Login

चक्रव्यूह: सत्तेचा की सत्याचा १

एका सरकारी कर्मचाऱ्याची भ्रष्टाचाराविरोधातली लढाई
भाग १: धगधगती फाईल

बाहेर पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. आकाश काळवंडून गेले होते आणि ढगांचा कडकडाट एखाद्या युद्धाच्या रणशिंगासारखा वाजत होता. मुंबईच्या मंत्रालय परिसरातील जुन्या सरकारी इमारती आज नेहमीपेक्षा जास्त भयाण वाटत होत्या. रात्रीचे अकरा वाजत आले होते. बहुतेक कार्यालयांचे दिवे मालवले होते, पण तिसऱ्या मजल्यावरच्या एका छोट्याशा केबिनमध्ये अजूनही एक दिवा मिणमिणत होता.

त्या केबिनच्या दरवाजावरची पाटी थोडी तिरपी झाली होती, ज्यावर लिहिले होते, ‘प्रणव सुरेंद्र', उपजिल्हाधिकारी’

आत प्रणव आपल्या खुर्चीत बसला होता. त्याच्या समोर टेबलवर एक निळी फाईल पडली होती. ही फाईल साधी नव्हती. गेल्या काही दिवसांपासून तो ज्या संशयाच्या धुक्यात वावरत होता, त्या धुक्याला वेगळे करणारा प्रकाश या फाईलमध्ये दडलेला होता. फाईलच्या कोपऱ्यावरची धूळ काढली असली तरी त्यावर त्याचा काळपट डाग दिसत होता, पण त्यातील मजकूर मात्र राज्याच्या सत्तेवर मोठा डाग लावण्याची ताकद ठेवत होता.

प्रणवने थरथरत्या हाताने फाईलचे पहिले पान उलटले. खिडकीतून येणारा वाऱ्याचा झोत त्याच्या चेहऱ्यावर आदळला आणि खोलीतील ट्यूबलाईट एकदा लुकलुकली, जणू नियती त्याला इशारा देत होती,

'थांब प्रणव, हे दार उघडले तर मागे परत फिरण्याचा रस्ता सापडणार नाही.'

पण प्रणव हा वेगळ्या मातीचा माणूस होता. त्याचे वडील, सुरेंद्र, एक निवृत्त शिक्षक होते, ज्यांनी त्याला एकच गोष्ट शिकवली होती,

"सत्याची साथ सोडली की माणूस जिवंत असूनही मेल्यासारखा असतो."

प्रणवने फाईल वाचायला सुरुवात केली. जसजशी पाने उलटली जात होती, तसतसा त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा होत होते, हा सिंचन घोटाळा केवळ कागदावर दिसतो तेवढा लहान नव्हता. यात राज्याचे मोठे उद्योगपती, पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकारी आणि चक्क गृहराज्यमंत्र्यांचे नाव सामील होते. ५००० कोटी रुपये! हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी, पाणी आणि त्यांच्या जगण्याचे स्वप्न या पैशांच्या हव्यासापोटी गिळंकृत करण्यात आले होते.

"असे कसे होऊ शकते?" प्रणव पुटपुटला.

त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ज्या धरणांच्या नावाखाली पैसा काढला गेला होता, तिथे प्रत्यक्षात फक्त खड्डे होते. ज्या कालव्यांचे बिल पास झाले होते, तिथे केवळ ओसाड रान होते.

त्याने पाहिले की एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीला हे कंत्राट मिळाले होते, रुद्र इन्फ्रास्ट्रक्चर, या कंपनीचा मालक होता विक्रम शेठ, जो मुख्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस मानला जायचा. पण धक्कादायक बाब ही होती की, या व्यवहारांवर ज्या अधिकाऱ्यांच्या सह्या होत्या, त्यातली काही नावे प्रणवच्या ओळखीची होती. भ्रष्टाचाराचे हे जाळे इतके खोलवर विणले गेले होते की, त्यात अडकलेला प्रत्येक धागा सत्तेच्या सर्वोच्च शिखरापर्यंत जात होता.

अचानक बाहेर विजेचा जोरदार कडकडाट झाला. प्रणवचे लक्ष खिडकीबाहेर गेले. रस्त्यावरचे दिवे पावसामुळे अंधुक झाले होते. त्याला जाणवले की इमारतीच्या खाली एक काळी स्कॉर्पिओ गाडी उभी आहे. तिच्या हेडलाईट्सचा उजेड थेट इमारतीच्या मुख्य भागावर पडत होता. इमारतीतील सगळे गेलेले असताना ही गाडी नेमकी काय करत आहे याबद्दल त्याला प्रश्न पडला आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला, त्याला माहित होते की, या फाईलपर्यंत तो पोहोचला आहे, ही बातमी वर पोहोचायला वेळ लागणार नाही.

त्याने पटकन फाईलचे महत्त्वाचे कागद स्कॅन करायला सुरुवात केली. त्याच्या मोबाईलचा कॅमेरा प्रत्येक पुराव्याचा फोटो टिपत होता. त्याचे हात घाईघाईने चालत होते. त्याला माहित होते की ही फाईल उद्या सकाळी त्याच्या टेबलवर नसेल. कदाचित ती जाळली जाईल किंवा गायब केली जाईल.

अचानक केबिनच्या बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये कुणाचे तरी पाऊल वाजले.

टप... टप... टप...

प्रणवने श्वास रोखून धरला. त्याने मोबाईल खिशात टाकला आणि फाईल पुन्हा तशीच व्यवस्थित ठेवून दिली. तो खुर्चीवरून उठला आणि सावधपणे दरवाजाकडे पाहू लागला. दरवाजाच्या खालच्या फटीतून त्याला सावली दिसली. कोणीतरी बाहेर उभे होते.

"प्रणव साहेब... अजून घरी नाही गेलात?" एक ओळखीचा आवाज आला.

प्रणवने सुटकेचा निःश्वास सोडला. तो शिपाई पांडू होता. प्रणवने दरवाजा उघडला. पांडू हातात चहाचा कप घेऊन उभा होता.

"नाही पांडू, थोडे काम बाकी होते. तू का थांबला आहेस?" प्रणवने स्वतःला सावरत विचारले.

"साहेब, बाहेर पाऊस लय वाढलाय आणि ती काळी गाडी... खाली निम्म्या तासापासून उभी हाय. मला काही बरं वाटत नाहीये. तुम्ही निघा आता," पांडूने काळजीतून सांगितले.

प्रणवने खिडकीतून पुन्हा खाली पाहिले. ती गाडी तिथेच होती. आता तिच्यातून दोन धिप्पाड माणसे बाहेर उतरली होती. त्यांच्या अंगावर काळे रेनकोट होते आणि डोक्यावर रेनकोटच्या टोप्या असल्याने त्याचे चेहरे झाकले गेले होते आणि त्यावरून ते कोण आहेत हे कळत नव्हते, पण देहबोलीतून आणि त्यांच्या चालण्यातून एक प्रकारची बेफिकिरी आणि क्रूरता दिसून येत होती.

"पांडू, तू मागच्या दरवाजाने निघून जा, आणि ऐक, जर काही झाले तर माझ्या घरी फोन नको करू, थेट या नंबरवर मेसेज कर," प्रणवने त्याला एका कागदावर नंबर लिहून दिला.

पांडू गोंधळला होता पण त्याने निमूटपणे मान हलवली आणि तो तिथून लगेच निघून गेला.

प्रणवने आपली नेहमीची बॅग घेतली. त्यात त्याने फाईलमधले काही मूळ कागदपत्रे लपवून ठेवले. त्याला माहित होते की हा त्याचा सर्वात मोठा जुगार होता. जर तो पकडला गेला, तर त्याचे करिअरच नाही, तर आयुष्यही संपणार होते, पण जर तो गप्प बसला असता, तर हजारो गरिबांचे शाप त्याला लागले असते जे त्याला नको होते.

तो सावकाश केबिनच्या बाहेर पडला. कॉरिडॉरमध्ये भयंकर शांतता होती. फक्त काही ठिकाणी पाण्याचे थेंब गळण्याचा आवाज येत होता. तो लिफ्टकडे न जाता जिन्याकडे वळला, त्याला माहित होते की अशावेळी लिफ्ट वापरणे धोक्याचे ठरणारे होते.

जिना उतरताना त्याला समोरून येणाऱ्या दोन सावल्या दिसल्या. तीच माणसे होती जी खाली गाडीतून रेनकोट घालून उतरली होती, त्यांच्या मागे पाण्याचा सडा पडत होता, सगळीकडे चिकचिकाट झाला होता.

"ओ साहेब , इतक्या रात्री कुठे चाललात? फाईल तर अजून पूर्ण वाचायची राहिली असेल ना?" एकाने खर्जातील आवाजात विचारले. त्याच्या हातात एक चमकणारा चाकू होता.

प्रणव थांबला नाही. त्याने आपल्या बॅगेची पकड घट्ट केली. त्याच्या डोळ्यात आता भीती होती, पण पुढे काय करायचे हे त्याच्या मनात तयार होते, ती जिद्दच त्याला पुढच्या काही दिवसात कामाला येणार होती. या एका फाइलसाठी ही लढाई नव्हती, तर एका प्रामाणिक शिक्षकाच्या प्रामाणिक मुलाच्या राज्यात होत असणारा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी संपूर्ण व्यवस्थेशी असलेला संघर्ष होता.

"फाईल वाचून झाली आहे... आता फक्त निकाल द्यायचा बाकी आहे," प्रणव निर्भयतेने म्हणाला पण आतल्या आत त्याचे मन घाबरले होते.

दुसऱ्या माणसाने खिसातून पिस्तूल काढले.

"निकाल तर आम्ही लावणार, साहेब. तुमची फाईल आणि तुमचे जीवन, दोन्ही आज इथेच संपणार, मरण्याच्या अगोदर काही हवे आहे का? असे सिनेमासारखे आम्ही विचारणार नाही."

बाहेर पावसाचा वेग अजूनच वाढला होता. विजेच्या प्रकाशात प्रणवचा चेहरा चमकला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला, आणि समोरच्याला काही कळायच्या आत त्याने हातातल्या बॅगेने बंदूकधाऱ्याच्या हातावर एक धक्का मारला. दुसऱ्याच्या पोटावर लाथ मारून तो वेगाने मागे फिरला आणि इमारतीच्या गच्चीकडे जाणाऱ्या जिन्याकडे धावला. त्याच्या मागे ते दोन मारेकरी धावू लागले. जिन्याचा वळणावळणाच्या पायऱ्यांवरून तो वर जात होता, पाठीमागून येणारे मारेकरी त्याच्या रोखाने पिस्तुलाच्या गोळ्या झाडत होते. पावसाच्या आवाजात त्यांच्या पावलांचा आणि गोळ्यांचा आवाज अजून भयानक येत होता, ही सुरू झालेली ही झटापट आता लवकर संपणारी नव्हती.

प्रणवने गच्चीचा दरवाजा उघडला आणि तो मुसळधार पावसात बाहेर पडला. त्याच्या मागून साक्षात मृत्यू येत होता, तरीपण तो त्याच्या हातातली बॅग सोडायला तयार नव्हता, त्यात सत्याचा पुरावा होता. ही धगधगती फाईल आता कदाचित त्याच्या आयुष्याचा भाग बनली होती.

क्रमशः 

भालचंद्र नरेंद्र देव 

सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.

ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.