जन्मदाखला.. -1
"आई, माझा जन्मदाखला कुठे आहे ? पासपोर्टच्या फॉर्मला लागतोय. उद्या अपॉइंटमेंट आहे."
ऋचाने किचनच्या दारातून विचारलं आणि रेखाच्या हातातला झारा क्षणभर थांबला. फक्त क्षणभर. मग ती पूर्ववत भाजी परतायला लागली.
"बाबांच्या कपाटात असेल. वरच्या कप्प्यात, फाईलमध्ये. बाबा आले की काढून देतील."
"बाबा यायला रात्र होईल. मी बघते."
"ऋचा, थांब.." रेखा वळली, पण ऋचा तोवर आतल्या खोलीत गेली होती.
"थांब कशाला ?" ऋचाचा आवाज आतून आला. "मी काही तुझे दागिने नाही शोधत, आई. एक कागद हवाय." आणि ती हसली. नेहमीसारखी. त्या हसण्याने रेखाला अजूनच धडधडलं. कारण या घरात दागिने कधीच लपवले नव्हते. लपवला होता तो एकच कागद.
अठरा वर्षांची ऋचा. बारावीनंतर परदेशात शिकायचं स्वप्न, त्यासाठी पासपोर्ट, त्यासाठी हा दाखला. रेखाने गॅस बारीक केला आणि ती दाराशी जाऊन उभी राहिली. आत ऋचा कपाटातली फाईल चाळत होती. रेखाचं काळीज धडधडत होतं. अठरा वर्षं ती या क्षणाची भीती घेऊन जगली होती. प्रमोदने कितीदा म्हटलं होतं, "आपण सांगू तिला. मोठी झाली की." आणि रेखाने दरवेळी "अजून थोडं थांबू" म्हटलं होतं. थोडं थोडं करत अठरा वर्षं गेली.
लग्नानंतर आठ वर्षं मूल झालं नव्हतं. देवधर्म, उपचार, सगळं करून झालं. मग एका मैत्रिणीने नाशिकच्या संस्थेचं नाव सांगितलं. चार महिन्यांची ऋचा तिथे होती. न्यायालयाचे कागद, सह्या, आणि एक दिवस ती त्यांची झाली. रेखाच्या आईने तेव्हाच बजावलं होतं, "हे कुणाला सांगू नकोस. पोरगी मोठी झाली की तिला काय वाटेल ? आणि नातेवाईक तिला 'आणलेली' म्हणतील." रेखाने ऐकलं.
गाव बदललं, नातेवाईकांशी अंतर ठेवलं. फक्त प्रमोदची बहीण आणि रेखाचा भाऊ, एवढ्यांनाच माहीत होतं. आणि ते दोघं गप्प राहतील, असं रेखाला वाटत होतं.
"मिळाला !" ऋचा फाईल घेऊन बाहेर आली. कागद बघत बघत ती हॉलमध्ये आली आणि तिचा चेहरा जरा गोंधळला. "आई, यावर हॉस्पिटलचं नाव नाशिकचं आहे. तुम्ही तर म्हणता, मी पुण्यात जन्मले. मामाकडे."
"ते.. ते तेव्हा नाशिकला होतो आम्ही काही दिवस.." रेखाचा आवाज तिला स्वतःलाच परका वाटला.
ऋचाने कागद खाली ठेवला. ती काही बोलली नाही. फाईल पुन्हा कपाटात ठेवायला ती आत गेली, आणि परत यायला तिला बराच वेळ लागला. रेखा किचनमध्ये गेली, पण भाजी करपली तरी तिला वास आला नाही.
ऋचाने कागद खाली ठेवला. ती काही बोलली नाही. फाईल पुन्हा कपाटात ठेवायला ती आत गेली, आणि परत यायला तिला बराच वेळ लागला. रेखा किचनमध्ये गेली, पण भाजी करपली तरी तिला वास आला नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी ऋचा लवकर निघून गेली, "पासपोर्ट ऑफिस, मग कॉलेज" म्हणून. रेखा कपाटापाशी गेली. फाईल जागेवर होती. पण ती उघडून बघितली तेव्हा तिच्या लक्षात आलं, आत असलेला तो दुसरा कागद, न्यायालयाच्या आदेशाची प्रत, ती नेहमी दाखल्याच्या मागे दुमडून ठेवलेली असायची. आज ती वर होती. सरळ. कुणीतरी उघडून वाचलेली.
रात्री प्रमोद आला. जेवणं गप्प गप्प झाली. ऋचा नेहमीसारखी बडबडली नाही. "पासपोर्टचं फॉर्म भरलं ?" प्रमोदने विचारलं.
"हो," एवढंच उत्तर. रेखा आणि प्रमोदची नजरानजर झाली, आणि प्रमोदला काहीतरी कळलं. त्याने सहज विचारल्यासारखं विचारलं, "ऑफिसात काही अडचण नाही ना आली ? कागद वगैरे ?"
"नाही बाबा. कागद ठीक होते," ऋचा म्हणाली. "सगळे." आणि "सगळे" या शब्दावर तिने वर बघितलं. एक क्षण. मग ताटाकडे. प्रमोदच्या घशातला घास तिथेच थांबला.
रात्री दोघं झोपले नाहीत. "तिने दाखला बघितला. हॉस्पिटलचं नाव विचारलं," रेखा कुजबुजली. "मी नाशिक म्हणाले, आणि ती गप्प झाली. प्रमोद, तिला संशय आलाय."
"मग सांगू या. उद्या. आता पुरे झालं लपवणं." प्रमोदने तिचा हात धरला. "अठरा वर्षांची आहे. समजूतदार आहे. आपण जन्म दिला नाही, पण बाकी सगळं.."
"आणि तिने विचारलं, माझी खरी आई कोण, तर ?" रेखाचा आवाज कापला. "ती गेली आपल्याला सोडून, तर ? प्रमोद, ज्या दिवशी ती आपल्या हातात आली, त्या दिवसापासून हीच भीती आहे मला. मला वाटतं, ती एक दिवस म्हणेल.. तुम्ही माझे कुणीच नाही."
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऋचा कॉलेजमधून आली ती वेगळीच होती. शांत. मोठी. ती किचनमध्ये आली, जिथे रेखा पोळ्या लाटत होती, आणि ओट्याला टेकून उभी राहिली.
"आई, एक विचारू ?"
"आई, एक विचारू ?"
रेखाचं लाटणं थांबलं.
"पासपोर्ट ऑफिसात आज कागद तपासले. दाखल्यावर आईचं नाव तुझं आहे, बाबांचं नाव बाबांचं आहे. पण खाली एक ओळ आहे. छोट्या अक्षरात. 'नोंद.. न्यायालयीन आदेश क्रमांक..' आणि एक तारीख. माझ्या जन्मानंतर चार महिन्यांची." ऋचाने आईच्या डोळ्यांत बघितलं. "आई, मी तुझी मुलगी आहे ना ?"
रेखाच्या हातातलं लाटणं ओट्यावर पडलं. आणि तिने जे उत्तर दिलं, ते ऐकून ऋचाच्या डोळ्यांत पाणी आलं.
रेखाच्या हातातलं लाटणं ओट्यावर पडलं. आणि तिने जे उत्तर दिलं, ते ऐकून ऋचाच्या डोळ्यांत पाणी आलं.
