Login

क्रेडिटचं राजकारण भाग १

क्रेडिटचं राजकारण भाग १
क्रेडिटचं राजकारण

भाग १

"विक्रांत सर, हे बघा प्रोजेक्ट झेनिथचे फायनल राऊंड्स. इंटरनॅशनल क्लायंट्सना हव्या असलेल्या सर्व कस्टमाइज्ड डिझाईन्स मी यात ॲड केल्या आहेत. प्रत्येक स्लाईडवर मी दोन दोनदा काम केलंय जेणेकरून कुठेही शुल्लकशी चूक राहू नये."

नुपुरने उत्साहाने आपला लॅपटॉप विक्रांतच्या समोर फिरवला. तिच्या डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळं स्पष्ट दिसत होती. आता हातातील कॉफीचा तिसरा कप तिच्या गेल्या पंधरा दिवसांच्या मेहनतीची साक्ष देत होते.

विक्रांतने खुर्चीत मागे रेलत, डोळ्यांवरील सोनेरी काड्यांचा चष्मा नीट केला. नुपुरच्या कामाकडे पाहण्याऐवजी त्याचं लक्ष बाहेरून केबिनकडे बघणाऱ्या एम.डी. साहेबांकडे होतं.

" गुड जॉब नुपुर! आयडियाज छान आहेत. तू खूप मेहनत घेतली आहेस, नो डाऊट. पण तुला माहितीये ना, हे क्लायंट्स जरा हाय-मेन्टेनन्स आहेत. त्यांना फक्त काम नको असतं, तर ते कसं पॅकेज करून विकलं जातं हे महत्त्वाचं असतं." विक्रांतने गुळगुळीत शब्दात तिची स्तुती करत तिला वास्तवाचा डोस दिला.

" मी समजू शकते सर, म्हणूनच मी या प्रेझेंटेशनमध्ये क्लायंटच्या देशातील संस्कृतीचाही विचार केलाय. मला खात्री आहे की त्यांना हे आवडेलच."

नुपुर आत्मविश्वासाने म्हणाली. तिने रात्रंदिवस एक केले होते. ऑफिसच्या शांत वेळेत तिने काम सुरू ठेवलं होत. जेव्हा इतर कलिग्स आपापली काम संपवून घरी जाण्याच्या तयारीत असत तेव्हा नूपुर प्रोजेक्टसाठी डेटा तयार करण्यात बिझी असायची. प्रचंड मेहनत, चिकाटीने तिने या प्रोजेक्टचे एक-एक लेयर्स सजवले होते.

प्रेझेंटेशनच्या दिवशी ऍड-लिंक्स कंपनीच्या मोठ्या मीटिंग रूममध्ये प्रचंड लगबग होती. नुपुरने आपली फाईल पेनड्राईव्हमध्ये घेतली होती. शेवटच चेकिंग करून ती मीटिंग रूमच्या दाराशी पोहोचली. आज तिचं हृदय जोरात धडधडत होतं. तिच्या आयुष्यातली ही सर्वात मोठी संधी होती.

तिने दाराचं हँडल धरलं इतक्यात मागून विक्रांतचा हात तिच्या खांद्यावर पडला.

"नुपुर , वेट!"

नुपुर थांबली. विक्रांतच्या चेहऱ्यावर एक थोडी काळजी होती.

" हे बघ, क्लायंट्स जस्ट आलेत. ते खूप हाय-प्रोफाईल आहेत. दिसायला थोडे शॉर्ट टेम्पर्ड आहेत. अशा मोठ्या मीटिंग्समध्ये हँडल करायला थोडा कॉर्पोरेट एक्सपिरीयन्स लागतो. तू जर आत काही टेक्निकल गोष्टीत अडकलीस तर आपला पूर्ण प्रोजेक्ट धोक्यात येईल. त्यापेक्षा तू बाहेरून सपोर्ट कर, मी आत जाऊन प्रेझेंट करतो. तुझी फाईल मला दे."

विक्रांतचे बोलणं ऐकून नुपुरचा चेहरा क्षणार्धात उतरला.

" पण सर, मी पूर्ण तयारी केली आहे. क्लायंटच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे."

"नुपुर, कंपनीचं हित बघ. तू अजून ज्युनिअर आहेस. तुझं नाव मी सांगेनच सिनिअर्सना. डोंट वरी, ट्रस्ट मी!"

असं म्हणत विक्रांतने जवळजवळ तिच्या हातातून फाईल खेचून घेतली. तिला काही कळायच्या आत मीटिंग रूम मध्ये शिरला. नुपुर तिथेच उभी राहिली. दाराच्या काचेतून तिला दिसत होतं. विक्रांत क्लायंट्सशी किती गोड बोलत होता, त्यांच्याशी हस्तांदोलन करत होता.

दोन तासांनी मीटिंग रूमचा दरवाजा उघडला. क्लायंट्सच्या चेहऱ्यावर समाधान होतं. एम.डी. साहेब, मिस्टर देसाई, अत्यंत आनंदी दिसत होते.

" ब्रिलियंट विक्रांत ! काय विजन आहे तुमची ! आम्ही अनेक जाहिरात कंपन्या पाहिल्या, पण ही आयडिया एकदम आउट ऑफ द बॉक्स होती. खरंच, ही कन्सेप्ट कुणी सुचवली ? " एम.डी.नी विचारलं.

नुपुर दारापाशीच उभी होती, तिला वाटलं आता विक्रांत तिचं नाव घेईल. तिचे डोळे आशेने चमकले.
विक्रांतने आपला टाय नीट केला, चेहऱ्यावर एक खोटा विनम्रपणा आणला. तो म्हणाला,

" थँक्यू सर! गेल्या आठवडाभर मी रात्रंदिवस या कन्सेप्टवरच विचार करत होतो. मला वाटलं होतं की ग्लोबल मार्केटसाठी हेच व्हिजन काम करेल. थोडी नुपुरची मदत घेतली होती डेटा गोळा करायला. काही बेसिक लेआउट्स बनवायला, पण मुख्य संकल्पना आणि स्ट्रॅटेजी माझीच होती."

नुपुरच्या कानांत जणू गरम तेल ओतलं गेलं.
विजन माझं होतं ?
तिच्या डोळ्यासमोर तिने जागून काढलेल्या रात्री, तिने केलेले शेकडो बदल .. तिने शोधून काढलेली ती मूळ आयडिया या सर्व गोष्टी एका फिल्मसारख्या फिरल्या. तिने विक्रांतकडे पाहिलं, पण त्याने एकदाही तिच्याशी नजर मिळवली नाही. तो देसाई साहेबांशी हसून बोलण्यात गुंतला होता. तिची घुसमट होत होती. तिला तिथेच जोरात ओरडून सांगावसं वाटतं होतं,

" सर, हे खोटं आहे ! ही आयडिया माझी आहे, प्रत्येक शब्द माझा आहे !"

पण कॉर्पोरेट शिस्त आणि विक्रांतचं सिनीयॉरिटीचं वलय तिच्या शब्दांना घशातच दाबत होतं. तिला तिथे उभं राहणं असह्य झालं. ती वॉशरूममध्ये पळाली.आता आरशासमोर उभी राहून स्वतःचे अश्रू थोपवण्याचा प्रयत्न करू लागली.

" फक्त डेटा गोळा करायला मदत केली ?"

ती स्वतःशीच पुटपुटली. तिच्या मेहनतीचं मोल विक्रांतने एका वाक्यात शून्य केलं होतं. आज तिला समजलं होतं की, कॉर्पोरेट जगात फक्त प्रामाणिकपणे काम करून चालत नाही, तर आपलं काम ओरडून सांगण्याची ताकदही लागते.

दोन दिवसांनी एम.डी. साहेबांनी पुन्हा मीटिंग बोलावली.

" विक्रांत, क्लायंटला प्रोजेक्टमध्ये काही तांत्रिक बदल आणि डेटा सिक्युरिटीचे अपडेट्स हवे आहेत. तुमची व्हिजनरी फाईल ओपन करा. लगेचच बदल करून दाखवा."

विक्रांतचा चेहरा पांढरा पडला. त्याने कधी फाईल नीट बघितलीच नव्हती, बदल करणं तर लांबच राहिलं. नुपुर कोपऱ्यात शांत बसली होती. तिच्या मनात आता एक वेगळाच प्लॅन शिजत होता. तिने ठरवलं होतं की, आता शांत राहून चालणार नाही...
उत्तराची वेळ आली होती. काय करणार आहे नूपुर ? काय चाललंय तिच्या डोक्यात ?

क्रमशः...

© ® वेदा

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →