बरोबरी भाग १
©® आरती पाटील - घाडीगांवकर
" रिया, लवकर जेवायला वाढ, खूप भूक लागली आहे. " चेतन आपली बॅग सोफ्यावर ठेवत म्हणाला.
" जेवण ? अरे सॉरी पण आज मला कंटाळा आला होता स्वयंपाक करायचा. एक काम कर ना, बाहेरून ऑर्डर कर आपल्या दोघांसाठी. " रिया फोन स्क्रोल करत म्हणाली.
" काय ? रात्रीचे दहा वाजले आहेत आणि तू अजून स्वयंपाक नाही केलास ? तुला माहित आहे ना , मला बाहेरच नाही पचत म्हणून ? आई नेहमी गरम, ताज जेवण त्यासाठीच बनवते ना ? चल ठीक आहे, तुझ्यासाठी मी बाहेरून मागवतो, पण माझ्यासाठी घरातच काहीतरी बनव. अगदी खिचडीभात सुद्धा चालेल." चेतन स्वतःच पाणी घेऊन पित म्हणाला.
" काय रे मी मोलकरीण वाटते का सर्वांना ? नेहमी फक्त स्वयंपाक, स्वयंपाक करत असता ? आणि तूझ्या आईनेच ही सवय तुला लावली आहे. गरमागरम जेवण हवं म्हणे. एवढंच होत तर दुपारी गावी गेल्या तेव्हा बनवून जायचं होत ना लेकासाठी तुझ्या आईने. या घरात आल्यापासून मोलकरीण करून ठेवलं आहे मला. " रिया रागाने म्हणाली.
" बोलताना थोडा तरी विचार करते का गं तू ? आईच्या हाताखाली जेमतेम मदत करतेस तू. आता आपल्या दोघांसाठी पण तिने जाताना स्वयंपाक बनवून जायला हवं होत म्हणतेयस ? मग तुला लग्न करून काय फक्त फोन स्क्रोल करायला आणलं आहे का ? " चेतन रागाने म्हणाला.
" म्हणजे तू मान्य करतोयस की मला लग्न करून तू घरात राबवायला आणलं आहेस. " रिया रागाने म्हणाली.
" रिया शब्दशा अर्थ घेऊन वाद वाढवू नकोस. " केतन रागाने म्हणाला आणि शब्दाला शब्द लागून वाद वाढत गेला. रागारागाने रियाने आपले चार कपडे बॅगेत टाकले आणि २०- २५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या आपल्या माहेरी निघाली.
टिंग टॉंगss.....टिंग टॉंगss...
" काय गं ? एवढ्या रात्री कशी आलीस ? ते ही बॅग घेऊन ? रात्रीचे 11 वाजेल आहेत. " दरवाजा उघडत आशाबाई आपल्या लेकीला म्हणजेच रियाला काळजीने विचारलं.
" आता आत येऊ देशील का ? की बाहेरच थांबू ? " रिया चिडून म्हणाली. आशाबाई मागे झाल्या आणि नवऱ्याला आवाज देत म्हणाल्या," अहो, ऐकलत का ? रिया आलीये. "
" रिया तू या वेळी ? घरी सर्व ठीक आहे ना ? " महेशरावांनी काळजीने विचारलं.
" हो बाबा, वैतागून गेली आहे मी त्या घरात. फक्त मोलकरीण करून ठेवली आहे मला. " रिया रागात बडबडत होती.
" मोलकरीण ? अगं तूझ्या घरात लादी - भांडी, कपडे, डस्टिंग साठी बाई येते. राहतो फक्त स्वयंपाक आणि त्यात ही तूझ्या सासूबाई अर्ध्या अधिक करतात. किराणा आणि भाजीपाला तुझे सासरे फेरफटका मारायला जातात तेव्हा आणतात. मग तू मोलकरीण कशी झालीस ? " आशाबाईंनी हाताची घडी घालत विचारलं.
" रोज रोज स्वयंपाक बनवून कंटाळा येतो. रोज तीन वेळा तेच तेच करायचं ? आणि माझ्याकडून अपेक्षा असते की रोज करावं. मी काय मोलकरीण आहे का ? स्वयंपाक बनवत बसायला ? त्या घरी सून आणि चेतनची लग्नाची बायको आहे. मग बरोबरीच नातं असायला हवं ना ? मोलकरीण का करून ठेवली आहे माझी ? मला हे पटतच नाहीये. " असं म्हणत रागाने बॅग सोफ्यावर टाकून रिया रूममध्ये निघून गेली.
आशाबाई तिच्या मागे जाणार तोच महेशरावांनी तिला अडवलं.
" अहो, असं काय करताय ? तिच्याशी बोलायला हवं ना ? हे वागणं बरोबर नाहीये. " आशाबाई काळजीने म्हणाल्या.
आशाबाई तिच्या मागे जाणार तोच महेशरावांनी तिला अडवलं.
" अहो, असं काय करताय ? तिच्याशी बोलायला हवं ना ? हे वागणं बरोबर नाहीये. " आशाबाई काळजीने म्हणाल्या.
" तुझं बरोबर आहे. पण यावेळी ती कोणाचं ऐकणार नाही. दोन दिवस जाऊ दे मग मी बघतो. " महेशराव आशाबाईंना समजावत म्हणाले. तेवढ्यात महेशरावांना चेतनचा फोन आला.
