Login

भरलेलं ताट    भाग १

गृहिणी असलेल्या सुनेला सासूबाई भरलेल्या जेवणाच्या ताटावरून बोलतात. त्यानंतर नक्की काय घडत? ते या कथेत नक्की वाचा.


भरलेलं ताट    भाग १


@लघुकथा
©®आरती पाटील - घाडीगांवकर


" ताट भरून जेवायला घेतलंस ? कोणाला विचारून ? " रमाबाईनी मितालीला गरजून विचारलं.
रमाबाईच्या या प्रश्नावर मितालीच्या हातातला घास हातातच राहिला. ती आश्चर्याने आपल्या सासूबाईकडे पाहू लागली. ते पाहुन रमाबाई अजून चिडल्या आणि विचारू लागल्या, " काहीतरी विचारतेय मी ? कोणाला विचारून घेतलंस एवढं सर्व जेवायला ? "

" आई, मी सून आहे या घरची. मला पोटभर जेवायचा हक्क नाही का ? मग मी पोटभर जेवण घेण्यासाठी कोणाला विचारायला हवं का ? " मितालीच्या बोलण्यात राग होता.

" हो, विचारायला हवं. तू घरातच असतेस. कुठे बाहेर जाऊन कमवून आणतेस ? आणि ताटात सर्व वाढून घेतलं आहेस. डाळ भात, भाजी, चपाती, दही, कोशिंबीर, पापड, चटणी. कशाला हवं एवढं ? घरात बसून सुद्धा जोर येतो का ? " रमाबाई तावातावाने बोलत होत्या.

" आई घरात सर्वजण व्यवस्थित जेवतात. अगदी दोन महिन्यापूर्वी लग्न करून आलेली रीना सुद्धा. मी सकाळी पाचला उठून कामाला सुरुवात करते, ती रात्री अकराला रूममध्ये जाते. तरी असं बोलता ? अगदी सर्वांच्या नाष्ट्यापासून, सर्वांचे टिफिन देण्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व मीच करते. रीना कोणत्या कामाला हातही लावत नाही. " मितालीला राग आवरत नव्हता.

" का लावेल ती कोणत्याही कामाला हात ? कमवती आहे ती. तू घरात बसून असतेस. ताट उचल, चपाती - भाजी सोडून सर्व पदार्थ काढून ठेव. " रमाबाई रागाने बोलून आपल्या रूममध्ये गेल्या.

मितालीला मात्र खूप रडू आलं. मिताली - निलेशच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती. लग्न करून आल्यावर रमाबाईंनी तिला स्वतःच्या तब्बेतीची कारणे देऊन नोकरी सोडायला लावली.  आजवर या घरासाठी राब राब राबली. सर्वांचं जेवण नीट करून, सर्वांचं जेवण झाल्यावर उरलेलं संपवायची. त्यामुळे हे सर्व तिच्या लक्षातच आलं नव्हतं. आज मात्र सासूबाईंच बोलणं ऐकून तिला स्वतःचाच राग येत होता. तिने न जेवता ताट तसंच ठेवून दिलं.

त्या नंतर तिने आपल्या जुन्या ऑफिसमध्ये कॉल करून कामाविषयीं विचारणा केली. तिचा आधीचा रेकॉर्ड आणि काम चांगलं असल्यामुळे तिला परत जॉईन होत्यासाठी सांगितलं.

रात्री सर्वजण जेवायला एकत्र बसले तेव्हा मितालीने लगेच उद्यापासून जॉब जॉईन करत असल्याचं सांगितलं.

" का जॉब करायचा आहे तुला ? एवढे घरात कमवणारे आहेत ना ? आणि तू गेलीस तर काम कोण करणार ? " रमाबाई रागाने विचारत होत्या.

" आई मी नसते तर कोणी केलं असतं ? आणि असं कुठे लिहिलं आहे, की एकीने सर्व सोडून घरकाम करायचं आणि दुसरीने स्वतःच करिअर बघायचं ? ते काही नाही. कामे वाटून दया. सकाळचा स्वयंपाक मी करून जाईन, संध्याकाळचा रीना करेल. " मिताली सुद्धा स्वतःच्या अस्तित्वासाठी आडून बसली होती.

" मला ऑफिस मध्ये उशिर होतो. मला नाही जमणार. " रीनाने आपल्याकडे येत असलेली जबाबदारी पटकन झटकली.

" ठीक आहे. मग सकाळी नाष्टा आणि सर्वांच जेवण बनवून जा. मी करेन संध्याकाळच. " मिताली शांतपणे म्हणाली.

त्यानंतर रीना जे म्हणाली, त्याने सर्वांना धक्काच बसला.


क्रमश :


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →