Login

बेसन लाडू (भाग:-१)

बहीण-भावाचं नातं बेसन लाडू सारखं गोड असतं हे सांगणारी कथा

#जलद लेखन स्पर्धा- ऑक्टोबर:-२०२५

विषय:- ननंदबाई येती घरा

शीर्षक:- बेसन लाडू

भाग:-१

'हुश्श ! पोहोचले बाबा, एकदाची घरी! किती ती गर्दी! त्यातून हे सगळं सांभाळून आणायचे म्हणजे दिव्यच पार केले म्हणायचे. चला हे बेसन लाडू पाहून, तनु किती खूश होईल ना!' जीना चढत ईश्वरी मनातच बडबडत हसत म्हणाली.

ती तिच्या भावाच्या फ्लॅटसमोर आली आणि पदराने घाम पुसत तिने हसतच दाराची बेल वाजवली.

"च्यॅ! कोण आला आता कडमडायला? आता तर अंग टाकलं होतं. ओ मावशी, जरा दार उघडून बघता का कोण आलंय ते?" ईश्वरीची भावजय दिव्या वैतागत काम करणाऱ्या मावशीला म्हणाली.

"व्हयं, बाईसाहेब." असे म्हणत त्या मावशीने दार उघडले.

मावशी नवीन असलेल्या तिला ईश्वरीबद्दल माहिती नव्हतं. त्यात तिचा पेहराव आणि राहणीमान गावंढळ होतं. डोक्यावर एक पिशवी आणि कमरेवर पिशवी घेऊन ती उभी होती. त्यामुळे तिने तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत कपाळावर आठ्या पाडत म्हणाली,"कोण पाहिजे तुम्हास्नी?"

"ते माझा भाऊ तनु.. म्हणजे तन्मय.. तन्मय  साठे, इथंच राहतो ना? " ईश्वरी कुतुहलाने आत डोकावतं म्हणाली.

"व्हयं, पर साहेब आता घरी न्हाईती. ड्युटीवर गेल्यात. बाईसाहेब हायती, थांबा म्या इचारून येते." मावशी तिला आत न घेता दारातच थांबत म्हणाली आणि आत दिव्याला विचारायला निघून गेली.

ईश्वरीने आत पुन्हा डोकावून पाहिले तर समोरच तन्मय आणि दिव्याचा सुंदर, हसरा चेहरा असलेला फोटो फ्रेम लावलेला होता. ते पाहून ती आत आली. डोक्यावरील आणि कमरेवरील पिशव्या तिने खाली ठेवल्या आणि पुढे जाऊन कौतुकाने त्या फोटोवरून हात फिरवत म्हणाली,"किती सुंदर जोडा आहे, लक्ष्मीनारायण जणू! असंच हसत राहा."

मावशी आत जाऊन दिव्याला म्हणाली,"बाईसाहेब, कोणी तरी बाई आहे. साहेबांचं नाव घेऊन त्यांना भाऊ म्हणतेय. काय करू? आत घेऊ का तिला ?"

"नको थांबा, मी बघते कोण आहे ते? तुम्ही तुमचं करा." असे म्हणत दिव्या तिचे मोकळे केस बांधत तिच्या रूममधून बाहेर आली. 

ईश्वरी पाठमोरी होती, त्यात ती आत येऊन फोटोवरून हात फिरवत होती ते दिव्याला आवडले नाही. त्यामुळे तिचा पारा चढला. ती तरातरा तिच्या दिशेने जात रागात ओरडत म्हणाली,"ए कोण आहेस तू? दारात थांब म्हणाले होते ना मावशीने ! मग आत यायची हिंमत कशी केली तू? आली ती आली, असे फोटोवरून तुझा घाणरेडा हात फिरवत आहेस. हो बाजूला!"

ती जवळजवळ ईश्वरीवर जोरात खेकसलीच. दचकून ईश्वरी मागे सरकली आणि पाठीमागे वळली. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते.

क्रमशः

ईश्वरीला पाहिल्यावर काय असेल तिची प्रतिक्रिया?

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →