Login

काचेचा संसार (अंतिम भाग)

Story Of Megha's Broken Life
काचेचा संसार (अंतिम भाग)

       घरातील लोकांचा आणि आनंदचा खोटेपणा समोर आल्यावर मेघा पूर्णपणे कोलमडली होती... वडिलांच्या निधनानंतर मेघा आणि प्रांजलला त्यांच्या आईनेच अत्यंत कष्टाने मोठे केले होते. वडिलांच्या जाण्यानंतर प्रांजल(मेघाची बहीण) आणि आई दोघीच एकत्र राहत होत्या. मेघाला सासरच्या छळाबद्दल सांगून आईला त्रास द्यायचा नव्हता, पण शेवटी आई ती आईच असते. मेघाचा फोनवरचा बदललेला आवाज आणि तिचे माहेरी येणे टाळणे यावरून आईच्या मनात शंका आली. आईने प्रांजलला सांगितले, "प्रांजू, मेघा काहीतरी लपवतेय. तिची तब्येत आणि मन दोन्ही ठीक नाहीयेत. तू तिची चौकशी कर." प्रांजल पुण्यातच एका  बँकेत काम करत होती. ती सुशिक्षित आणि प्रॅक्टिकल होती. प्रांजलने जेव्हा मेघाला विश्वासात घेऊन विचारले, तेव्हा मेघाचा बांध फुटला. तिने रडत रडत प्रांजलला आनंदचे अफेअर आणि सासरच्या लोकांनी तिलाच दिलेला दोष सांगितला.

     प्रांजलने हे सर्व आईला सांगितले. सुरुवातीला आईचे काळीज हेलावले. एक आई म्हणून तिला वाटले की मेघाचा संसार मोडू नये, तिने प्रांजलला म्हटले, "प्रांजू, दोन लहान मुलं आहेत मेघाला. आनंदला समजावून सांगता येईल का गं? संसार मोडला तर पोरांचं कसं होईल?" पण जेव्हा प्रांजलने आईला सांगितले की आनंद गेल्या ४ वर्षांपासून फसवतोय आणि त्याचे घरचे मेघालाच नालायक ठरवत आहेत, तेव्हा त्या माऊलीचे अश्रू सुकले. आईचा मातृत्वाचा अभिमान जागा झाला. तिने रडत पण खंबीरपणे प्रांजलला सांगितले, "नाही! माझ्या मुलीने असल्या नरकात राहून स्वतःला मारण्याची गरज नाही. बाबा नसले तरी आपण दोघी तिच्या पाठीशी उभे राहू."

      आईचा आणि प्रांजलचा खंबीर पाठिंबा मिळाल्यावर मेघाच्या मनात एक नवा आत्मविश्वास जागा झाला. प्रांजलने बँकेत काम करत असल्यामुळे अनेक कायदेशीर गोष्टी पाहिल्या होत्या. तिला माहीत होते की, खऱ्या जगात लग्न करून स्वतःला झिजवणाऱ्या सुनेच्या नावावर सासरचे लोक काहीच ठेवातात नाही. प्रांजलने मेघाला व्यावहारिक सल्ला दिला, "ताई, आनंदच्या नावावर काय आहे याच्याशी आपल्याला देणेघेणे नाही. तू सगळ्यात आधी तुझे स्त्रीधन, म्हणजेच माहेरून तुला आणि मुलांना मिळालेले सगळे दागिने आणि सोने आनंदच्या नजरेआड सुरक्षित ठिकाणी ठेव....
     " प्रांजलने पुढे सांगितले की पैशांची काळजी करू नकोस. बाबा गेल्यापासून मी तुझ्या आणि दोन्ही मुलांच्या भविष्याची काळजी म्हणून माझ्या पगारातून काही फिक्स डिपॉझिट्स (FD) आणि म्युच्युअल फंड्स सुरू केले होते, ज्याची नॉमिनी आणि मालक फक्त तू आणि मुलं आहात. आनंद किंवा त्याच्या घरच्यांना याबद्दल काहीच माहीत नाही. हाच पैसा तुला या संकटातून बाहेर काढेल."

     प्रांजलच्या या दूरदृष्टीमुळे मेघाला एक मोठी मानसिक आणि आर्थिक ताकद मिळाली. आता मेघा घरात शांत होती, पण ती हताश नव्हती; तर ती योग्य वेळेची वाट पाहत होती. तिने स्वतःला घरात कोंडून घेतले होते. कोणाशीही बोलणे तिने बंद केले होते. सोसायटीचे कार्यक्रम असोत की नातेवाईकांचे सण, मेघाने कुठेही जाण्यास साफ नकार दिला. ती फक्त एखाद्या यंत्रासारखे घरचे काम करायची आणि शांत राहायची.

    आनंद मात्र अजूनही सुधारला नव्हता, त्याचे रियासोबत बाहेर फिरणे सुरूच होते. त्याला वाटत होते की मेघा हतबल आहे आणि ती कधीच तोंड उघडणार नाही. एक दिवस आनंद आणि रिया एका मॉलमध्ये कॅफेबाहेर उभे होते. स्वतःला मेंटेन ठेवलेला आनंद रियाच्या कंबरेत हात घालून, अत्यंत जवळीक साधत तिच्याशी हसून बोलत होता. दुर्दैवाने, त्याच वेळी आनंदच्या मोठ्या बहिणीचे सासू, सासरे आणि नणंद तिथे खरेदीसाठी आले होते. त्यांनी आनंदला दुसऱ्याच एका मुलीसोबत अशा अवस्थेत रंगेहाथ पाहिले. त्यांनी तिथे कोणताही तमाशा केला नाही, पण ते संतापून घरी परतले. त्या रात्री मोठ्या नणंदेच्या सासरी प्रचंड राडा झाला. तिच्या सासूने संपूर्ण घरासमोर तिची लाज काढली, "तुझा भाऊ मोठा आयटी वाला आणि स्टायलिश बनून फिरतो, पण लक्षणं काय तर बाहेर पोरी उडवतो! अशा कुलछनी आणि स्वार्थी घराण्यातली मुलगी आमच्या घरात सून म्हणून आलीय, आमची अब्रू वेशीवर टांगली तुमच्या भावाने." सासरच्या टोमण्यांनी आणि अपमानाने रडत रडत मोठ्या बहिणीने रात्रीच माहेरी फोन केला आणि आई-वडिलांना व आनंदला खूप सुनावले.

    आनंदचे आई-वडील जे आधी आपल्या मुलाची पाठराखण करत होते, ते आता मुलीच्या संसारात मिठाचा खडा पडल्यामुळे आणि समाजात अब्रू गेल्यामुळे हवालदिल झाले. त्यांना आता समजले की आनंदच्या एका चुकीमुळे त्यांच्या स्वतःच्या मुलीचे आयुष्य धोक्यात आले होते.

   घरात हा सगळा तमाशा सुरू असतानाच, दुसऱ्या दिवशी रिया थेट आनंदच्या घरात याऊन धडकली. तिने सांगितले की आनंदने तिला लग्नाचे आणि लिव्ह-इनचे खोटे आश्वासन दिले होते. जर आनंद तिच्यासोबत आला नाही, तर ती पोलिसात केस करेल. हॉलमधील वातावरण आता पूर्णपणे तापले होते. सासूबाई आणि नणंद रियाच्या पाया पडत होत्या, पण ते काळजीपोटी नव्हते, तर समाजात आपली अब्रू वेशीवर टांगली जाऊ नये म्हणून!

     तितक्यात प्रांजल आणि तिची आई तिथे आल्या. मेघाने आरव आणि सियाचा हात पकडला आणि अत्यंत शांतपणे म्हणाली, "मी या घरात आता एक क्षणही राहणार नाही. मी आनंदला घटस्फोट देणार आहे." 'घटस्फोट' हा शब्द ऐकताच सोफ्यावर बसलेला आनंद धावत मेघाजवळ आला आणि तिचे हात पकडण्याचा प्रयत्न करत रडू लागला, "मेघा, प्लीज असं करू नकोस. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मैं रियाशी सगळे संबंध तोडून टाकेन, मला फक्त एक शेवटचा चान्स दे! मुलांच्या भविष्याचा विचार कर." आनंदचा हा ड्रामा पाहून सासू-सासरे आणि आलेल्या नणंदेचा सूरही क्षणात बदलला.
   सासूबाई मेघावर खेकसल्या, "बघ, माझा मुलगा स्वतःहून पाय धरतोय ना तुझे? मग कसला आलाय घटस्फोट? आमच्या घराण्याची इज्जत घालवायचीय का तुला?" सासरे पुढे आले आणि उपरोधाने हसत म्हणाले, "डोक्यावर बापाचं छत्र नाही, घरात फक्त एक म्हातारी आई आहे! एका बँकेत नोकरी करणाऱ्या लहान बहिणीच्या जोरावर दोन मुलं कशी या वयात सांभळणार तू? माहेरी कोण पुरुष आहे तुझ्या पाठीशी उभा राहायला? रस्त्यावर येशील!"

   त्यांचा हा माज पाहून मेघाच्या डोळ्यात आता संताप होता. तिने आनंदचा हात झटकला आणि म्हणाली, "चान्स? गेली पाच वर्षे तू मला आणि या मुलांना फसवताना एका बापाचा विचार केला होतास? आज पोलिसांची भीती समोर उभी आहे म्हणून तू मुलांचे नाव पुढे करतोयस!
   " प्रांजलच्या आईने पुढे होऊन सासरच्यांना ठणकावून सांगितले, "तुमचा हा पुरुषी अहंकार आणि माज आता बाजूला ठेवा. माझ्या मुलीच्या पाठीशी पुरुष नाही म्हणून ती हतबल आहे असं समजू नका. ती एकटी नाही, तिची ही बहीण आणि तिची आई तिच्या पाठीशी खंबीर उभ्या आहेत."
  
   मेघा आनंद कडे आणि सासू-सासऱ्यांकडे पाहत धीरगंभीर आवाजात म्हणाली, "तुम्हाला तुमच्या मुलाच्या पापामुळे गेलेल्या इज्जतीची काळजी आहे, माझ्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याची नाही. मुलांचा खर्च कसा करायचा आणि त्यांना कसं मोठं करायचं, हे मी आणि माझी बहीण बघून घेऊ. पण तुमच्या या पोकळ आणि विषारी घरात मी माझ्या मुलांना वाईट संस्कारात वाढवणार नाही.

तेवढ्यात सासू सासरे म्हणायला लागले...मुलांवर आमचा हक्क आहे आणि त्यांना विचारले का तू की त्यांना कुणाकडे राहायचे आहे ते....तेवढ्यात आरव आणि सिया रडत मेघाकडे गेले आणि तिला बिलगुन रडू लागले... यावरून लक्षात आले होते की त्यांना यांचा कडे थांबायचे न्हवते... लहान मुलांवर खूप दडपण यायला लागले होते... मेघाने दोघांना सांभाळले...त्यांचे डोळे पुसले...

" मेघाने सोन्याचे दागिने आधीच सुरक्षित केले होते. तिने प्रांजल आणि आईचा हात पकडला आणि आरव व सियाला घेऊन त्या घराचा उंबरठा कायमचा ओलांडला. मागे फक्त खोट्या प्रतिष्ठेचा माज असलेले, पोलिसांच्या भीतीने थरथरणारे सासरचे लोक उरले होते... नणंद सुद्धा त्यांच्या सासरच्या भीतीने समजाऊन निघून गेल्या...

   मेघा घर सोडून गेल्यावर आनंदच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने नरक सुरू झाला. रियाला समजले की आनंद आता घरापासून आणि पैशांपासून पारखा झाला आहे, शिवाय पोलिसांच्या केसची तलवार डोक्यावर आहे. स्वतःचा बचाव करण्यासाठी रियाने एक अत्यंत क्रूर पाऊल उचलले. तिने आनंदच्या आयटी कंपनीच्या 'एचआर (HR)' आणि सीनियर मॅनेजमेंटला दोघांचे चॅट्स, ईमेल्स आणि एकत्र असलेले फोटो पुराव्यासहित पाठवून दिले. तिने तक्रार केली की आनंदने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचा मानसिक छळ केला आहे...आणि शारीरिक जवळीक निर्माण केली होती....
   दुसऱ्याच दिवशी कंपनीने आनंदला तातडीने निलंबित (Suspend) केले. ऑफिसमध्ये त्याची प्रचंड थट्टा आणि नाचक्की झाली. जे सहकारी कालपर्यंत त्याच्या फिटनेस आणि स्टाईलचे कौतुक करायचे, ते आता त्याच्याकडे पाहून थुंकू लागले होते. रिया त्याला सोडून कायमची निघून गेली. कंपनीतून काढल्यामुळे आनंदचा पगार बंद झाला, सोसायटीत त्याची बदनामी झाली आणि सासू-सासरे ज्या 'इज्जती'साठी जगत होते, ती अब्रू वेशीवर टांगली गेली. आनंद घरात मद्यधुंद अवस्थेत पडून राहू लागला. स्वतःच्या सुखासाठी दुसऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या आनंदला निसर्गाने त्याच्याच कर्माची फळे दिली होती.

    दुसऱ्या बाजूला, कोर्टात घटस्फोटाची आणि मुलांच्या कस्टडीची केस सुरू झाली. आनंद आणि त्याच्या वकिलाने कोर्टात मेघाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला, "मेघा फक्त एक गृहिणी आहे, तिला कोणतेही उत्पन्न नाही. ती एका म्हातारी आई आणि बँकेत काम करणाऱ्या बहिणीच्या तुकड्यांवर जगतेय. ती मुलांना चांगले भविष्य देऊ शकत नाही, म्हणून कस्टडी वडिलांना मिळावी." आनंदचा हा खोटा युक्तिवाद ऐकून मेघाच्या डोळ्यात पाणी आले, पण प्रांजलने तिला सावरले. प्रांजल आणि तिच्या आईने आधीच एक मोठी योजना आखली होती. प्रांजलने तिच्या बँकेच्या मदतीने आणि स्वतःच्या बचतीतून मेघाला पुण्यातच एक 'होम केटरिंग आणि बुटीक'चा स्वतःचा बिझनेस सुरू करून दिला होता.

    मेघाच्या हाताला चव होती आणि प्रांजलने त्याला बिझनेसचे रूप दिले होते. मेघाच्या वकिलाने कोर्टात मेघाच्या कंपनीचे पेपर्स, तिचे बँक स्टेटमेंट्स आणि प्रांजलने तिच्या नावावर केलेल्या फिक्स डिपॉझिट्स (FD) चे पुरावे सादर केले. कोर्टाला स्पष्ट दिसले की मेघा आता परावलंबी नाही, तर एक यशस्वी महिला उद्योजक आहे.
    कोर्टाने आनंदची वाईट वर्तणूक ...त्यासोबत एकदा आनंद दारू पिऊनच कोर्टात आला ते बघून आणि नोकरी गेल्याची पार्श्वभूमी पाहून आणि मुलांना कोर्टात विचारल्या गेले की ते कुणाकडे राहणारा तर मुलानी आई कडे राहू असे सांगितले त्यामुळे मुलांची संपूर्ण कस्टडी मेघाला दिली आणि आनंदला दणका दिला.

    कोर्टातून बाहेर पडताना आनंदने मेघासमोर हात जोडले, पण मेघाने त्याच्याकडे न पाहता आपल्या मुलांचे हात पकडले. 'काचेचा संसार' फुटला होता, पण त्यातून मेघाने नवीन मार्ग निर्माण केला होता....

समाप्त

स्नेहा डाखरे

कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा....आणि फॉलो करा...


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →