Login

भय इथले संपत नाही भाग १

Horror
जलद लेखन स्पर्धा मार्च २०२६
विषय: मला आलेला विचित्र अनुभव


भय इथले संपत नाही

भाग १

विभावरीच्या यजमानांचा वैभव दीक्षितांचा बिझनेस असल्याकारणाने त्यांना कायम विदेशवारी करायला लागायची. तिची दोन्ही मुले लग्न करून अमेरिकेला सेटल झाली होती. या आधी तिचेही एक दोन खेपेस तिथे जाणे झाले होते ...तसा तिचा तिथला दहा वर्षांचा विझाही होता.

या खेपेस दीक्षितांचे कामानिमित्त अमेरिकेला जायचे ठरले. याआधी त्यांचे अमेरिकेला जायचे ठरले की ते विभावरीला आपल्या सोबतच न्यायचे. त्या निमित्ताने त्यांचे त्याचं मुलांशी भेटणेही व्हायचे.  पण जगात चाललेली युद्धजन्य परिस्थिती पाहता या खेपेस विभाला सोबत नेणे योग्य वाटले नाही. 


घरात एकटे राहण्यापेक्षा विभा नेहमी आपल्या भावाकडे गिरिशकडे राहायला जायची तसे यावेळी सुद्धा गेली.


गिरीश आणि त्याची पत्नी गिरिजा दोघेही त्यांच्या मित्रपरिवाराबरोबर काश्मीर फिरायला गेले होते. त्यांच्या सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या मुलीला, कनकला सुट्टी मिळत नसल्यामुळे ती घरीच होती. आता तिला विभाची सोबत मिळाली होती.


"आत्या बरे झाले तू आलीस. मला एकटीला कंटाळा आला होता. तसेही उद्या शनिवार आहे . मला सुट्टी आहे.  आपण रात्री एखादा मुव्ही पाहू किंवा सीरिज पाहू. "

"चालेल. पण त्या आधी मी तुझ्यासाठी पॉपकॉर्न बनवून आणते. "


"मस्तच एकदम थिएटर मध्ये असल्याची फील येईल."कनक म्हणाली.


काहीवेळाने विभा एका मोठ्याशा बाउलमध्ये पॉपकॉर्न घेऊन आली.


"हां आता लाव काहीसे चांगले. "
पॉपकॉर्नचा बाऊल तिच्याकडे देऊन तिच्याशेजारी सोफ्यावर बसत विभा म्हणाली.


"ओके. "
कनकने पॉपकॉर्न तोंडात भरले.


ती वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जाऊन काही पाहण्यासारखे आहे का ते शोधू लागली.
काही वेळातच तीने काहीतरी शोधले. विभा फोनवर मेसेज चेक करीत होती.


"आत्या...तो गौरव तिवारी माहित आहे?"


"आता तुझ्या मित्रांना मी कसे ओळखेंन. "


"आत्या, अगं माझा मित्र नाही .... अगं तो जो घोस्ट हंटिंगसाठी फेमस होता तो. "


"अच्छा.. आठवले. तोच ना ज्याचा बाथरुममध्ये घसरून मृत्यू झाला होता. "


"हां. तोच तो..त्याचा मृत्यूसुद्धा एक गूढच आहे. "


"अगं असे किती जण बाथरुममध्ये पडतात ... त्यात गूढ काय?"


"हां...सुरुवातीला मलाही असेच वाटायचे...
पण त्याच्या जीवनावर आधारलेली ही सिरीज बघ म्हणजे तुझे विचार बदलतील."


"अगं ती शेवटी ती एक सिरीज आहे ...रंजक बनविण्यासाठी मेकर्स त्यात काही मसाला टाकणारच. "


"नाही...त्यातले काही खोटे नाही...त्याने ते सर्व अनुभवलेले होते."


"असू शकते. "विभा म्हणाली.


"वाह आत्या...तू हे लगेचच कसे मानलेस?.. म्हणजे तुझाही भूतांवर विश्वास आहे ना?"


"भूत as such नाही गं... पण मी काही विचित्र गोष्टी अनुभवल्या आहेत...त्यांचा भूतांशी कितपत संबंध आहे माहित नाही..."


"डॅम गुड आत्या... मलाही सांग ना...ही सिरीज वैगरे राहू दे. तू मला तुझा तो विचित्र अनुभव सांग. "
टीव्ही रिमोटने बंद करीत विभावरी म्हणाली.


"अगं..एवढे काही नाही त्यात... एक छोटासा प्रसंग... सांगण्यासारखाही नाही. "


"आत्या...तू आता फुटेज घेऊ नकोस हा...मला ऐकायचे आहे. जे आहे ते सांग. "


"बरे बाई सांगते.


आजपासून साधारण पस्तीस- चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट.
आजी आजोबा मी आणि तुझा बाबा आम्ही सगळे इथे रहायचो...म्हणजे रीडेव्हलपमेंट होण्याच्या आधी गं...आता तुम्हाला त्या जागेवर हा एवढा थ्री बेडरूम हॉल किचनचा प्रशस्त फ्लॅट मिळाला आहे ...तिथे पूर्वी आमचे घर होते. छोटेसेच होते पण आमच्या खूप साऱ्या आठवणी त्याच्याशी निगडित आहेत...तुझा बाबा आणि मी भेटलो की त्या आठवणींना उजाळा मिळतो... कितीतरी आठवणी या घराशी निगडीत होत्या...आमचे खेळणे...बागडणे...भांडणे ...अगं एका छोट्याशा बिस्किटसाठी सुद्धा आम्ही भांडायचो...त्याचे समान तुकडे करून वाटून घ्यायचो...आता घरात खाऊचे डबे भरलेले असले तरी ती मजा आता नाही..."


"आत्या...हे सर्व मला माहीत आहे ...तू आणि बाबा भेटलात की सारखे हेच बोलत असता...मला ती स्टोरी ऐकायची आहे. "


"हो सांगते.
मी त्यावेळेस बारा  वर्षांची असेन आणि गिरीश असेल नऊ वर्षांचा...आमचे बाबा गावाला गेले होते. त्यांचे जमिनीचे काहीतरी काम होते म्हणून तलाठी ऑफिसमध्ये गेले होते. त्यावेळेस आतासारखे फोन नव्हते गं....पत्र लिहून खुशाली समजायची...आता काही झाले की स्टेटसला टाकता किंवा इंस्टाग्रामवर स्टोरी टाकता...अगदी सर्व जगाला समजते...तुम्ही कधी कुठे जाता...काय खाता...कशाने प्रवास करता.. अगदी सर्व....
आमच्यावेळी तसं नव्हते... बाबा दोन दिवसांपूर्वी गेले होते...येण्याचे नक्की नव्हते जसे काम होईल तसे परत येईन असे सांगून गेले होते.


क्रमशः

पुढचा भाग लगेचच post केलेला आहे. कथा पूर्ण वाचा.