Login

भूतकाळातील व्रण _ शल्य

तारुण्यात एका तरुणीने केलेली खूप मोठी चूक

लघुकथा लेखन स्पर्धा
एप्रिल २०२६

भूतकाळातील व्रण _ शल्य

नंदा आपल्या "शालीन" बंगल्याच्या विस्तीर्ण आवारातील सुंदर, नाजूक नक्षीकाम असलेल्या सागवानी झोपाळ्यावर संथ लयीत झोके घेत होती. तिच्या उजव्या हातात उंची "लारा" ब्रॅण्डचा चहाचा कप होता. शेजारीच एका सिरॅमिक प्लेटमध्ये विविध प्रकारची बिस्किटे होती. तारुण्यातील सौंदर्याच्या खाणाखुणा तिच्या चेहऱ्यावर रेंगाळत होत्या. ती चहाचा कप तोंडाला लावणार इतक्यात गावचे सरपंच, पाटील आणि दोन प्रतिष्ठित स्त्रिया तिच्या बंगल्याच्या गेटमधून आत आल्या.

"नमस्कार नंदाताई कशा आहात?"

"नमस्कार. या या. बरं झालं मला चहा प्यायला कंपनी द्यायला तुम्ही सर्वजण आलात."

"छे छे! आज आम्ही सगळेच खूप घाईत आहोत. तुमच्याकडे पाहुणचार नेहमी होतोच. अहो, आता पंधरा दिवसांनी आपल्या देवीच्या उत्सवाला सुरुवात होणार आहे. आम्ही दरवर्षी तुम्हाला सत्कारासाठी आग्रह करतो पण तुम्ही काही ना काही कारण सांगून टाळत असता. यावर्षी आम्ही तुमचं काहीच ऐकणार नाही. या वर्षी उत्सवाच्या पहिल्या दिवशीच आम्ही तुमचा सत्कार करणार आहोत. तुम्ही आपल्या गावातील लोकांसाठी खूप काही करत असता."

"अहो पाटील माझा सत्कार करण्यापेक्षा आपल्या गावात खूप कर्तबगार महिला आहेत त्यांचा सत्कार करा."

"ते काही नाही यावर्षी तुम्हाला आमचं ऐकावंच लागेल. ए चला रे इथे जास्त वेळ थांबलो तर नंदाताई आपलं ऐकणार नाहीत."

नंदाच्या मनात आलं हे सर्व लोक अज्ञानात आहेत म्हणून आपला सत्कार करू इच्छितात. तिला भूतकाळातील काही गोष्टी आठवल्या आणि तिच्या अंगावर शहारा आला. का कोण जाणे आज सकाळपासूनच तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. आजच्या घडीला या गावातील ती एक प्रतिष्ठित व्यक्ती होती. येथील लोक तिला बंगल्याच्या नावाप्रमाणे शालीन, सोज्वळ मानत होते. तिच्या दातृत्वाची चर्चा कायमच होत होती. कोणी तिला मैत्रीच्या नात्याने फक्त नंदा म्हणायचे, कोणी नंदा ताई, मावशी, काकू तर लहान मुले तिला नंदा आजी म्हणायची.

साठीच्या पुढची नंदा खूप श्रीमंत होती आणि अडल्या नडल्याला मदत करण्यात नेहमीच पुढे असायची. शाळेतील लहान मुलांना वेळोवेळी जाऊन खाऊ वाटायची. देवळाबाहेरील भिकाऱ्यांना नेहमीच दानधर्म करायची. गावातील स्त्रीयांना मदत करण्यात तिला खूपच समाधान मिळायचं. विशेषतः सुंदर तरुण मुलींकडे ती खूप लक्ष ठेवायची. त्या कुठे वाहवत तर जात नाहीत ना याकडे तिचं बारीक लक्ष असायचं.

आज सूर्य मावळतीला झुकताना तिच्या आयुष्याच्या सांजउतरणीवरती ती खूपच पश्चातापदग्ध झाली होती. झोपाळ्याच्या लयीबरोबर तिचे विचार झुलत होते आणि ती तिच्या अल्लड, स्वप्नील वयातील तिच्या गावी भूतकाळात शिरली.

नंदा अतिशय सुस्वरूप अशी निमगोऱ्या वर्णाची, काळ्याभोर डोळ्यांची, लांबसडक रेशमी केस, कमनीय बांध्याची अशी सोळा सतरा वर्षांची तरुणी होती. ती सर्वसाधारण परिस्थिती, कौलारू घराला कंटाळली होती. नंदाला आपल्या सौंदर्याची जाणीव होती. अकरावीत असल्यापासून तिने खूप मोठी स्वप्नं उराशी बाळगली होती. ह्याचे कारण खेड्यातील घराघरात पोहोचलेला टीव्ही. हिंदी चित्रपट पाहून तिच्या डोक्यात हिंदी सिनेमातील नायिका व्हायचे खूळ शिरले होते. एक दिवस तिने आपला मनसुबा तिच्या आई बाबांना सांगितला. दोघांनीही तिला ताकीद दिली. बाबा तिला म्हणाले,

"नंदू तू वेडी आहेस का! अगं आपल्या पाटलांनी त्यांच्या मुलासाठी तुला मागणी घातली आहे. सुजय पाटलांचा मुलगा असून एकदम निर्व्यसनी आणि कर्तबगार आहे. दिसायला पण रुबाबदार आहे. तुझी अकरावीची परीक्षा झाली की आपण तुझं लग्न लावून देऊ."

त्यावेळी नंदा काही बोलली नाही पण तिने मनोमन ठरवलं की कोणत्यातरी बहाण्याने इथून पळून मुंबईला जायचं. तिने एका सिनेमात पाहिलं होतं की गावातून एक तरुणी पळून येऊन एका मोठ्या स्टुडिओसमोर बसून राहते. मग तिला सिनेमात कामं मिळत जातात. तिने ठरवल्याप्रमाणे एक दिवस दुपारी आई-बाबा झोपलेले असताना कपाटातून काही रक्कम काढली आणि संध्याकाळी देवळात जाते सांगून ती निघाली आणि थेट एसटी स्टँडवर आली. लपतछपत मुंबईची एसटी पकडून तिने मुंबई गाठले.

मुंबईत तिने अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर तिला एका मोठ्या दिग्दर्शकाला भेटता आला. त्यांनी तिचे सौंदर्य पाहून सांगितलं आधी तुला मॉब मध्ये काम करावं लागेल. नंतर तुझी तयारी झाल्यावर मोठा रोल मिळेल. तेव्हा त्यांच्या दृष्टीने ती जाळ्यात आपोआप सापडलेलं एक सावज होतं. त्यांच्या डोक्यात होतं की हिचा वापर इतर गोष्टींकरता करता येईल. काही दिवसानंतर त्यांनी तिची एका माणसाशी ओळख करून दिली आणि त्याच्याबरोबर थोड्या गप्पा मारायला सांगितल्या. दुसऱ्या दिवशी त्या दिग्दर्शकाने तिला पाच हजार रुपये दिले. त्या माणसाने खुश होऊन दिले असे सांगितले आणि ते तिला म्हणाले,

"असे अधूनमधून तू त्यांच्याबरोबर गेलीस तर तुला खूप पैसे मिळतील."

हिरोईन व्हायचं तर ह्या अशा गोष्टी कराव्या लागतात हे नंदा जाणून होती. गावात राहून, चांगले संस्कार होऊनसुद्धा नंदा एकदम निर्ढावलेली होती. तिला त्याचं काहीच वाटत नव्हतं. आता तर सिनेमा कमी आणि हे असले धंदे जास्त. राजरोसपणे ती शरिरविक्रय करू लागली. अल्पावधीतच ती खूपच मालामाल झाली. नंतर ते दिग्दर्शक तिला म्हणाले,

"तू खेडेगावातून आली आहेस. अशा तुझ्यासारख्या सुंदर आणि तुझ्यापेक्षा थोड्या लहान मुलींना पण तू इथे आणलं तर आयुष्यभर बसून खाशील."

नंदाच्या डोळ्यापुढे गावातील असे तीन चार चेहरे उभे राहिले. त्यावेळी तिने तिची सद्सद्विवेक बुद्धी गहाण टाकली होती. ती काही दिवसांसाठी गावी गेली आणि तेथील चार मुलींना फुस लावली.

"तुम्हाला माझ्यासारखे सिनेमात काम करायचं असेल, खूप पैसे हवे असतील तर चला माझ्याबरोबर."

त्या मुली तिच्या ऐटबाज दिसण्यावर भाळल्या. तरीही घाबरून म्हणाल्या,

"आमचे आईबाबा पाठवणार नाहीत."

"त्यांना सांगायचं नाहीच. मी मोठी गाडी आणली आहे. तुम्ही गुपचूप माझ्याबरोबर चला."

"वरलीया रंगा" भुललेल्या त्या मुली तिच्या बरोबर मुंबईला आल्या. नंदाने ह्या चार मुलींची दलाली केली. ह्या मार्गावर चालण्यास सुरुवातीला विरोध करणाऱ्या मुली तीच्याच पावलावर पाऊल ठेवून चालू लागल्या. स्वतःच्या आयुष्याचे वाटोळे करणाऱ्या नंदाने चार कोवळ्या मुलींना त्याच नरकात आणले.

वयाची पन्नाशी ओलांडल्यावर नंदा निवांत जगावं म्हणून पूर्णपणे अनोळखी अशा या गावात आली आणि गावातल्या लोकांच्या गळ्यातील ताईत बनली. खोऱ्याने पैसा कमावलेली नंदा आता सर्वांना सढळ हाताने मदत करत होती. खास करून तरुण मुलींचे ती संरक्षण कवच झाली होती. त्यांना नेहमी सांगायची स्वतःचे शील कायम जपा. स्त्री साठी तिचे शील, चारित्र्य खूप महत्वाचे असते. नंदाला आता पश्चात्ताप होत होता की तेव्हा सुजयशी लग्न केलं असतं तर तिनेही उजळ माथ्याने चारचौघींसारखा सुखाने संसार केला असता आणि आनंदात जगली असती. तिला तारुण्याच्या कैफात आपण कसे वागलो हे कळलं नाही. तेव्हा तिला फक्त मनसोक्त आयुष्य जगायचं होतं. मस्तीत रहायचं होतं.

सूर्य मावळल्यावर नंदा भानावर आली. चार कोवळ्या मुलींचे आयुष्य नासवून त्यांना सुद्धा स्वतःसारखेच शरीर विक्रय करण्यास भाग पाडल्याबद्दल ती स्वतःला कधीच माफ करू शकणार नव्हती. तिने स्वतःच्या मर्जीने हे सर्व केलं होतं. पण तारुण्याच्या वाटेवर उमलू पाहणाऱ्या कळ्याना तिने पूर्ण उमलण्याआधीच वखवखलेल्या नजरांची शिकार बनवलं.

आता गावकरी देवीच्या उत्सवात नंदाचा सत्कार करू इच्छित होते. ती कोणत्या नजरेने देवीच्या भेदक, प्रश्नार्थक नजरेला नजर मिळवणार होती.
आता कितीही पुण्यकर्म केलं तरी नंदा सारख्या पातकी स्त्रीला देवी कधीही माफ करणार नव्हती. म्हणूनच ह्या सत्काराला नंदा सामोरी जाऊ शकत नव्हती. भूतकाळातील हा व्रण, हे शल्य पुसले जाणार नव्हते. आयुष्यभर ते तिचा पाठपुरावा करत राहणार होते.

©️®️सीमा गंगाधरे
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →