Login

चक्रव्यूह: सत्तेचा की सत्याचा ९७

एका सरकारी कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार विरोधातील लढा
भाग ९७: तात्यासाहेबांचा अंत

किल्ल्याच्या डाव्या भागात झालेल्या ट्रॅकमधल्या आरडीएक्सच्या पहिल्या लहान स्फोटाने संपूर्ण वाळवंटाची जमीन हादरवून सोडली होती. गोदामातून आगीच्या अक्राळविक्राळ ज्वाला आकाशाकडे झेपावत होत्या आणि काळा-पांढरा धूर किल्ल्याच्या बुरुजांना वेढत होता. या भयंकर धुमश्चक्रीत, प्रत्येक जण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करत होता. पण एका बाजूला, रक्ताने माखलेला, खांद्याला गोळी लागलेला शमशेर केवळ आपल्या जिद्दीच्या आणि सुडाच्या ताकदीवर पुढे सरकत होता. त्याचे डोळे बुरुजाच्या मागच्या बाजूने पळणाऱ्या एका आकृतीवर खिळले होते, ती आकृती म्हणजेच गद्दार तात्यासाहेब.

तात्यासाहेब, विक्रम शेठच्या मागे पळत असताना, गोळीबाराच्या आणि धुराच्या गोंधळात एका उघड्या, उंच बुरुजाच्या दिशेने भरकटले होते. तिथून जिन्याने खाली जाण्याचा मार्ग शोधत असतानाच, मागून एक जड आणि भयानक पावलांचा आवाज आला. तात्यासाहेबांनी दचकून मागे पाहिले, तर समोर खांद्यातून रक्त वहाणारा, आणि डोळ्यांत प्रत्यक्ष यमासारखा राग घेऊन उभा असलेला शमशेर दिसला. शमशेरने बुरुजाच्या वरून खाली जाणाऱ्या दारापाशी उभे राहून तात्यासाहेबांचा रस्ता पूर्णपणे अडवला होता.

"शमशेर? तू... तू अजून जिवंत आहेस?" तात्यासाहेबांचा आवाज भीतीने कातर झाला. त्यांच्या हातातील बंदूक खाली कुठेतरी पडली होती, आणि आता ते पूर्णपणे हतबल झाले होते.

"तात्यासाहेब! मी म्हटले होते ना, इमामसाहेबांच्या आणि हुसेनच्या रक्ताशी केलेली गद्दारी मी तुम्हाला पचवू देणार नाही. आज या बुरुजावरून फक्त एकाचाच मृतदेह खाली जाईल." शमशेर दात ओठ खात म्हणाला.

तात्यासाहेबांनी आजूबाजूला पाहिले. पळून जाण्यासाठी कोणताही मार्ग नव्हता. खाली शेकडो फूट खोल दरी आणि तीक्ष्ण खडक होते. त्यांनी आपली जुनी, कपटी चाल खेळण्याचे ठरवले. चेहऱ्यावर एक खोटे, गयावया करणारे हसू आणत ते म्हणाले,

"शमशेर... अरे शमशेर, थांब. आपण दोघे शांतपणे विचार करूया. तू का त्या म्हाताऱ्या इमामसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालतोयस? त्याने तुला आतापर्यंत दिले काय आहे? फक्त नोकराची वागणूक, आणि विश्वासघातचा डाग, त्याच्यासमोर हुजरेगिरी करण्यापेक्षा तू माझ्या बाजूने ये. माझ्याकडे आणि विक्रम शेठकडे अफाट पैसा आहे. आपण दोघे मिळून मुंबईवर राज्य करू. हुसेन गेला तो एक अपघात होता, माझा त्यात काही दोष नव्हता. मी तुला या संपूर्ण मालमत्तेत अर्धा हिस्सा देईन, शमशेर! विचार कर."

शमशेर जागचा हलला नाही. त्याचे शरीर वेदनेने व्याकुळ होते, पण त्याचे मन वज्रासारखे खंबीर झाले होते. "तात्यासाहेब, तुमची ही गोड आणि विषारी बोलणी आता माझ्यावर चालणार नाहीत. शमशेर इमानी आहे, तुमच्यासारखा पैशासाठी स्वतःच्या भावाला विकणारा गद्दार नाही."

आपली कुठलीच मात्रा चालत नाही, पैशाचे आमिषही अपयशी ठरले आहे हे पाहून तात्यासाहेबांचा संयम सुटला. ते अचानक हिंस्र झाले. त्यांनी जमिनीवर पडलेला एक अणकुचीदार दगडाचा तुकडा उचलला आणि अचानक पुढे झेप घेत शमशेरच्या गोळी लागलेल्या उजव्या खांद्याच्या जखमेवर तो जोरात खुपसला.

"आहहह!!!" शमशेरच्या तोंडून एक असह्य वेदनेची किंकाळी निघाली. जखमेतून रक्ताची नवीन धार वाहू लागली. तात्यासाहेबांनी त्याचा फायदा घेत त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. पण शमशेरने त्या भयंकर वेदनेला आपल्या सुडाच्या आगीत भस्म करून टाकले. त्याने तात्यासाहेबांचा तो हात मनगटात पकडला आणि तो इतक्या जोरात पिरगळला की तात्यासाहेबांच्या हाडांचा कडकड असा आवाज झाला.

"तू इमामसाहेबांशी, हुसेनशी गद्दारी केलीस, एवढेच काय तर ज्या देशात राहत होतास त्या देशावरच उलटला होता. अगर तू स्वतःच्या देशाचा होऊ शकला नाहीस तर मग इतर कोणाचा काय होणार, माझा तर अजिबात तुझ्यावर विश्वास नाही. तात्या! तुझी जागा या जगात नाही, तुझी जागा फक्त आणि फक्त नरकात आहे." शमशेरचा सिंहगर्जने सारखा आवाज त्या बुरुजावर प्रतिध्वनित झाला.

आता तात्यासाहेबांचा पूर्ण धीर सुटला. मृत्यू आपल्या अगदी समोर उभा आहे हे पाहून ते शमशेरच्या पाया पडू लागले. त्यांच्या डोळ्यांतून खोट्या अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.

"शमशेर, मला माफ कर. होय, मीच हुसेनला मारण्याचा आदेश दिला होता... मीच इमामच्या गाडीत बॉम्ब ठेवला होता... मीच पोलिसांना खोटी टीप दिली होती. मी माझे सगळे गुन्हे कबूल करतो. पण मला मारू नकोस, मला प्राणाची भीक दे. मी माझे सगळे पैसे, जमिनी घरे तुला देऊन टाकतो, मला फक्त पोलिसांच्या स्वाधीन कर, पण जीव घेऊ नकोस." तात्यासाहेब जीवाच्या आकांताने ओरडत भीक मागत होते.

पण त्यांच्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरला होता. हुसेनचा प्रेमळ चेहरा शमशेरच्या डोळ्यांसमोर आला. शमशेरने आपल्या शरीरात उरलेली सर्व शेवटची ताकद गोळा केली. त्याने तात्यासाहेबांना त्यांच्या गळ्याशी आणि कमरेपाशी पकडले आणि आपल्या मजबूत हातांनी त्यांना थेट हवेत उंचावले. तात्यासाहेब हवेत हातपाय मारत ओरडत राहिले,

"नाही... शमशेर, नाही, तुम्हे तुम्हारे खुदा का वास्ता."

"आज तुला माझा देव आठवला का?"

शमशेरने एका जोरदार हुंकारासह तात्यासाहेबांना बुरुजाच्या लोखंडी रेलिंगवरून थेट खाली असलेल्या खोल खंदकात फेकून दिले.

शेकडो फूट उंचावरून हवेत गरगर फिरत तात्यासाहेब खाली असलेल्या तीक्ष्ण, अणकुचीदार राजस्थानी खडकांवर प्रचंड वेगाने आदळले. त्यांचा पाठीचा कणा आणि डोके जागीच छिन्नविच्छिन्न झाले. तात्यासाहेबांचा तो करुण, वेदनादायक आणि भयानक अंत पाहून वाळवंटातील वाराही क्षणभर थबकला. मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील एका मोठ्या, कपटी खलनायकाचा धडा आज कायमचा बंद झाला होता, तो पण त्याच्याच मित्राच्या अंगरक्षकांकडून, जो कधीकाळी त्याची स्वतः काळजी घेत असे.

दुसरीकडे, किल्ल्याच्या खालच्या मुख्य भागात आरडीएक्सच्या गोदामाला लागलेली आग आता नियंत्रणाबाहेर गेली होती. तिथले ट्रक्स पेटून उठले होते आणि कोणत्याही सेकंदाला संपूर्ण किल्ला हवेत उडेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

इन्स्पेक्टर सावंत यांनी गोदामातून निघणारे निळे-पिवळे जाळ पाहिले आणि त्यांनी तातडीने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले.

"इमामसाहेब! कमांडोज! आत्ताच्या आत्ता हा संपूर्ण परिसर रिकामा करा! गोदामात शमशेरने बॉम्ब लावला असेल आणि आरडीएक्सचा राहिलेला साठा कधीही जबरदस्त वेगाने फुटू शकतो! सर्वांनी बाहेर पळा, लवकर!" सावंतांचा खंबीर आणि आदेशात्मक आवाज संपूर्ण अंगणात घुमला.

सावंत स्वतः गुंडांना टिपत इमामसाहेबांना आणि त्यांच्या उरलेल्या माणसांना मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने, म्हणजेच किल्ल्याबाहेर सुरक्षित ठिकाणी बाहेर काढण्यासाठी धावपळ करू लागले. रॅन्चोही बाहेरून त्यांना सुरक्षित मार्गाचे मार्गदर्शन करत होता.

पण दुसरीकडे, प्रणव उत्तरेच्या बुरुजाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका लहान जिन्यावरून खाली उतरला होता. जिन्याच्या खाली बाहेर जाता येऊ नये म्हणून एक जड लोखंडी दरवाजा लावलेला होता. विक्रम शेठने बाहेरून तो जड, लोखंडी दरवाजा पूर्णपणे बंद केला होता, जेणेकरून कोणीही त्याचा पाठलाग करू शकणार नाही.

प्रणव त्या बंद दरवाजासमोर उभा राहिला. त्याच्या डोळ्यांत आपल्या बायकोला आणि मुलीला वाचवण्याची अथांग जिद्द होती. त्याने बाजूला पडलेली एक जड, लोखंडी मशीनगनची नळी उचलली आणि तो पूर्ण ताकदीने त्या जड लोखंडी दरवाजाच्या कडीच्या ठिकाणी प्रहार करू लागला.

धाड!... धाड!... धबडक!... त्याच्या प्रत्येक प्रहाराने दरवाजाची कडी सैल होऊ लागली.

एकीकडे तात्यासाहेबांना कंठस्नान घातलेला शमशेर, रक्ताने पूर्णपणे माखलेल्या अवस्थेत, त्या उंच बुरुजाच्या जमिनीवर कोसळला. त्याचे डोळे हळूहळू मिटत होते, पण त्याच्या चेहऱ्यावर कर्तव्य पूर्ण केल्याचे आणि हुसेनचा प्रतिशोध घेतल्याचे एक मोठे समाधान होते, आणि दुसरीकडे, एका प्रचंड मोठ्या अंतिम प्रहारासह प्रणवने विक्रम शेठने बंद केलेल्या त्या जड लोखंडी दरवाजाचा कडीचा भाग अर्धवट तोडला होता. कडी खाली पडून दरवाजा उघडला.

दरवाजासमोर एक लांब, काळोखाने झाकलेला रस्ता समोर आला. याच रस्त्यावरून विक्रम शेठ, अनघा आणि सईला ओलिस ठेवून पळून जात होता. तो त्या रस्त्यावरून पुढे  धावला, दूरवर एक लहान विजेरीचा प्रकाश दिसत होता. हा तोच होता ज्याच्याशी आता प्रणवला एकटे लढायचे होते. जिथे त्याचा सामना सर्वात मोठ्या महाखलनायकाशी विक्रम शेठशी होणार होता. ज्याच्याकडे सध्या त्याची बायको आणि मुलगी होती आणि त्यांचा जीव विक्रमच्या हातात होता.

क्रमशः

©®भालचंद्र नरेंद्र देव

सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.

ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.

copyright: ©® :


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →