Login

काचेचा संसार (भाग१)

Story Of Megha's Broken Life

            काचेचा संसार (भाग१)

    चाळीशीत पाऊल ठेवलेला आनंद पाहिला की कोणालाही त्याचा हेवा वाटावा असेच त्याचे व्यक्तिमत्त्व होते... एका मोठ्या आयटी कंपनीत सीनियर पोझिशन वर असलेल्या आनंदने स्वतःला खूप जपले होते. रोज पहाटे न चुकता जिम, प्रोटीन शेक आणि कॅलरी मोजून जेवणे हा त्याचा कडक दिनक्रम होता.... वयाची चाळीशी गाठली तरी त्याच्या शरीरावर कुठेही अतिरिक्त चरबी नव्हती. ब्रँडेड कपडे, महागडे परफ्युम आणि प्रत्येक गोष्टीतील परफेक्टनेस ही त्याची ओळख होती.... ऑफिसमधील तरुण मुलीही त्याच्या या 'कॅज्युअल पण डॅशिंग' लूकवर फिदा असायच्या... स्वतःला इतके मेंटेन ठेवण्यामागे त्याचे काय गुपित आहे, हे मात्र कोणालाच ठाऊक नव्हते.

    घरी त्याचे एक सुखी, पारंपरिक कुटुंब होते. पत्नी मेघा सरळमार्गी आणि साधी होती....आनंदचा संसार, त्याचे आई-वडील आणि ५ वर्षांचा आरव व ३ वर्षांची सिया यांच्यातच तिचे आयुष्य सामावले होते....आनंदला दोन बहिणी होत्या, ज्या आपापल्या सासरी सुखी होत्या. आई-वडीलही मुलाच्या या सुखी संसारावर खूश होते. मेघा घर इतके छान सांभाळायची की आनंदला कौटुंबिक जबाबदाऱ्यांची कधी चिंताच करावी लागली नाही. आनंद मात्र घरातही नेहमी आपल्या फोनमध्ये आणि लॅपटॉपमध्ये व्यग्र असायचा. मेघाला वाटायचे की आयटी क्षेत्रात कामाचा ताण जास्त असतो, म्हणून ती कधी त्याच्यावर संशय घेत नसे. पण आनंदच्या या नीटनेटकेपणाच्या आणि स्टायलिश राहणीमानाच्या मागे एक वेगळेच वादळ दडले होते.....

     शनिवारची ती संध्याकाळ नेहमीसारखीच शांत होती... आनंद नुकताच जिममधून येऊन फ्रेश झाला होता. पांढऱ्या रंगाचा ब्रँडेड टी-शर्ट आणि ट्रॅक पँटमध्ये त्याची कमावलेली बॉडी उठून दिसत होती. महागड्या परफ्युमचा सुगंध घरात दरवळत होता. मुले हॉलमध्ये खेळत होती आणि सासू-सासरे टीव्ही पाहत होते. मेघा किचनमध्ये चहा करत असताना आनंदचा फोन डायनिंग टेबलवर वाजला. आनंद बाथरूममध्ये असल्याने मेघाने सहज फोन उचलला. स्क्रीनवर नंबर सेव्ह नव्हता.

"हॅलो, आनंद..." समोरून एका तरुण स्त्रीचा आवाज आला.तिचा आवाज खूप चिडलेला आणि अस्वस्थ वाटत होता.

मेघा म्हणाली, "हो, ते वॉशरुममध्ये आहेत. कोण बोलतंय?" समोरून दोन सेकंद शांतता पसरली. मग ती स्त्री काहीशी गडबडत पण उद्वेगाने म्हणाली,

"मी रिया बोलतेय. आनंदला सांगा की त्याचा फोन का स्विच ऑफ येतोय? त्याने जे प्रॉमिस केलं होतं, ते तो विसरला का? जर तो आज रात्री मला भेटायला आला नाही, तर गाठ माझ्याशी आहे!" मेघाने आश्चर्याने विचारले, "पण तुम्ही कोण आहात आणि काय प्रॉमिस?" त्यावर समोरून फोन कट झाला.

    मेघा तिथेच थबकली... आनंद तर घरीच होता, मग त्याचा फोन स्विच ऑफ कधी होता? आणि ही रिया इतक्या अधिकाराने काय मागत होती? आनंद बाहेर आला, तेव्हा मेघाने त्याला विचारले, "कोणाचा तरी रियाचा फोन होता, खूप चिडली होती."

'रिया' हे नाव ऐकताच आनंदच्या या देखण्या चेहऱ्याचा रंग उडाला. पण लगेच स्वतःला सावरत तो हसला, "अरे ती... ती आमच्या नवीन क्लायंटची मॅनेजर आहे. प्रोजेक्टच्या डेडलाईनमुळे वैतागली असेल. मी बघतो." आनंदने फोन घेतला आणि तो बाल्कनीत निघून गेला.

     मेघाच्या मनात पहिल्यांदाच संशयाची पाल चुकचुकली....त्या कॉलनंतरचे दोन दिवस मेघासाठी नरकासारखे होते. आनंद नेहमीपेक्षा जास्त सावध वागत होता. तो फोन कधीच नजरेआड करत नव्हता, अगदी बाथरुममध्येही सोबत घेऊन जात होता. त्याचा हा अति-काटेकोरपणा मेघाचा संशय आणखी वाढवत होता. कोणासाठी नटतोय हा माणूस? कोणासाठी स्वतःला इतकं मेंटेन ठेवतोय?आणि कोण ती मुलगी?  हे प्रश्न तिला सतावत होते.

    सोमवारी रात्री आनंद गाढ झोपला होता. मेघाच्या मनात चालू असलेल्या वादळामुळे तिला डोळाही लागत नव्हता. तिने हळूच गादीवरून उठून टेबलवर ठेवलेला आनंदचा फोन उचलला. फोनला फिंगरप्रिंट लॉक होते. तिने अत्यंत सावधगिरीने आनंदचा हात घेतला आणि त्याचा अंगठा फोनच्या सेन्सरवर ठेवला. स्क्रीन लॉक 'क्लिक' करून उघडली. मेघाचे हृदय जोरात धडधडत होते. तिने आधी व्हॉट्सॲप आणि गॅलरी तपासली, पण तिथे काही नव्हते. आनंदने सगळा डेटा हुशारीने लपवला होता. शेवटी तिने इन्स्टाग्राम उघडले. तिथे आनंदचे एक 'प्रायव्हेट अकाऊंट' लॉगइन होते, ज्याबद्दल मेघाला कधीच माहीत नव्हते. ते अकाऊंट उघडताच मेघाच्या पायाखालची जमीन सरकली. तिथे आनंद आणि त्याच 'रिया'चे शेकडो रोमँटिक फोटो होते. जिममधील एकत्र वर्कआउटचे फोटो, फाईव्ह स्टार हॉटेल्समधील पार्ट्या आणि विकेंड ट्रिप्स... गेल्या ५ वर्षांचा इतिहास तिथे पुराव्यांसह जिवंत होता. चॅट्स वाचताना मेघाचा श्वास कोंडला. आनंदने रियाला लिहिले होते, "मी मेघाला संशय येऊ न देता लवकरच तुझ्यासोबत लिव्ह-इनमध्ये राहायला शिफ्ट होईन. आपण नवीन फ्लॅट घेऊ."

    मेघाला आता समजले की रियाने शनिवारी फोन का केला होता ते , आनंद लिव्ह-इनमध्ये राहायचे वचन देऊन टाळाटाळ करत होता, तर रिया त्याचा हट्ट धरून बसली होती. ज्या नवऱ्याला तिने देव मानले, ज्या संसारासाठी स्वतःला झिजवले, त्या संसाराचा पायाच गेली चार वर्षे खोटेपणावर उभा होता. ती तिथेच श्वास रोखून उभी राहिली आणि बाथरूम मध्ये जाऊन नळ सुरू करून ढसाढसा रडली...

    रात्रीचा धक्का पचवून तिने स्वतःला कसेबसे सावरले होते. मुले स्कूल बसमध्ये बसून निघून गेली. सासू सासरे देवघरात पूजा करण्यासाठी गेले. हॉलमध्ये आता फक्त आनंद आणि मेघा होते. आनंदने शर्ट घातला, परफ्युम मारला आणि ऑफिसला निघण्यासाठी गाडीची चावी उचलली. तो नेहमीसारखाच परफेक्ट दिसत होता, पण मेघाला आता त्या चेहऱ्याचा तिटकारा येत होता. "आनंद, जरा इकडे या..." मेघाचा आवाज कमालीचा शांत पण धारदार होता. मेघाने आपला फोन काढला आणि रात्री घेतलेले चाट चे फोटो थेट आनंदच्या तोंडावर धरले.

    स्क्रीनवर त्याचे आणि रियाचे फोटो व चॅट्स पाहून आनंदच्या पायाखालची जमीन सरकली. पण कॉर्पोरेट जगतात वावरणारा आनंद लगेच स्वतःचा बचाव करायला लागला,
 
  "मेघा, तू विनाकारण संशय घेते आहेस!" पण चॅट्स समोर असल्यावर आनंद निरुत्तर झाला.

   तो घाबरला आणि अचानक मेघाचे पाय पकडून गयावया करू लागला, "माझ्याकडून चूक झाली मेघा. प्लीज मला माफ कर, आपल्या मुलांचा विचार कर." इतक्यात आनंदचे आई-वडील  तिथे आले... मेघाने न रडता तो फोन सासू-सासऱ्यांच्या हातात दिला. तिला वाटले होते की तिचे हसते-खेळते कुटुंब तिच्या पाठीशी उभे राहील, पण सासूबाईंनी फोन बाजूला ठेवत थंडपणे मेघाकडे पाहिले.

    "मेघा, पुरुषांच्या आयुष्यात अशा गोष्टी होत राहतात. तो इतका मोठा ऑफिसर आहे तो, देखणा आहे....बाहेरच्या मुली अशा स्टायलिश पुरुषांच्या मागे लागतातच यात आनंदची काय चूक?" सासरे आणि सासुनी आनंदचीच बाजू घेतली.

   "घरात कशाची कमतरता आहे? तू दिवसभर घरातच असतेस, स्वतःकडे लक्ष देत नाहीस. तू स्वतःला आनंदच्या तोडीस तोड ठेवू शकली नाहीस, म्हणून तो बाहेर गेला! जास्त ताणलंस तर संसार तुटेल, गप्प राहा." मेघा थक्क होऊन या कुटुंबाचा खरा चेहरा पाहत राहिली...

क्रमशः


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →