Login

आईच्या स्वभावात झालेला बदल भाग १

Story Of A Mother
आईच्या स्वभावात झालेला बदल भाग १

रविवारचा दिवस होता. सुट्टी असल्याने आकाश सोप्यावर मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसलेला होता.

“समिधा, कॉफी घेऊन ये ग.” आकाश ओरडून म्हणाला.

एका हातात उलथणी व कपाळावर आठ्या घेऊन समिधा किचन मधून बाहेर आली. ती आकाश समोर जाऊन उभी राहिली.

“माझ्यासमोर अशी उभी राहू नकोस. हातातील कॉफीचा कप टीपॉयवर ठेव आणि जा.” आकाश मोबाईल मध्ये बघूनच बोलत होता.

“आकाश, मलाही एकच दिवस सुट्टीचा मिळतो ना, त्यातही तुझ्या फर्माईश येत असतात. मी नाश्त्यासाठी डोसे बनवत आहे आणि तू इकडे रिकामटेकडा बसून ऑर्डर सोडत आहे.” ती जरा चिडूनच म्हणाली.

आकाशने तिच्याकडे मान वर करून बघितले.

“समिधा, मी आधीपासून असाच आहे. सोप्यावर लोळत माझा रविवार जातो. मला आई कधीच यावरून रागावली नाही. मी तिलाही अशाच ऑर्डर सोडत होतो आणि ती पूर्ण करत होती. ती तुझ्यासारखी कधीच चिडली नव्हती.” आकाशच लक्ष अजूनही मोबाईल मध्येच होत.

“आकाश, त्या गृहिणी होत्या. दररोज त्या घरीच असायच्या, तर दुपारी आराम करत असतीलच. मी नोकरी करते. मला एकच दिवस सुट्टीचा मिळतो. मी तुझ्या फर्माईश पूर्ण करायला मोकळी नाही. मी डोसे बनवत आहे. किचनमध्ये येऊन घेऊन जा. डोसे खाऊन झाल्यावर कॉफी मिळेल.” समिधा बडबड करत किचनमध्ये निघून गेली.

‘आई इथे असती तर मला इथेच सगळं काही मिळालं असतं. ही समिधा पण ना कधीकधी जाम डोक्यात जाते.’ आकाश स्वतःशी बडबड करत असतानाच दरवाजावरील बेल वाजली.

हातातील मोबाईल बाजूला ठेवून तो जागेवरून उठला. त्याने दरवाजा उघडला तर आई उभी होती. आईला बघून त्याला खूप आनंद झाला. आकाशची आई काही दिवसांसाठी गावी गेलेली होती. आईला घरी बघून त्याला खूप आनंद झाला होता.

“आई, बर झालं तू आलीस. समिधा मला रविवारची मजा सुद्धा घेऊ देत नाही.” आकाशने आईकडे तक्रार केली.

आई त्याच्याकडे दुर्लक्ष करून आत आली. आईने काहीच रिप्लाय दिला नाही हे बघून आकाशला आश्चर्य वाटले. आई सोप्यावर येऊन बसली. आकाशही तिच्या बाजूला येऊन बसला.

“आकाश, माझ्या बॅग घरात का आणल्या नाही?” आईने त्याच्याकडे बघितले.

“आई, दरवेळी तुच बॅग घेऊन रूममध्ये ठेवत असते ना.” आईने त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकला व तो लगेच उठून बॅग घेऊन आईच्या रूममध्ये ठेवून आला.

आईचा आवाज ऐकल्यावर समिधा त्यांच्यासाठी पाणी घेऊन आली. समिधाने आईचे हसतमुख स्वागत केले.

“समिधा, नाश्त्यासाठी काय मेन्यू आहे?” आईने विचारले.

“डोसे आणि चटणी.” समिधाने उत्तर दिले.

“मला दोन डोसे आणि चटणी दे. त्यानंतर चहा पण देशील.” आईने सांगितले.

आईच्या या बोलण्यावर आकाश व समिधाने एकमेकांकडे आश्चर्याने बघितले.

आई कुठूनही गावावरून आली की फ्रेश होऊन लगेच किचनमध्ये जायची. समिधाला बाजूला करून किचनचा ताबा ती घ्यायची. सर्वप्रथम आकाशला खायला द्यायची, मग समिधाला, घरात अजून कोणी असेल तर त्यांना दयायची आणि सगळ्यात शेवटी स्वतः खायची.

आईने स्वतःला कधीच प्राधान्य दिले नव्हते. घरातील सगळ्यांना आधी जेवू घालायचे मग स्वतः खायचे, ही आईची सिस्टीम आकाश लहानपणापासून बघत आला होता.

आज मात्र सगळंच बदललं होतं. आईमध्ये हा असा अचानक बदल का झाला असेल? हा प्रश्न आकाश व समिधा दोघांना पडला होता.

ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया पुढील भागात…….

©®Dr Supriya Dighe
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →