Login

भय इथले संपत नाही भाग २

Horror
जलद लेखन स्पर्धा मार्च २०२६
विषय: मला आलेला विचित्र अनुभव


भय इथले संपत नाही

भाग २


त्यावेळेस आमचे घर चाळीच्या शेवटच्या टोकाला होते. म्हणजे आमच्या घरात येण्याआधी जवळजवळ दहा बारा घरे पार करावी लागायची .... त्या काळी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते चाळींमध्ये सणासुदीला काही न काही वाटायचं..म्हणजे दिवाळीला दिवे, रांगोळ्या, फराळ, तर मकरसंक्रांतीला तिळगुळ, वाण.....पण आमचे घर एका टोकाला असल्यामुळे आम्हाला यातले काही क्वचितच मिळायचे...आमचे मन खट्टू व्हायचे...आम्ही आईला म्हणायचो,

"आई, बाबांनी एवढ्या कोपऱ्यात घर का घेतले? रस्त्यालगत घेतले असते तर किती बरे झाले असते!"

तेंव्हा आई समजायची,

"अरे तुम्ही हे सर्व सकारात्मक घ्या ..आपल्या बाजूच्या चाळींमध्ये किती चोऱ्या होतात...आपल्या चाळीत चोर जरी शिरला तरी त्याला आपल्यापर्यंत यायला कंटाळा येईल. म्हणेल...यांच्याकडे चोरी करण्यापेक्षा चालत दिल्ली गाठली तर तिथे एखादे मंत्रीपद तरी भेटेल."
आम्ही तेवढ्यावर समाधान मानून खुलून हसायचो.
आम्हाला खुलवायचे कसे हे आईला चांगलेच ठाऊक होते.


आम्हाला सणासुदीचे वाण मिळत नव्हते इथपर्यंत ठीक होते. पण आमच्याकडं पोस्टमनसुद्धा पत्र घेऊन यायला कंटाळायचा.
आईला म्हणायचा,

"ताई...तुमच्या घरात येण्याआधी मला किती दिव्ये पार करावी लागतात...कुणाचे पापड वाळत घातलेले असतात तर कुणाच्या मिरच्या ...त्यातून वाट काढून जीव वाचवत यावे लागते."


एकदा तर बिचारा भर उन्हात पत्र द्यायला आला. जांभूळकर काकूंच्या फेण्या वाळत होत्या.. त्या बिचाऱ्या पोस्टमनला प्लास्टिकच्या पारदर्शक पेपरावरच्या फेण्या काही दिसल्या नाहीत...डोक्यावर उन्हाचा मारा... तो बिचारा त्या फेण्यांवरून सरळ चालत आला..नंतर जांभूळकर काकूंच्या तोंडाचा पट्टा जो सुरू झाला ...त्यामुळे जवळजवळ त्या पोस्टमनच्या मागच्या सात पिढ्यांचा उद्धार झाला असेल.

कनक पॉपकॉर्न खात हे सर्व ऐकत होती.

"नंतर नंतर बिचारा आमची म्हणजे चाळीत कोपऱ्यात राहणाऱ्या लोकांची पत्रे चाळीतल्या पहिल्या घरामध्ये राहणाऱ्या काळे वहिनीकडे देऊन ठेवायचा...

घरातली कामे टाकून पत्रे देत फिरत रहावे लागायचे म्हणून नंतर त्या ही कंटाळल्या. मग मात्र आम्ही सर्वांनी मिळून चाळीच्या प्रवेशद्वारापाशी एक लेटर बॉक्स बसवला.
मग जो तो स्वतःच जाऊन पत्र आले का हे जाऊन तपासू लागले.

तर असे आमचे घर...एकदम कोपऱ्यातले.
आमच्या चाळीला लागूनच एक भिंत होती....त्या भिंतीपलीकडे काही अंतर ठेवून दुसऱ्या चाळीची भिंत होती ...आणि मध्ये एक अरुंद रस्ता होता...आमच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून तो रस्ता स्पष्ट दिसायचा.

हे मी तुला का सांगते ते तुला पुढे समजेलच.

हा तर कुठे होते मी?"


"तू सांगत होतीस की जमिनीच्या कामासाठी आजोबा गावी गेले होते."


"हां...तर ते कधी परतणार होते ते आम्हाला माहीत नव्हते.. त्यावेळेस आपल्या गावातून मुंबईला येणारी एस टी रात्री दोन तीनच्या दरम्यान यायची.
मी , आई आणि गिरीश आम्ही तिघेही झोपलो होतो...रात्रीचे साधारण तीन वाजले असावेत...आमचा दरवाजा वाजला....बाबा आले असावेत असे वाटले म्हणून आईने लाईट लावली...मी बारा वर्षांची होते पण मला चांगली समज होती...मी ही आईबरोबर उठले...
आई दार खोलणारच होती इतक्यात मी आईला रोखले.


"आई, साखळी लाव..आणि दार उघड. "
आईने मान हलविली आणि दरवाजाची साखळी लावली व दारावरची कडी काढली.


इतक्या दिवसांनी बाबांना भेटायला मी ही उत्सुक होतेच . मी सुद्धा दरवाजाच्या फटीतून बाहेर पाहिले.

बाहेर बाबा नव्हते.


क्रमशः

पुढचा भाग लगेचच post केलेला आहे. कथा पूर्ण वाचा.