Login

कॉल भाग-१

कॉलमुळे घरात निर्माण झालेल्या कौटुंबिक वादळाची कथा !
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: कॉल भाग-१

शर्व आणि माया ह्यांचे लग्न होऊन एक महिना झाला होता.

"दोघेही नीट रहा." असा सल्ला त्यांना त्यांच्या घरच्यांनी दिला होता.

दोघांचेही काम हे दुसऱ्या शहरात असल्याने त्यांनी तिकडेच घर घेतले होते. त्यांच्या आईवडिलांना काळजी असल्याने ते दोघांना दररोज फोन करत असत.

" शर्व, आज मी खूप थकले आहे. " ऑफिसमधून आल्या आल्या ती म्हणाली.

" ठीक आहे. मग जेवायला बाहेर जाऊ. " तो म्हणाला.

" नको, मी खिचडी भात बनवू का?" तिने विचारले.

" हो, पण जास्त बनव. तू छान बनवतेस." तो म्हणाला.

तिने पटकन खिचडी भात बनवला तेवढ्यात नेहमीप्रमाणे त्यांना फोन आला.

" काय रे जेवलात का? " शर्वच्या आईने विचारले.

" आता जेवतच होतो. " त्याने आपल्या आईला सांगितले.

तेवढ्यात कॉल कट करून त्यांनी व्हिडिओ कॉल लावला होता.

"काय माया? काय जेवण बनवलेस?" सासऱ्यांनी विचारले.

तेवढ्यात सांगण्यापेक्षा आपण दाखवूया म्हणून शर्वने फ्रंट कॅमेरा चालू होता तो बॅक कॅमेरा करून जेवणाचे ताट दिसेल असा दाखवला.

"काय हे फक्त खिचडी? " शर्वच्या आईला बिल्कुल आवडले नव्हते.

"हो, आज खिचडी भात केला आहे." त्याने हसून सांगितले.

"अरे पूर्ण जेवण जेवायला हवे ना." व्हिडिओ कॉल वरून त्याचे आई-वडील म्हणाले.

हे ऐकून मायाचा चेहरा खाली पडला.

" आज हेच खायचे होते म्हणून बनवले." पुन्हा हसतच शर्व म्हणाला.

पुढे फक्त तोच आपल्या आईवडिलांशी बोलत होता.
माया फक्त चेहऱ्यावर स्मित हास्याचा मुखवटा ठेवून मोजकेच बोलत होती.

पटकन सर्व आवरून मायाने आपले अंथरुण हॉलमध्ये टाकून त्यावर झोपली गेली.

खूप वेळ होऊनही आपली बायको खोलीत आली नाही, म्हणून खोलीतून बाहेर तिला बघण्यासाठी तो आला, तर बाहेर माया झोपलेली पाहून तो आपल्या खोलीत पुन्हा झोपायला गेला.

सकाळी लवकर उठून मायाने नाश्ता बनवला आणि डब्बा घेऊन दोघेही ऑफिसला निघून गेले.

संध्याकाळी बाजारातून तिने सर्व भाज्या आणल्या. सुक्की भाजी, आमटी, चपाती, कोशिंबीर, भात सर्व जेवण तिने बनवले.

रात्री आधी तिच्या आईचा फोन आला त्यानंतर त्याच्या आईवडिलांचा कॉल आला.

त्यावेळीही त्याने जेवणाचे ताट दाखवले. त्यावर ती भाजी  सासूबाईंच्या पद्धतीने कशी बनवायची ह्यावरच त्यावेळीच्या कॉलची शेवटी सांगता झाली.

" तुला माझे जेवण आवडत नाही का?" तिने विचारले.

" आवडते ना ? तू का मला असे विचारत आहेस ?"  तिने असा का प्रश्न विचारला म्हणून न राहून त्याने विचारले.

"मी कसेही जेवण बनवले तरी तुझ्या आईला आवडत नाही. नेहमी मला नको ते सल्ले देत असतात. " ती नाराज होऊन म्हणाली.

" अगं, तू ऐकून घेऊन सोडून दे. " तो म्हणाला.

" हो, तुला काय जाते सोडून दे म्हणायला. त्यापेक्षा तूच  का त्यांना समजावत नाहीस ? " ती त्याला थोडी रागात म्हणाली.

" अगं, त्यांना आपली काळजी वाटते , म्हणून ते विचारत असतात. " तो एवढा काही हा गंभीर मुद्दा नाही, असे वाटून म्हणाला.

" आपली नाही फक्त तुझी. " असे म्हणून तिने खोलीत जाऊन आतून दाराला कडी लावली.

कालही तो एकटाच झोपला होता आणि आजही त्याला एकटेच झोपावे लागणार हे त्याला आता कळून चुकले होते.

' प्रत्येकवेळी काय , काय बनवले? कसे बनवले आणि असे का नाही बनवले म्हणून विचाराचे? सून काय स्वतः एकटी खाऊन मुलाला उपाशी ठेवते का ? नवऱ्याला पण सर्व व्हिडिओकॉलमध्ये दाखवायचे असते. मलाच ऐकून गप्प बसावे लागते.' एकटीच स्वतःशी बडबडत ती म्हणाली.

दुसऱ्यादिवशी चहा-नाष्टा काहीच न बनवता ती लवकरच ऑफिससाठी निघून गेली.

शर्वला आता कुठे परिस्थितीचे गांभीर्य समजले होते. लग्न होऊन एकच महिना झाला होता आणि तेवढ्यात खटके उडायला लागले, हे पाहून त्याला सुद्धा त्यांच्या नात्याविषयी चिंता वाटायला लागली.

क्रमशः

पुढे काय होईल ?

© विद्या कुंभार

कथेचा भाग आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा.

(सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत. कोणत्याही प्रकारे कथेतील मजकूर, भाग किंवा काहीही कॉपी करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.)
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →