भंगारवाला रामा : पर्यावरणाचा रक्षक

फिरत्या व्यावसायिक यांच्याकडून जीवन जगण्याची कला समजते.


     कांही व्यक्तिंचे जीवन नेहमी संघर्षातच गेले आहे; पण अशा व्यक्ती या संघर्षावर मात करुन जीवन किती सुंदर आहे हे जगाला दाखवून देतात. जिथं बालपणात आनंदाने बागडायचे असतं, तारुण्यात मनसोक्त जगायचं असतं, अनेक जबाबदारीत ताणविरहीत राहायचं असतं तिथं क्षणाक्षणाला संघर्षाच्या प्रत्येक ठिणगीला आपल्या सामर्थ्याच्या जोरावर परतवून लावून जीवन अधिक गतिमान बनवणा-या अशा व्यक्ती समाजाला आपल्या जीवन कलेतून वेगळा आदर्श निर्माण करतात.असाच भंगार व फेरीवाला असा व्यवसाय करणारा गडहिंग्लजमधील राम बिलावर या  तरुणाने ग्रामीण भागात आपल्या व्यवसायाने वेगळी ओळख निर्माण केली आहे.

    राम बिलावर हा गडहिंग्लजमध्ये भैरीरोडवर सध्या वास्तव्य करत आहे. रामाचे बालपण अत्यंत गरीबीत गेले. शेतीवाडी नाही ,उत्पन्नाचे  कोणते साधन नाही. मोलमजुरी करुन आईवडिल आपली गुजरान करत होते. त्यामुळे रामाचे शिक्षण झाले नाही. रामाचे बालपण असेच उनाडक्या करत चालूच होते. रामा पंधरा वर्षाचा असताना आईवडिलांचे छत्र हरपले. त्यामुळे पोटासाठी कांहीतरी केले पाहिजे या भावनेने लहानपणी गारेगार विकण्यास सुरवात केली. हातगाडीतून कर्नाटकातील संकेश्वर येथे गारेगार विकून आपला उदरनिर्वाह चालवू लागला. हळूहळू या धंद्यात त्याला गती मिळाली आणि गडहिंग्लज परिसरातील गावे तो फिरु लागला.

      आत्ता गारेगार विकण्यासाठी त्यांने सायकल घेतली. उन्हाळ्यात गारेगार आणि मुंबई मिठाई विकू लागला. प्रत्येक गावात त्याची ओळख झाली होती. त्यामुळे लहान मुले तो केंव्हा येतो याची   वाट पाहतात. रामा आला की, सभोवताली लहान मुलांचा गराडा पडतो.  मुलं आनंदाने नाचतात. प्रत्येकाला तो गारेगार देतो, कुणाकडे पैसे नसले तरी तो त्यांना गारेगार , मुंबई मिठाई खायाला देतो. निरागस मुलांच्या चेह-यावरील आनंद त्याला खूप समाधान देतो. गोरगरीब मुलांचा तो हवाहवासा वाटतो.

    रामाने  धंद्यात आत्ता चांगलेच बस्तान बसवले.आपल्या धंद्यातील मिळकतीतून बचत करुन रामाने मोटरसायल घेतली.एरवी सायकलने फिरणारा रामा वेगाने गावांगावात पोहचू लागला. त्यामुळे रामा सगळीकडे फिरु लागला. गडहिंग्लज पासून ते  गारगोटी परिसरातील सर्व गावे करु लागला.त्यांनतर तो ऐनापूर, सरोळी, निंगुडगे, कोवाडे ते पेद्रेवाडी या गावात त्यांने संपर्क वाढवला.

     व्यवसायात स्थिरावल्यानंतर रामा विवाहबंधनात अडकला. पत्नीच्या साथीने तो व्यवस्थित संसार करु लागला आहे. त्याच्या संसारवेलीवर दोन मुलांचा उदय झाला. रामाने  झोकून देऊन व्यवसाय सुरु केला. मुलांचे शिक्षण आणि घर या व्यवसायातून  सांभाळताना रामाची कसरत होते. रामाने वेळ काळ न बघता जिद्दीने आपला कामधंदा सुरुच ठेवला.

  अचानक कोरोनाचे संकट आले. जिथं बाहेर फिरायला मज्जाव होता तिथं रामाने स्वतःच्या टेंपोवर ' अत्यावश्यक सेवा 'हे लेबल लावून अनेकांची सामान व वस्तू ने आण केले. या अविस्मरणीय संकटकाळात रामाने धीर न सोडता आपल्या कुटुंबाला आणि इतरांनाही आधार दिला.

   काळ बदलला, गारेगार विक्रीला थोडा प्रतिसाद कमी मिळाला. त्यामुळे रामाने आपला व्यवसायाची रणनीती बदलली. उन्हाळ्यात गारेगार व गृहउपयोगी छोट्या वस्तू,  पावसाळ्यात भंगार  यामुळे रामा  बारमाही व्यवसायात गुंतून असतो. त्यागावागावात  भंगार गोळा करण्यासाठी  त्याने जूना छोटा टेंपो खरेदी केला. आपल्या इतर व्यवसायातून त्याला भरपूर अनुभव आला होता. कोणत्या भागात माणसे चांगली आहेत, कोणत्या भागात धंदा चालेल याचे त्यांने उत्तम निरिक्षण केले त्यांनतर त्यांने ' माणुसकीच्या हिरव्या पट्यात ' म्हणजे ऐनापूर,  सरोळी, निंगुडगे, कोवाडे, हाजगोळी या गावात भंगार गोळा करण्यात सुरवात केली. गावागावातील अडगळीतील लोखंड, पत्रा, बाटली, प्लास्टिक,  पेपर व वह्यांची रद्दी या वस्तू रामा घेऊ लागला. वस्तू घेताना व्यवहार चोख व पारदर्शक ठेवू लागला. गोड संवाद, राग नाही, वस्तूंची देवाणघेवाण उत्तम त्यामुळे रामाचा टेंपो संध्याकाळी भरुन जातो. दुस-या भांगार व्यवसायाला हा माल विकून मिळणाऱ्या नफ्यातून तो आपले जीवन जगत आहे.

     रामाचे दररोजचे आयुष्य असे चालले आहे. कुटुंबाचे संगोपन अत्यंत जबाबदारीने करुन जीवनात आनंद मिळवला आहे. आपल्या मुलांच्यासोबत  त्यांने मेव्हण्याच्या मुलीचा तो सांभाळ करत आहे. या मुलीचे  रामावर खूप प्रेम आहे.

     गावोगाव हिंडणारा रामा खूप मनमिळावू आहे. प्रत्येक गावात त्यांने माणुसकी जपली आहे. आपल्या भागात रामा आला की हक्काने चहा पितो, प्रसंगी जेवतोदेखिल ..! लोकांच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारतो जसा की आपल्या गावातील माणूस आहे. एकदिवस रामा नाही आला की, ' आज रामा कुठं आला नाही ? ' अशी गावांगावात चौकशी होते. मंडळी, हा आपलेपणा जपण्यालासुद्धा मोठ मन लागतं. आज रामा जरी भंगारचा व्यवसाय करत असला तरी त्यांने आपुलकी, प्रेम माया, आदर व सन्मान जीवापाड जपला आहे. प्रत्येक माणसाबरोबर  व गावाशी त्यांने नाळ जोडलेली आहे त्यामुळे त्यांने दाही दिशा फिरुन माणुसकीचा सेतू  तयार केला आहे.

    भंगारवाल्याचे काम केवळ आर्थिक नाही, तर पर्यावरणाशी जोडले गेले आहे.कागद, प्लास्टिक, धातू आणि पुर्नवापरयोग्य वस्तू तो घराघरातून गोळा करतो.त्या वस्तू पुन्हा वापराच्या प्रक्रियेत जातात.त्यामुळे कच-याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.भंगारवाला हा आपल्या समाजातील अनोखा दुवा आहे.समाजाच्या स्वच्छतेत व पर्यावरणाच्या संवर्धनात त्याचा वाटा मोलाचा आहे. 


    व्यवसाय कोणताही असो तो जिद्द, कष्ट व प्रामाणिकपणे केला असता यशस्वी होतो.त्याला उत्तम निरिक्षणशक्ती,योग्य नियोजन,बदलत्या काळाचा स्वीकार आणि दूरदृष्टीकोन यांची जोड दिल्यास व्यवसायाला आणखी चालना मिळते. सध्या तरुणाई मोबाईलच्या विळख्यात गुरफटलेली आहे, भयंकर बेकारी वाढलेली आहे अशावेळी ‘तरुणांनी कोणताही व्यवसाय नेटाने व निष्ठेने करा व यशस्वी व्हा ‘असा संदेश  रामाने आपल्या कृतज्ञतापूर्वक वागणूकीतून दिला आहे.


            ©नामदेव पाटील 

    



   


     


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →