मार्च जलदलेखन स्पर्धा २०२६
विषय: लग्नानंतर माहेरची जबाबदारी.
विषय: लग्नानंतर माहेरची जबाबदारी.
शीर्षक: अट भाग -३(अंतिम)
"आता हे पण काम तूच करणार का? " रागात अभयच्या आईने त्याला आवाज देत विचारले.
"अगं, आई मी तिला मदतच करत होतो. ऑफिस, हॉस्पिटल आणि घरातील सर्व काम करण्यात ती थकून जाते. तुम्हा दोघींना मी एक मदतनीस ठेवा म्हंटले होते ते पण तुम्ही ऐकत नाही. आज ईशा जास्त थकलेली वाटत आहे, म्हणून मी स्वतः तिने मदत मागितली नसताना मदत करण्याचा विचार केला."
" अरे, पण आता किती दिवस तुझी बायको तिच्या माहेरच्या लोकांचे करत बसणार आहे? तीन महिने पण तुमच्या लग्नाला झाले नाहीयेत आणि सासरच्या जरा काही गोष्टी शिकून घेण्यापेक्षा ही माहेरीच जास्त असते.
मी पण म्हटलं जाऊ दे, आज न उद्या तिची ती स्वतःहून समजून जाईल ; पण मला आता असं काही दिसत नाही." रागात अभयची आई आपल्या सुनेकडे बघून म्हणाली.
मी पण म्हटलं जाऊ दे, आज न उद्या तिची ती स्वतःहून समजून जाईल ; पण मला आता असं काही दिसत नाही." रागात अभयची आई आपल्या सुनेकडे बघून म्हणाली.
"आई तिला ना भाऊ आहे, ना बहीण; म्हणून ती तिच्या आईकडे लक्ष देते. ती तिच्या आई-वडिलांसाठीच करत आहे ना?" अभयला मात्र आपली आई, असं का बोलत आहे, हे त्याला समजत नव्हतं.
" मला ते काही माहीत नाही. हिचे माहेरी सारखे जाणे आणि तिथे जास्त लक्ष देणे, मला मान्य नाही. आता जरा सासरचे पण बघावे. तुला काय माहीत लोकं काय बोलतात. बघेल तेव्हा सून कुठे आहे तर माहेरी नाहीतर हॉस्पिटलमध्येच आहे." हेच मला सांगावे लागते.
ज्या लोकांनी ईशाबद्दल सांगितले होते, त्या सर्वांचा राग मनात ठेवून तिची सासू आज रागात व्यक्त होत
होती.
होती.
ईशाला सुद्धा राहवले नाही आणि तिने मघाचपासून चाललेल्या संभाषणमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला.
" हे बघा आई, मी लग्नाच्या आधीच सांगितलं होतं माहेरची जवाबदारी मी स्वतः घेणार. ही अट मान्य नसेल तर हे लग्न होणार नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही हे अभयना विचारू शकता." कठोर शब्दांमध्ये ईशाने आपल्या नवऱ्याकडे बघत सांगितले.
" तुला कोण नको म्हणत आहे ? पण उठसूट सारखं तुझं माहेरामध्ये जास्त लक्ष देणं मला आवडत नाही. तसेच सर्व काही इथूनच घेऊन जायची तुला काय गरज आहे ? त्याचा सर्व किती खर्च लागतो तुला माहीत आहे का ?" आपला मुद्दा पटवण्यासाठी आपल्या सुनेला पैशावरून तिची सासू बोलत होती.
" आई, तुला जर काय नीट माहीत नसेल, तर आधी ते माहीत करून घे. तिने माझ्याकडून एक पैसा सुद्धा घेतलेला नाहीये. ती जे कमावते त्यातूनच तिने सर्व केले आहे. हॉस्पिटलचे बिल किंवा इथून जरी डब्बा घेऊन जात असेल तरीसुद्धा तिने पूर्ण महिन्याचा किराणामाल किंवा अन्य सामान आधीच भरून ठेवले आहे. त्यावेळेस मला असे वाटत होते की, ईशा जरा जास्तच करत आहे, परंतु तिने असे का केले हे आता मला तुझ्या बोलण्यावरून समजत आहे." आपल्या आवाजाची पट्टी थोडी वाढवत अभय आईला म्हणाला.
वेळ होत आल्याने ईशा काही न बोलता तिथून निघून हॉस्पिटलमध्ये गेली.
" आई, मी तुला अजून पण समजावून सांगतोय. आमचे नवीनच लग्न झाले आहे. तसेच सध्या तिच्या आईला तिची गरज आहे. तिला बहीण किंवा भाऊ असता तर नक्कीच त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले असते; पण मायनर अटॅक आल्यामुळे तिचे वडील खचले आहेत आणि या वेळेस आपण त्यांना मदत नाही करणार तर कोण करणार ?
ती आपल्या घराला आपले घर मानत आहे , तसेच आपण तिच्या घराला सुद्धा आपले घर मानायला काय हरकत आहे ? मी सुद्धा तिला लग्ना आधी काही जरी झाले तरी आई-वडिलांसोबत एकच छताखाली राहायचे असे सांगितले होते. ती अट तिने मान्य केली होती आणि ती तिच्या माहेरची जबाबदारी घेईल ही तिची अट मी मान्य केली होती. त्यामुळे तुला जर समजून घ्यायचा नसेल तर पुढे जाऊन आपल्यात भांडण होण्यापेक्षा मी वेगळं राहू का? " अभयने स्पष्टपणे आपल्या आईला विचारले.
" मला सुद्धा अभयचा म्हणणं पटत आहे. सासर आणि माहेर जरी वेगळे असले तरी दोन्ही घर सांभाळण्याचा कसब हे स्त्रियांमध्ये असते आणि हे तुझ्यापेक्षा जास्त कोणाला समजणार ? तुझ्या आईच्या आजारपणात सुद्धा तू दोन-तीन महिने तुझ्या माहेरी राहिली होतीस. हे तू आज कस काय विसरलीस ?" बाबा मघापासून त्यांचे बोलणे ऐकत होते, ते ऐकून त्यांनी आपले मत मांडले.
दोन-तीन दिवस अभयच्या आईने आपल्या वागण्यावर आणि इतर काय बोलतात यावर विचार केला तसेच आपली चूक झाली आहे, हे सुद्धा त्यांना हळूहळू समजले.
थोडे दिवस ईशाच्या आईला फिजिओथेरपी आणि काळजी घेण्यासाठी ईशाची गरज लागणार होती आणि ही गोष्ट समजल्यावर स्वतःहूनच अभयच्या आईने अभय आणि ईशाला तिच्या माहेरी राहण्याबद्दल सुचवले.
आपल्या मुलाचा संसार हा सुरळीत चालावा, तसेच आपण अन्य कोण्या लोकांच्या बोलण्यात न येता त्या दोघांना जी मदत लागेल, ते करायचे असा जणू निर्धारच ईशाच्या सासुने केला होता.
सासरची जबाबदारी घेताना माहेर सुटू नये,हा ईशाचा प्रयत्न होता. तसेच त्यात अभयने साथ देण्याचा विचार केला होता. एकमेकांनी समजूनत्यांचा संसार सुरळीत ठेवण्याचा दोघांनी पहिल्यापासूनच प्रयत्न करायचे ठरवले होते.
मुलींच्या गळ्यामध्ये जेव्हा लग्नामध्ये मंगळसूत्र घातले जाते, तेव्हा त्यामध्ये दोन वाट्या असतात. एक वाटी म्हणजे माहेर आणि दुसरी वाटी म्हणजे सासर. दोन्हीकडची जबाबदारी ही मुलींनी पार पाडावी, म्हणूनच कदाचित त्या दोन वाट्यांचे महत्त्व संसारामध्ये अनन्यसाधारण असते.
समाप्त.
© विद्या कुंभार.
कथा कशी वाटली हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
(प्रस्तुत कथेचे हक्क हे लेखिकेचे आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे कथा, त्याचा भाग किंवा मजकूर कॉपी करण्याचा प्रयत्न केला, तर त्यावर कारवाई होईल ह्याची नोंद घ्यावी.)
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
