मार्च जलदलेखन स्पर्धा २०२६
विषय: लग्नानंतर माहेरची जबाबदारी.
विषय: लग्नानंतर माहेरची जबाबदारी.
शीर्षक: अट भाग -२
ईशा पटकन कॅब बुक करून तिला सांगितलेल्या पत्त्यावर निघून गेली.
" हे अचानक कसं काय झालं आणि तुम्ही दोघांनी मला ह्याबाबत आधी का सांगितलं नाही?" तिथे पोहोचल्यावर समोर बसलेल्या आपल्या बाबांना ईशाने विचारले.
" अगं, तिला अधून मधून त्रास होत होता; परंतु मी तिला म्हणत असताना सुद्धा तिने लक्ष दिले नाही." तिच्या बाबांच्या आवाजातून निराशा जाणवत होती.
" ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. मी आता लगेच डॉक्टरांना भेटून येते."
ईशा लगेच डॉक्टरांना भेटण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये निघून गेली.
" तुमच्या आईला, त्यांना मायनर अटॅक आलेला आहे आणि इथून पुढे एक महिना तरी त्यांची व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल. तसेच त्यांच्या हाताच्या संवेदना काही काळासाठी सुन्न झालेल्या आहेत. त्या पूर्ववत देण्यासाठी त्यांना आपण फिजिओथेरपीसाठी रेकमेंड करत आहोत, त्यामुळे त्यांचे हाताचे विविध व्यायाम करून घ्यावे लागणार आहेत." डॉक्टरांनी ईशाला माहिती देत सांगितले.
ईशाने फोन करून तिच्या नवऱ्याला आणि सासऱ्यांना तिच्या आईला आलेल्या मायनर अटॅकबद्दल सांगितले.
सगळेजण लगेच हॉस्पिटलमध्ये पोहोचले.
दहा दिवस होऊनही रक्तदाब कमी-जास्त होत असल्यामुळे डॉक्टरांनी दोन दिवसांनी डिस्चार्ज देण्याचा विचार केला होता.
त्याच दिवशी संध्याकाळी अभयच्या आईला त्यांच्या एका नातेवाईकांचा फोन आला होता.
" काय गं, तुझी सून आली नाही तर लगेच सारखी माहेरीच जात आहे आणि आता तर काय आईची तब्येत बरी नाही, हेच कारण तिला मिळाले आहे.
बघ, आत्तापासूनच तू थोडासा तिच्यावर लगाम घाल नाहीतर पुढे जाऊन कठीण हाईल." त्या नातेवाईकांनी फोनवर अभयच्या आईला सांगितले .
फोन आल्यापासून अभयची आईच्या त्याच विचारात गढून गेली होती. त्यामुळे संध्याकाळची रात्र झाली आहे, हेही त्यांना समजले नव्हते.
" हे काय, रात्र झाली अजून तू दिवा सुद्धा लावलेला नाहीयेस. तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना ?" अभयच्या बाबांनी अभयच्या आईला विचारलं.
" हो, मी ठीक आहे." त्यांना उत्तर देऊन अभयची आई आपल्या खोलीमध्ये निघून गेली.
कदाचित डोकं वगैरे दुखत असेल असा विचार करून अभयच्या बाबांनी आधी आपल्या सुनेला फोन करून नंतर मुलाला फोन केला.
" तुला काय जेवायला पाहिजे आहे, ते सांग. मी काहीतरी बाहेरून मागवतो. ते दोघे घरी येणार नाहीत. दोघेपण हॉस्पिटलमध्येच थांबणार आहे. दोन दिवसांनी डिस्चार्ज मिळणार आहे, ते सांगत आहेत." अभयचे बाबा माहिती देत म्हणाले.
" हा, त्यांना काय तिथे थांबायलाच लागणार. सुनेचा तर काय इथे येऊन फायदाच नाहीये ना. " अभयची आई म्हणाली.
" काय झालं ? तू आज अशी का बोलत आहेस? " आपल्या बायकोचा बदललेला सूर ओळखून त्यांनी अभयच्या आईला विचारले.
" काही नाही. तुम्हाला काय पाहिजे असेल ते मागवा. मला काही नकोय. मी झोपते." असे म्हणून खोलीतील दिवा बंद करून अभयची आई झोपून गेली.
दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत अभयची आई आपल्या खोलीतच झोपून होती.
सकाळी त्यांच्या खोलीच्या दारावर टकटक झाली आणि आत येण्याची परवानगी मिळाल्यावर समोर हातात नाश्त्याची प्लेट घेऊन उभे असलेली आपली सून त्यांना दिसली.
" हे घ्या आणि तुम्ही रात्री काहीच जेवलात नाही असे से बाबा म्हणत होते. फ्रेश होऊन तुम्ही आधी काहीतरी खाऊन घ्या. जर तब्येत बरी नसेल तर आपण डॉक्टरकडे जावूया." ईशाने त्यांना सांगितले.
" म्हणजे तुला सासुची सुद्धा काळजी आहे असे म्हणायला हरकत नाही." असे म्हणून त्या वॉशरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेल्या.
कधीही टोमणे न मारणाऱ्या सासुबाई अशा का बोलल्या ह्या पेचात पडलेल्या ईशाला काही समजत नव्हते.
नाश्ता झाल्यावर थोडा वेळ ईशा आपल्या सासूबाईंच्या जवळ घुटमळत होती.
" आज हॉस्पिटलला जायचं नाही वाटतं?" तुला सासुबाईंनी तिला विचारले.
" लवकरच आईला डिस्चार्ज मिळणार होता पण तो अजून पुढे ढकलला, अजून बीपी स्टेबल झालेला नाहीये." ती शांतपणे म्हणाली.
" म्हणजे अजून तुला तिथे जावे लागेल." असे म्हणून त्या जेवण बनवण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या.
दोघींनी मिळून दुपारचा स्वयंपाक नेहमी प्रमाणे करायचा ठरवले होते, परंतु ईशाचे बाबा आज घरी येऊन डब्बा घेऊन जातील असे सांगितल्यामुळे अजून जास्त जेवण बनवावे लागेल हे समजल्यावर सासुबाईंनी स्वयंपाक घरातून काढता पाय केला.
रात्रीचे जागरण तसेच दिवसभर ऑफिसचे वर्क फ्रॉम होम काम आणि घरातील कामे यामुळे ईशाची दगदग होत होती, परंतु सर्व काम करणे गरजेचे असल्यामुळे तिने कोणतीही तक्रार न करता सर्व काम केले.
ऑफिसची फाईल विसरली म्हणून घरी आलेला अभयने आपली बायको, तीच फक्त काम करत आहे हे बघितल्यावर त्याला वाईट वाटले. कारण त्याला सुद्धा तिची होणारी ओढाताण ही दिसून येत होती, परंतु घरामध्ये भांडण नको म्हणून तो शांत बसला होता.
दुपारी ईशाची मीटिंग होती तसेच संध्याकाळचे जेवण सुद्धा बनवून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे गरजेचे असल्यामुळे मीटिंगनंतर पटापट काम आवरण्याकडे ईशाचा कल होता.
मीटिंग संपल्यावर थकलेली ईशा जेव्हा स्वयंपाकघरात आली, तेव्हा आपल्या नवऱ्याला अचानक तिथे काम करताना बघून ती आश्चर्यचकित झाली.
त्याचवेळी पाणी पिण्यासाठी आलेल्या अभयच्या आईने अभयला स्वयंपाकघरात काम करताना बघून रागात आवाज दिला.
क्रमशः
काय होईल पुढे?
© विद्या कुंभार
कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
