Login

बदल! भाग 1

कथा घरातल्या बदलाची
"जाऊबाई, एकदा घेऊन जा तिला. पुढच्या वेळेस ती तुमच्या मागं लागणार नाही." विनिता आपल्या धाकट्या जावेला म्हणाली.

"वहिनी, तुमची लेक ही तुमची जबाबदारी नाहीय का? अहो, आठवडाभर काम करून कंटाळा येतो. एकच सुट्टी मिळते. ती जरा एन्जॉय करावी म्हंटलं तर जुई दरवेळी मागे लागते." कृपा तणतण करत होती.
"तुम्ही का घेऊन जात नाही तिला? आई म्हणून तुमची काहीच जबाबदारी नाहीय का?"

"अग, मला वेळ मिळतो का? सकाळी तुमचे डब्बे, नाश्ता मग आई -बाबांचं जेवण. नंतर मागची आवराआवर करेपर्यंत दोन वाजतात. तोवर जुई शाळेतून घरी येते. मग तिचं खाणं - पिणं. अभ्यास, चहा -पाणी होतं. संध्याकाळ झाली की परत जेवणाची तयारी. तू जरा मदत केली असतीस तर मी तिला नक्की घेऊन गेले असते." आज विनिताने बोलायचं ठरवलं होतं.
रोज तिच्या अंगावर घरची जबाबदारी टाकून कृपा नोकरीसाठी म्हणून बाहेर पडत असे. सुट्टी असली की नवऱ्याच्या हातात हात घालून फिरायला जात असे. विनीताला मात्र कधीच सुट्टी मिळत नव्हती. ती सतत घरच्या लोकांना काय हवं, काय नको हे बघण्यात व्यस्त असायची. मोठी जाऊ आपलं कर्तव्य चोख पार पाडते हे बघून धाकटीने आपसूकच अंग काढून घेतलं होतं.

सासुबाई तर घरी असून नसल्यासारख्या होत्या. त्यांना काम व्हायचं नाही आणि त्या इतरांच्या कामात ढवळाढवळ करायच्या नाहीत. त्रास देण्यापेक्षा हे बरं! म्हणून विनिता दुर्लक्ष करायची. तिची एक हाती सत्ता या घरावर होती असं म्हणायला हरकत नव्हती. पण तिला या गोष्टीचा माज नक्कीच नव्हता. म्हणूनच घर टिकून होतं.

कृपा विनितापेक्षा मॉडर्न होती खरी. याचं जुईला कौतुक वाटायचं. नकळत ती आपल्या काकूला 'फॉलो 'करायची. हे माहीत असूनही विनिता कधी काही बोलली नव्हती. खरंतर आपणही कृपासारखी नोकरी करावी, छान राहावं असं विनितालाही वाटायचं. पण तितका वेळ होताच कुठं? आपले काका -काकू दर आठवड्याला फिरायला जातात. हे बघून आपणही त्यांच्या सोबत जावं असं जुईला वाटायचं.

"वहिनी, तुम्ही दिवसभर घरीच असता. मी नोकरी करते. तिथं काय, काय चॅलेंजेस् असतात, हे तुम्हाला काय कळणार? तुम्ही हेच काम करायचं. रांधा वाढा अन् उष्टी काढा.
" कृपा आरशात पाहून मेकअप करत होती. आपल्या आईला लावलेले बोल जुईला अजिबात आवडले नाहीत. "काकू, तू एक दिवस घर सांभाळून बघ. आईची कित्ती ओढाताण होते ते. बाबा, काका सुद्धा नोकरी करतात. पण ते आईला कधी उलट बोलत नाहीत."
"हे तू मला शिकवू नको. जा, जाऊन अभ्यास कर. यंदा तुझं दहावीचं वर्ष आहे ना! तुला कमी मार्क्स पडले तर या घरात मलाच दोषी धरलं जाईल बाई. " कृपा जुईच्या गालावर थोपटत म्हणाली.
"वहिनी, रात्री आम्ही जेवायला नाहीय. स्वयंपाक फक्त तुमच्यापुरता करा." कृपाच्या चेहऱ्यावर आज जरा जास्तच मेकअप दिसत होता. तिने तो मुद्दाम केला होता हे मात्र खरं. तिचं मूळचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होतं.

दीर आणि जाऊ हातात हात घालून बाहेर पडले अन् विनिता पाहतच राहिली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले. "मलाही कंटाळा येतो. मीही माणूसच आहे म्हंटलं. घर सांभाळणं म्हणजे सोपं वाटलं की काय तिला? एकवेळ ऑफिसचं नेमून दिलेलं काम करणं सोपं. पण घरचा पसारा संपता संपत नाही. कधी टेन्शन येतं, कधी शरीर थकून जातं. घरची स्त्री आजारी पडली तरी कामाला उभं राहायचं हा अलिखित नियमच आहे जणू."

विनिताचं वागणं पाहून नवऱ्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याने पेपरमध्ये तोंड खुपसलं. पण कधी नव्हे ते सासुबाई तिच्या पुढ्यात येऊन बसल्या. "तू आठ दिवस माहेरी जाऊन ये. छान विश्रांती घे आणि परत ये. घरची काळजी करू नकोस. इथलं काय करायचं ते मी बघते."
"आई, काय सांगतेस तिला? मग इथलं जेवणं -खाणं कोण करणार? आमचे डब्बे वेळेवर व्हायला हवेत. शिवाय जुईचं महत्त्वाचं वर्ष आहे. तिचा अभ्यास आहे. हे कोण बघणार?" विनोद आईवर ओरडला. पण निर्मला बाईंनी आपल्या मुलाकडे लक्ष दिलं नाही.

"जुईच्या परीक्षेला अजून वर्ष बाकी आहे. बाकीचं म्हणशील तर आमचं आम्ही बघून घेऊ. सगळ्या जबाबदाऱ्या आपणच पार पाडत राहिलो तर बाकीच्यांना तशी सवय होऊन जाते. तू जाऊन तर बघ. घर कसं बदलून जातं ते." हे ऐकून विनिता आपल्या नवऱ्याकडे बघायला लागली. तो मानेनेच नाही म्हणाला.
"जुई येत असेल तर तिलाही घेऊन जा. सुट्ट्या संपल्या की परत तिला कुठे जाता यायचं नाही." निर्मला बाई. हे खरं होतं. स्त्रीला माहेरी जायला कारणच कशाला हवं? कारणाशिवाय जाता येतं त्यालाच तर माहेर म्हणतात ना? विनिताने डोळे पुसले. 'घरचा पसारा वाढला म्हणून आपण त्यात स्वतःला कितपत गुंतवून घ्यायचं? स्वतःसाठी वेळ काढायलाच हवा. नाहीतर लोकं गृहीत धरतात. '


रात्री जेवणाच्या टेबलवर शांतता पसरली होती. कृपा भात खायचा सोडून चमचा हातात धरून तो टेबलवर आपटत होती. त्याचा खाडखाड येणारा आवाज शांतता भंग करत होता. कोणी काही बोलत नाही हे बघून तिने नवऱ्याला टेबलाखालून हळूच पाय मारला.

"वहिनी, जायलाच हवं का?" अंकुश एकदमच म्हणाला.

"हो. मला बदल हवाय. जुईला सुट्ट्या आहेत तोवर जाऊन येईन म्हणते. एकदा का मुलं मोठी झाली की आपल्या आजोळी जायला बघत नाहीत. मी माहेरी जाऊन तीन वर्षे तरी उलटून गेलीत. " विनिता म्हणाली.
'पण मी चार दिवस जाऊन प्रश्न सुटणार नाहीय. कायमचा उपाय हवा. त्यासाठी काहीतरी करावं लागेल. ' ती मनातल्या मनात विचार करत राहिली.


क्रमशः

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →