Login

बेसन लाडू (भाग:-३ अंतिम)

बहीण-भावाचे नाते बेसन लाडू सारखं गोड असते हे सांगणारी कथा

#जलद लेखन स्पर्धा-ऑक्टोबर:-२०२५

विषय:- ननंदबाई येती घरा

शीर्षक:- बेसन लाडू

भाग:-३ (अंतिम)

किचनमध्ये पाण्याचा ग्लास भरत असताना दिव्या किळसवाणे त्या लाडव्याच्या डब्याकडे बघत मनात म्हणाली, 'छी ! बाई. किती तेलकट आणि घाणेरडा डब्बा दिसतोय. असले खाल्यावर कसे व्हायचे. किती अनहाजिनिक आहे हे. मावशीलाच घेऊन जा म्हणून सांगते.'

"मावशी, ते लाडू डब्यासहित घेऊन जा. काय माहिती कसले घाणरडे हात घेऊन केले असेल. चांगले असेल तर खा, नाही तर कचऱ्यात फेकून द्या." ती तुच्छतेने त्या डब्याकडे पाहत म्हणाली.

पण इकडे हे सगळे ईश्वरीने ऐकले. तिचे बोलणे तिच्या जिव्हारी लागले. ती डोळ्यांतले पाणी पुसत तेथून जाऊ लागली होती.‌ तोच तन्मय त्याच्याकडच्या चावीने आत आला.

समोर ईश्वरीला पाहून त्याला खूप आनंद झाला. तो पळतच तिच्याकडे येत तिला मिठी मारत म्हणाला,"ताई, तू कधी आलीस? कशी आहेस?"

"मगाशीच आले. मी बरी आहे. तू कसा आहेस? " तिने त्याच्या पाठीवरून मायेने हात फिरवत म्हणाली.

"एकदम मस्त. जरा कामाचा लोड आहे गं. म्हणून यावेळी येणं झालं नाही. बरं केलंस तू आली ते. बस ना." तो हात तिला सोफ्यावर बसवत म्हणाला.

"हो, अरे तू तर चार दिवसांसाठी बाहेरगावी गेला होतास ना मग लगेच कसा आलास?" ती संकोचाने बसत म्हणाली.

"नाही गं, इथंच थोडं काम होतं म्हणून गेलो होतो. तुला कोणी सांगितलं?" तो कपाळावर आठ्या पाडत म्हणाली.

पाणी आणणारी दिव्या त्याचा आवाज ऐकून बाहेर न येता ईश्वरी काय उत्तर देतेय हे ऐकण्यासाठी थांबली.

"काही नाही रे, ते जाऊ दे. तुझं सगळं व्यवस्थित चालले आहे ना." ती उत्तर देण्याचे टाळत विषय बदलत म्हणाली.

"तुझ्या आशीर्वादाने सगळं छान सुरू आहे बघ. चल जेवणं करू." तो तिला उठवत म्हणाला.

"नाही नको, तुला पाहिलं, बोलले पोट भरलं बघ माझं. चल निघते मी आता." ती डोळ्यांतले पाणी पुसत म्हणाली.

"मी पण तेच म्हणाले ताईंना, पण ह्या फक्त पाणी दे म्हणाल्या." दिव्या उसन हसू आणत म्हणाली.

तेवढ्यात मावशी तो डब्बा घेऊन जाऊ लागल्या.

तन्मयने तो डब्बा आणि लाडूचा सुगंध ओळखला. त्याने तिला अडवून त्याबद्दल विचारले, तेव्हा तिने दिव्याकडे पाहत सर्व सांगितले. त्याला खूप राग आला. त्याने तो‌ डब्बा स्वतः कडे घेऊन मावशीला जायला सांगितले.

त्याने डब्बा उघडून त्याचा सुगंध घेतला. एक लाडू काढून दिवयाकडे पाहत खाऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर तृप्ती होती तर ईश्वरीच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान होते.

लाडू खाऊन झाल्यावर तो दिव्याला म्हणाला,"तू का‌ असे केलेस किंवा वागलीस म्हणून मी विचारणार नाही. कारण तू सरळ उत्तर देणार नाहीस हेही माहिती मला. पण एक सांगू, ज्या लाडूला तू अनहायजेनिक, ऑयली, घाणेरडे म्हणतेस ना. तेच लाडू खात तुझा नवरा लहानाचा मोठा झालाय. हे फक्त लाडू नाही गं, माझ्या ताईच प्रेम, माया आहे यात.‌ जे तुला कधीच कळणार नाही."

दिव्याने ओशाळून मान खाली घातली.

दिव्या काही बोलणार तोच तिचे काही न ऐकता तन्मय ईश्वरीचा हात धरत मायेने म्हणाला,"ताई, चल तुझ्यासाठी साडी घेऊन येऊ."

दोघेही तेथून निघून गेले, दिव्या त्या दोघांना जाताना पाहत राहिली.

समाप्त-

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →