"शिट... आजही माझं सिलेक्शन नाही झालं ऑडिशनमध्ये."
ऑडिशन देऊन आल्यानंतर स्वराने सोफ्यावर पर्स भिरकावत खाली बसून घेतलं.
अर्जुन, तिचा रूममेट, बाहेर आला आणि तिला म्हणाला,
"स्वरा, अगं टेन्शन घेऊ नकोस. होईल सगळं नीट."
स्वरा मात्र हतबल झाली होती. एकामागून एक ऑडिशन देऊनसुद्धा तिचं कुठेही काम होत नव्हतं.
तिने मोठ्या दिमाखात तिचं गाव सोडलं होतं. आई-वडिलांना सांगितलं होतं की,
"मी आता कुणीतरी मोठी व्यक्ती बनूनच परत येईन."
कुणालाही न जुमानता तिने गाव सोडलं आणि मुंबई गाठली.
मुंबईत आल्यानंतर राहण्यासाठी स्वतःची सोय तिला स्वतःच करायची होती.
काही दिवस हॉस्टेलमध्ये राहिल्यानंतर तिने पोटापाण्यासाठी मुलांसाठी शिकवणीचे वर्ग सुरू केले.
क्लासला बऱ्यापैकी गर्दी असल्याने हाताशी काही पैसा होता. त्यातच तिला एका शॉर्ट फिल्मचं काम मिळालं असल्याने त्याचाही पैसा तिला मिळाला.
त्यातूनच तिने वन बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला.
अगदी छोट्या खोल्या आणि बराच जुना फ्लॅट. असं असल्याने भाडं तिला परवडणार होतं.
मुंबईसारख्या शहरात, जिथे घर मिळणं अशक्य होतं, तिथे तिला असा वन बीएचके फ्लॅट नशिबाने मिळाला.
तिने तिच्या शिकवण्या सुरू ठेवल्या आणि सोबतच ऑडिशन्स देऊ लागली.
तिला मोठी अभिनेत्री व्हायचं होतं. त्यासाठी वाटेल ते कष्ट करायची तिची तयारी होती.
त्यातच एक दिवस दरवाजावर टकटक झाली आणि अर्जुन तिच्या दारात उभा राहिला.
अनोळखी व्यक्ती दारात आल्यानंतर ती थोडी घाबरली.
तिने विचारलं,
"कोण हवंय?"
अर्जुन म्हणाला,
"मला फ्लॅटची चौकशी करायची आहे."
अर्जुनकडे बघितल्यानंतर तिच्या मनात वेगळेच तरंग उठले होते.
कारण कुठल्याही वयाच्या बाईला भुरळ घालावं असं देखणं सौंदर्य त्याचं होतं.
साडेपाच फूट उंची, हवेत भुरभुरणारे केस, पाणिदार डोळे आणि कसलेलं शरीर.
यामुळे तो इतका देखणा दिसत होता की मागून जाणाऱ्या दोन-चार मुलींनी वळून-वळून त्याच्याकडे पाहिलं.
तो स्वराच्या इतका मनात भरला की त्याला नाकारणं तिला शक्यच नव्हतं.
तिने त्याला आत घेतलं आणि विचारलं,
"कसला फ्लॅट? बसा, मी पाणी आणते."
तिने अर्जुनला पाणी दिलं आणि त्याची चौकशी सुरू केली.
मग तिला कळालं की अर्जुनसुद्धा कामाच्या शोधात मुंबईला आला होता आणि राहण्याची सोय नसल्याने तो सर्वत्र चौकशी करत होता.
स्वरा त्याला म्हणाली,
"हे बघा, मी गावाकडून आले आहे. मी इथे शहरातल्या लोकांसारखी अशी ब्रॉड-माइंडेड नाही की तुम्हाला माझ्या फ्लॅटवर ठेवून घेऊ शकते. त्यामुळे माफ करा. तुम्ही दुसरीकडे बघा."
त्यावेळेस अर्जुनने इमोशनल ड्रामा करून तिच्याकडे खूप विनंती केली आणि तिला समजावलं की,
"मुंबईसारख्या शहरात कितीतरी फ्लॅटमध्ये असे मुलंमुली एकत्र राहतात. कारण पर्याय नसतो. आणि त्यांच्या घरूनही परवानगी असते. कारण आजकालच्या स्पर्धेच्या युगात या अशा तडजोडी करणं भाग आहे. हे आता सर्वांना माहिती आहे."
स्वराने खूप विचार केला आणि म्हणाली,
"ठीक आहे, तुम्ही इथे राहू शकता. परंतु अर्धं भाडं तुम्हाला द्यावं लागेल."
अर्जुन तयार झाला.
तिचा खर्चही वाचला आणि तिला इतकी छान सोबतही मिळाली होती.
स्वराच्या घरच्यांनी तिच्याशी संबंध तोडून टाकल्याने आता तिला घरचाही धाक नव्हता.
दोघंही ऑडिशन्स देत होते....
क्रमशः
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
