्णतः काल्पनिक असून अश्या प्रकारची घटना इतिहासात घडली असल्याचा दावा लेखिका करीत नाही.त्यामुळे ही कथा ऐतिहासिक सदरात नव्हे तर काल्पनिक कथेत मोडणारी आहे याची कृपया नोंद घ्यावी.)
0

🎭 Series Post

View all