मुलगा की मुलगी?

मुलगा की मुलगी मनामध्ये द्वंद्व निर्माण झाल्यावर मांडलेली एका आईची व्यथा!
शॉर्टफिल्म लेखन स्पर्धा जुलै २०२६

शीर्षक: मुलगा की मुलगी?

प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

गीता गरोदर होती आणि नुकताच दुसरा महिना लागला होता. ऑफिसमधून तिने सुट्टी घेतली होती, तसेच तिला डॉक्टरांनी बेडरेस्ट घ्यायला सांगितली होती.

गीताचा नवरा श्लोक हा खूप दिवस झाले निरीक्षण करत होता त्याने न राहून त्या विषयावर बोलण्याचे ठरवले.

" गीता, काय झालं आहे ? तू रात्रीची झोपत सुद्धा नाहीस आणि कुठल्यातरी विचारामध्ये मग्न असते, असे मला दिसत आहे."  श्लोकने काळजीने विचारले.

" काही नाही, असंच थोडी अंगदुखी आता सुरू झाली आहे. त्यामुळे कधी कधी रात्रीची झोप लागत नाही." तिने त्यावर उत्तर दिले.

श्लोकला काही ते उत्तर पटले नव्हते, त्यामुळे आता आपण जास्तच विचारलं तर पुन्हा चिडचिड करेल म्हणून त्याने शांत राहण्याचा विचार केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी श्लोक, ऑफिसला जाण्यासाठी निघाला होता. तेव्हा तो गीताला आवाज देणार तेवढ्यात त्याने बघितले की ती खूप वेळ झालं, हातामध्ये चहा घेऊन तशीच बसली होती.

आता मात्र तिचं असं मध्येच विचारात गर्क होणे हे अतिविचार ह्या गर्भावस्थेत करत राहणे, योग्य नाही असे वाटून श्लोक तिच्याजवळ जाऊन बसला.

" गीता, अगं एक तास झाला. तू एकाच जागी बसली आहेस आणि तिच्यासोबत तुझ्या हातातील चहा सुद्धा आता थंड झाला असेल, तर तू माझ्याकडे दे. मी तुला नवीन बनवून आणून देतो." तो म्हणाला.

" अहो, नको. त्याची काही गरज नाही. मला आता नको." असे म्हणून तिने हातातील कप बाजूला ठेवला.

खूप वेळ चहाचा कप आणि बशी हातात धरल्यामुळे तिचा हात आता थोडा दुखत होता.

" गीता, खरं सांग काय झालं आहे? तुला कोणी काही बोलले आहे का ? किंवा तुला कोणत्या गोष्टीचे टेन्शन येत आहे का ? जे काही असेल तू मला ते मोकळेपणाने सांग." तो शांतपणे म्हणाला.

" का...ही  नाही. " ती  नजर चोरुन अडखळत म्हणाली.

" जोपर्यंत तू  मला काय विचार करत आहेस हे सांगत नाहीस, तोपर्यंत मी ऑफिसला जाणार नाही." त्याने ठामपणे सांगितले.

" जसे मी गरोदर आहे, ही बातमी सर्वांना समजली; तसे सगळे मला तुला पहिला मुलगाच होऊ दे. असे म्हणत आहेत." नातेवाईक काय बोलले याबद्दल तिने आपल्या नवऱ्याला सांगितले.

" पण आपले तर असे काहीच ठरले नाही आहे ना?  आपल्याला मुलगा किंवा मुलगी जे काही असेल ते आपलेच असणार आहे.  आपल्याला त्याचा आनंद होणार आहे, तर तर तो विचार कशाला करतेस ?" त्याने तिचा हात हातात घेत सांगितले.

" तुला माहीत नाही. आम्ही तिघी बहिणी असल्यापासून आईला खूप काही ऐकावे लागले होते. मुलगा नाहीये. मुलगाच वंशाचा दिवा असतो आणि तोच पुढे वंश चालवतो. हे कित्येक वेळा नातेवाईकांकडून ऐकले होते. आणि उद्या जर मला मुलगी झाली तेव्हा कोणी मुलगा व्हायला हवा होता असे बोलले तर ? " ती मध्येच शांत झाली.

" हे बघ कोण काय विचार करते याकडे लक्ष देऊ नको. तू एवढी शिकलेली मुलगी आहेस त्यामुळे तुला सुद्धा आता ह्याची माहिती आहे की, काही लोकांना मुलं सुद्धा होत नाहीत. काही लोकांना त्रास होतो. आपल्यात तसे नाहीये. जर तू सकारात्मक विचार करशील तर त्याचा चांगला परिणाम आपल्या होणाऱ्या बाळावर होईल.

आपले मूल मुलगा असो वा मुलगी जर आपल्या दोघांना काहीच फरक पडत नाही, तर तू दुसऱ्यांचा विचार करणे सोडून दे.  मुलगी सुद्धा घराची लक्ष्मीच असते.  तू आणि तुझ्या दोन बहिणी तुमच्या घरच्या लक्ष्मीच आहे असेच सासुबाई सारख्या बोलत असतात. मग तू हे विसरलीस काय?"  त्याने हसतच विचारलं.

आता मात्र गीताला आपल्याला सोबत आपला  नवरा उभा आहे आणि त्याला  मुलगा किंवा मुलगी त्यांचे मूल कोणीही असो हे त्याच्या तोंडून ऐकल्यावर तिला आता समाधान वाटले होते.

" हो, तुमचे बरोबर आहे. मी आता जास्त विचार करणार नाही." तिने आपल्या नवऱ्याला सांगितले.

प्रत्येक वेळी जोडीदार त्यांना कोणती समस्या असेल तर सांगेलच असे नाही, तर कधी कधी आपल्याला सुद्धा विचारायला हवे असे श्लोकला वाटल्यामुळे त्याने विचारण्याचा पुढाकार घेतला होता.

समाप्त.

© विद्या कुंभार

कथा वाचून झाल्यावर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →