Login

अट भाग-१

लग्नानंतर माहेरची जबाबदारी घेणे हे चूक की बरोबर सांगणारी कथा!
मार्च जलदलेखन स्पर्धा २०२६
विषय: लग्नानंतर माहेरची जबाबदारी.

प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: अट भाग -१

" तुला काही प्रश्न विचारायचे नाहीयेत का ? "त्याने विचारले.

" नाही.  माझी लग्नासाठी फक्त एक अट आहे. ती तेवढी मान्य केल्यावर मी लग्नासाठी होकार देईल." ती म्हणाली.

"ठीक आहे."  तो म्हणाला.

अभय आणि ईशा दोघेजण लग्नासाठी भेटले होते. दोघांचे आधी  विचार जुळतात का, हे बघण्यासाठी अभय आणि ईशाच्या घरच्यांनी आधी दोघांना भेटून नंतर जर गोष्ट पुढे जात असेल तर कांदे पोह्याचा कार्यक्रम ठेवण्याचा विचार केला होता. कारण दोघांनाही कित्येक स्थळ लग्नासाठी आली होती, परंतु पुढे बोलणी होत नसल्यामुळे आणि नकार येत असल्यामुळे दोघांच्याही आई-वडिलांनी हा निर्णय घेतला होता.

" तुझी काय अट आहे, ते सांग?"  अभयने विचारले.

"लग्नानंतर सुद्धा मी माझा पगार हा माझ्या माहेरी देणार आणि त्यांची जबाबदारी मी घेणार." ती म्हणाली.

" जशी तुझी इच्छा." अभय म्हणाला.

" म्हणजे तुला त्याबद्दल काहीच आक्षेप नाहीये ना ?" ईशाने आश्चर्यचकित होऊन त्याला विचारलं.

" नाही, मला काहीच आक्षेप नाहीये. कारण तुझा पगार आहे आणि तू ठरवायचं की तुला तो कुठे खर्च करायचा आहे." तो म्हणाला.

" तुला काही प्रश्न विचारायचे आहेत का?"  तिने त्याला विचारले.

" माझ्यासाठी माझं कुटुंब खूप महत्त्वाचे आहे आणि मला वाटतं तुझ्यासाठी सुद्धा तुझं कुटुंब खूप महत्त्वाचे आहे. माझी हीच अट आहे की, मी माझ्या आई-वडिलांपासून वेगळे राहणार नाही. तुला त्यांच्यासोबत राहावे लागेल."  तो म्हणाला.

" ठीक आहे. मला हे मान्य आहे."  ईशा म्हणाली.

दोघांनी सुद्धा तिथेच होकार कळवला. तसेच पुढे जाऊन कांदे पोह्याचा सुद्धा कार्यक्रम त्याच्या पुढच्या आठवड्यातच झाला.

" नेहमी तुला जास्त वेळ लागतो. यावेळेस तू लगेच कसं काय होकार दिलास ?" अभयच्या आईने विचारले.

" कारण मला जशी माझा जोडीदार हवी आहे, ती मला ईशामध्ये दिसत आहे. म्हणून मी लगेच होकार दिला."  त्याने त्याचे उत्तर सांगितले.

दोघांच्याही घरी लग्नाची तयारी जोमात सुरू होती.

काही ठराविक पाहुण्यांनाच आमंत्रण देऊन कमी खर्चामध्ये आणि कमी लोकांमध्ये त्यांनी लग्न केले होते.

ईशाला आपली अट पूर्ण केल्यामुळे तिला सुद्धा अभय बाबत जोडीदाराविषयी जो आदर असतो तो त्याच दिवसापासून वाटत होता.

लग्न होऊन सर्व विधी आटोपल्यानंतर ईशा आपल्या माहेरी गेली होती.

" बाळा सर्व ठीक आहे ना ?  तुला काही तिथे प्रॉब्लेम नाहीये ना ? "  ईशाच्या बाबांनी तिला विचारलं.

" नाही बाबा, तुम्ही काही काळजी करू नका. मी तिथे ठीक आहे, तसेच अभय सुद्धा माझी व्यवस्थित काळजी घेतात."  तिने स्मितहास्य करत सांगितले.

" खरंच, मला तर वाटलं होतं या वर्षी तरी तुझं लग्न होतंय की नाही; पण एकदाच झालं तुझं लग्न आता आम्हाला कोणती चिंता नाही." ईशाची आई म्हणाली.

अभय आणि ईशा ह्यांनी लग्नात होणारा अवाजवी खर्च वाचवला होता, तसेच त्यातून त्यांनी काही पैसे अनाथाश्रमामध्ये दान केले व काही पैसे हे त्यांच्या पुढच्या भवितव्यासाठी गुंतवून ठेवले होते.

माहेराहून ईशा घरी आल्यावर रात्री अभयसोबत गप्पा मारत बसली होती.

" मग तुला कुठे फिरायला वगैरे जायचं आहे का?"  त्याने विचारले.

" सध्या तरी नको. तुम्हाला आणि मला वर्क लोड जास्त असल्यामुळे आपण बाहेर जाण्याचे पुढे ढकलूया. "  ती म्हणाली.

" हो , ते पण आहे; पण तरीसुद्धा मला वाटलं की तुला विचारावं, म्हणून एकदा विचारून बघितलं."  तो हसतच म्हणाला.

घरातील अन्य कामांमध्ये अभय मदत करत असायचा तसेच काही काम सासू-सासरे सुद्धा तिला करण्यामध्ये मदत करायचे.

" हॅलो, काय सांगताय ?  ठीक आहे. मी लगेच येते."  असे म्हणून ईशाने फोन ठेवला आणि ताबडतोब तिथून निघून गेली.

क्रमशः

काय झाले असेल ?
कोणाचा फोन आला असेल ?

© विद्या कुंभार

(प्रस्तुत कथेचे हक्क हे लेखिकेचे आहेत त्यामुळे कथेची कोणत्याही प्रकारे कॉपी करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.)


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →