भाग ९४: वाळवंटातील सावट
मुंबईतील त्या खाजगी बंगल्यातून झालेल्या भयंकर पराभवानंतर तात्यासाहेबांचे संपूर्ण जाळे विस्कळीत झाले होते. त्यांचे सर्वात विश्वासू गुंड मारले गेले होते, पोलीस आता त्यांच्या शोधात होते आणि इमामसाहेबांच्या साम्राज्याशी घेतलेला पंगा त्यांच्या अंगलट आला होता. अत्यंत जखमी, अपमानित आणि चवताळलेल्या अवस्थेत तात्यासाहेबांनी गुप्त मार्गाने भारताची सीमा ओलांडली आणि ते थेट नेपाळची राजधानी काठमांडू येथे पोहोचले. काठमांडूच्या एका अत्यंत सुरक्षित आणि एका अंधुक खोलीत ते एका मोठ्या सोफ्यावर बसले होते. त्यांच्या समोर पांढरा शुभ्र सुती कुर्ता घातलेला, हातात एक साधी सिगरेट घेतलेला एक माणूस बसला होता, तो होता विक्रम शेठ.
विक्रम शेठ... जो काही काळापूर्वी पडद्याआड गेला होता, तो आता नेपाळच्या भूमीवरून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज आणि बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या तस्करीचा मुख्य सूत्रधार बनत होता. संपूर्ण दक्षिण आशियातील गुन्हेगारी विश्वावर पुन्हा स्वतःची हुकूमशाही प्रस्थापित करण्याची त्याची गुप्त योजना अंतिम टप्प्यात होती.
"तात्यासाहेब, मुंबईचे राजे असूनही तुमची ही अवस्था?" विक्रम शेठने सिगरटेचा धूर हवेत सोडत उपहासाने विचारले.
तात्यासाहेबांनी दात ओठ खाल्ले. त्यांच्या डोळ्यांत सुडाची आग धगधगत होती. "विक्रम शेठ, त्या म्हाताऱ्या इमामने आणि त्याच्या त्या पाळीव कुत्र्याने, शमशेरने माझा घात केला, आणि तो जुना इन्स्पेक्टर सावंत अन् त्याच्यासोबत असलेला तो उपजिल्हाधिकारी तरुण पोरगा प्रणव... या चौघांनी मिळून माझे सगळे साम्राज्य उद्ध्वस्त केले. मला इमामचे साम्राज्य कोणत्याही परिस्थितीत संपवायचे आहे. मला तुझी मदत हवी आहे."
विक्रम शेठच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य उमटले. इमामसाहेबांचे भारतीय ठिकाणांवर असलेले वर्चस्व विक्रम शेठलाही नेहमीच खटकत होते. तात्यासाहेबांना आश्रय देणे म्हणजे स्वतःचा फायदा करून घेणे होते.
"तात्यासाहेब, तुम्ही माझा कितीही विश्वासघात केलात तरीसुद्धा मी तुमची नक्की साथ देईन, तुम्ही अजिबात काळजी करू नका. इमामसाहेब, शमशेर, प्रणव आणि सावंत... या चौघांना एकाच वेळी संपवण्यासाठी मी नेपाळमध्ये नाही, तर भारताच्याच एका सुरक्षित कोपऱ्यात असा सापळा रचीन, जिथून ते कधीच जिवंत परत जाऊ शकणार नाहीत. आपण आत्ताच्या आत्ता राजस्थानला निघतोय." विक्रम शेठने आपली नवी चाल खेळली होती. नेपाळवरून हे दोघे खलनायक आता राजस्थानच्या दुर्गम वाळवंटाच्या दिशेने रवाना झाले.
तिकडे मुंबईत, शमशेरच्या त्या मिलमधील अड्ड्यावर एका मोठ्या टेबलाभोवती सर्व जण एकत्र आले होते. इमामसाहेब आता पूर्णपणे बरे झाले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीचा अहंकार नव्हता, तर एक प्रचंड पश्चात्ताप होता. त्यांनी टेबलाच्या पलीकडे उभ्या असलेल्या प्रणवकडे पाहिले. ज्या तरुणाला त्यांनी स्वतःचा शत्रू मानले, ज्याच्यावर हुसेनच्या हत्येचा आळ आणला, त्यानेच त्यांच्या नातीचे प्राण वाचवले होते.
इमामसाहेब हळूहळू पुढे सरकले. त्यांनी प्रणवच्या खांद्यावर हात ठेवला, त्यांचे डोळे पाणावले होते. "प्रणव... माझ्या आयुष्यात मी खूप माणसे मारली, खूप चुका केल्या. पण तुझ्यासारख्या एका प्रामाणिक आणि धाडसी तरुणाला ओळखण्यात मी जी चूक केली, तिचं शल्य मला आयुष्यभर राहील. हुसेन माझ्या नातवासारखा होता, पण तूही माझ्यासाठी काही कमी नाहीस. माझ्या जुन्या चुकांबद्दल मला माफ कर, बेटा..." एका अथांग साम्राज्याचा मालक एक राष्ट्रविरोधी कारवाया करणारा दहशतवाद्यांचा म्होरक्या आज एका साध्या सरकारी काम करणाऱ्या तरुणासमोर नतमस्तक झाला होता.
प्रणवने तातडीने इमामसाहेबांचे हात धरले. "इमामसाहेब, असं म्हणून मला लज्जित करू नका. तुम्ही ईश्वरीचे आजोबा आहात, तुम्ही पोलिसांना शरण जा, म्हणजे तुम्हाला आणि ईश्वरीला देखील उजळत्या मानेने या देशात फिरता येईल. आपल्याला आता या सगळ्या जुन्या गोष्टी लक्षात घेऊन तात्यासाहेबांचा कायमचा काटा काढायचा आहे."
इमामसाहेब ईश्वरीच्या भल्यासाठी या गोष्टीला तयार झाले होते. ते भारतीय सरकारला शरण जाऊन सगळ्या चुकीच्या आणि वाईट गोष्टी बंद करून प्रत्येकाची माहिती त्यांना सांगणार होते, इतर देशविघातक कारवाया करणाऱ्या लोकांची नावे आणि ठिकाणे हे देखील ते सांगून ठेवणार होते.
ईश्वरी बाजूलाच उभी राहून हे सर्व पाहत होती, तिच्या डोळ्यांतूनही आनंदाश्रू वाहत होते. आता हे कुटुंब आणि प्रणव यांच्यात कोणताही संशय उरला नव्हता.
दुसरीकडे लॅपटॉपसमोर बसलेल्या रॅन्चोच्या बोटांची हालचाल वाढली. स्क्रीनवर डिजिटल ट्रॅकिंगच्या काही सिग्नल्स वेगाने ब्लिंक होऊ लागल्या.
त्याने आनंदाने पहिल्यांदा स्वतःच्या फोनवरून प्रवीणला फोन केला. "मला तात्यासाहेबांच्या त्या गुप्त सॅटेलाईट फोनचे लोकेशन ट्रॅक झाले आहे." रॅन्चो उत्साहाने ओरडला. "तात्यासाहेब नेपाळहून थेट भारताच्या हद्दीत आले आहेत. ते सध्या राजस्थानच्या खुरी गावात आहेत. हे गाव जैसलमेरपासून साधारण पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर, भारत-पाकिस्तान सीमेच्या अगदी जवळ वाळवंटात वसलेले आहे."
"राजस्थान? खुरी गाव?" इन्स्पेक्टर सावंत यांनी विचारले. त्यांचे डोळे चमकले. "तिथे तात्यासाहेब एकटे जाऊच शकत नाहीत. त्यांच्याकडे आता तेवढी ताकद उरलेली नाही. याचा अर्थ त्यांना कोणाची तरी मोठी मदत मिळते आहे."
रॅन्चोने कॉम्प्युटरवरील डेटा आणि जुन्या फाईल्स तपासल्या. "नेपाळ आणि पाकिस्तान सीमेवरून ड्रग्ज आणि हत्यारांची तस्करी करणारा एकच मोठा मासा आहे, ज्याची जुनी कनेक्शन या भागात आहेत... तो म्हणजे विक्रम शेठ. सावंत तात्यासाहेबांना आता विक्रम शेठ वाचवतो आहे आणि तोच या संपूर्ण प्रकरणाचा खरा सूत्रधार आहे."
सावंत यांनी टेबलावर जोरात हात मारला. "विक्रम शेठ! ज्याने आधी अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतला होता, तो अजूनही जिवंत आहे आणि या खेळाच्या मागे आहे. शमशेर, इमामसाहेब, आता आपल्याला खुरी गावात प्रवेश करावा लागेल. तिथेच या संपूर्ण पापाच्या साम्राज्याचा शेवट होईल!" सर्व जण मिळून तातडीने खुरी गावात प्रवेश करण्याची, तिथली भौगोलिक परिस्थिती समजून घेण्याची आणि शत्रूच्या गढीत घुसण्याची एक अत्यंत गोपनीय आणि युद्ध पातळीवरील योजना आखू लागले.
दोन दिवसांनंतर... राजस्थानी वाळवंटातील उष्णता आणि वाळूचे वादळ शांत झाले होते. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. खुरी गावाच्या वेशीवर, वाळूच्या मोठ्या ढिगाऱ्यांच्या आडोशाने दोन गाड्या येऊन थांबल्या. गाड्यांचे लाईट्स पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. गाडीतून प्रणव, सावंत, शमशेर आणि इमामसाहेबांचे काही निवडक कमांडोज स्थानिक राजस्थानी वेशभूषेत बाहेर पडले. त्यांनी डोक्यावर मोठे फेटे बांधले होते आणि अंगावर वाळवंटातील थंडीपासून वाचण्यासाठी जाड घोंगड्या पांघरल्या होत्या, ज्याच्या आत त्यांच्या अत्याधुनिक बंदुका लपवलेल्या होत्या.
"शमशेर, इथून पुढे आपल्याला पायी जावे लागेल. वाळूमध्ये गाड्यांचा आवाज खूप लांबपर्यंत जातो," सावंतांनी अत्यंत सावधगिरीने सांगितले.
प्रणवने दुर्बिण काढून अंधारात समोर पाहण्याचा प्रयत्न केला. खुरी गाव हे एरवी पर्यटनासाठी प्रसिद्ध असले, तरी या रात्री तिथे एक वेगळीच, रहस्यमय शांतता पसरली होती. गावाच्या मुख्य वस्तीपासून काही अंतरावर, वाळवंटाच्या छातीवर एक जुना, अथांग आणि प्रचंड मोठा किल्ला उभा असलेला दिसत होता. हा जुना गड किंवा गढी होती, जिची मालकी एका स्थानिक जमीनदाराकडे दाखवली जात असली, तरी प्रत्यक्षात तो विक्रम शेठचा सर्वात सुरक्षित आणि गुप्त अड्डा होता.
त्या किल्ल्याच्या बुरुजांवर टॉर्चचे प्रकाशझोत इकडेतिकडे फिरत होते. हा तोच किल्ला होता, जिथून विक्रम शेठ भारत-पाकिस्तान सीमेवरील छुप्या भुयारी मार्गांचा आणि उंटांच्या तांड्यांचा वापर करून, पाकिस्तानातून येणारे कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज आणि एके-४७ सारखी घातक शस्त्रे छुप्या पद्धतीने भारतात आणत असे आणि तिथून ती देशभरात पसरवत असे.
किल्ल्याच्या मुख्य दारापाशी पाकिस्तानचे सीमापार असलेले तस्कर, तात्यासाहेबांचे उरलेले गुंड आणि विक्रम शेठचे अत्याधुनिक शस्त्र सज्ज असलेले आंतरराष्ट्रीय कमांडोज गस्त घालत होते. आज त्या दुर्गम वाळवंटातील ठिकाणावर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारे सारे खलनायक एकत्र आले होते. ते सर्व जण मिळून प्रणव, सावंत यांना याच वाळवंटात कायमचे गाडून टाकण्याचा अंतिम सापळा रचून बसले होते.
प्रणवने दुर्बिण खाली घेतली आणि त्याचे डोळे रागाने लाल झाले. "सर, समोर बघा... तोच तो चक्रव्यूह आहे. सगळे लांडगे एकाच ठिकाणी जमा झाले आहेत. आज या वाळवंटाची माती त्यांच्या रक्ताने लाल होणार!"
क्रमशः
©®भालचंद्र नरेंद्र देव
सदर कथेचे लिखाण सुरू आहे, पुढील भाग नियमितपणे इरा फेसबुक पेज वर येतील, त्यामुळे पेजला फॉलो करून ठेवा.
ता क: ही कथा पुस्तक काल्पनिक आहे. यातील नावे, पात्रे, स्थळे आणि घटना या लेखकाच्या कल्पनेचा अविष्कार आहेत किंवा काल्पनिक पद्धतीने ती योजली आहेत. कोणाही जिवंत वा मृत व्यक्तीशी, घटना प्रसंगाशी किंवा ठिकाणांशी त्यांचे साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
सर्व हक्क राखीव आहेत, लेखकाच्या स्पष्ट लेखी परवानगीशिवाय या प्रकाशनाचा कोणताही भाग कोणत्याही स्वरूपात किंवा कोणत्याही प्रकारे पुनरुत्पादित किंवा कॉपी केला जाऊ शकत नाही किंवा कोणत्याही डिस्क, टेप, मीडिया किंवा इतर माहिती स्टोरेज डिव्हाइसवर हस्तांतरित किंवा पुनरुत्पादित केला जाऊ शकत नाही. पुस्तक परीक्षणातील संक्षिप्त अवतरण वगळता.
