Login

"बाप : मायेची ढाल" भाग - ४

एक सर्वसामान्य माणूस त्याच्या सुखासाठी वेळ प्रसंगी सर्व जगाच्या विरोधात जाऊ शकतो हे सांगणारी कथा.
"बाप : मायेची ढाल" भाग - ४

रस्त्यावरील रॅलीचा आवाज शांत झाला होता. पण दुकानातल्या वातावरणात एक शांत भयानक वादळ होते. विक्रम दुकानातून निघून गेला पण मायाला त्याचे अस्तित्व अजून जाणवत होते.

अर्जुन खुर्चीवरून उठला. त्याची नजर कोपऱ्यात उभ्या असलेल्या मायावर पडली. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता. कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. साडीचा पदर हाताच्या मुठीत घट्ट दाबून धरला होता.

"माया..." अर्जुनने काळजीने हाक मारली.

माया दचकली. तिने भयभीत नजरेने अर्जुनकडे पाहिले. त्या नजरेत अपराधीपणा आणि भिती दोन्ही होते. अर्जुन तिच्या जवळ गेला.

"काय झाले आहे माया? तू एवढी का घाबरली आहे?" अर्जुन तिला विचारतो.

"काही... काही नाही. मला चक्कर येतेय. मला घरी जायचंय." माया अडखळत बोलते.

मायाने टेबलावरचा डब्बा उचलला आणि घाईघाईने दुकानाच्या बाहेर पडली. अर्जुन तिला आवाज देत होता, "मी तुला घरी सोडतो." पण माया काही थांबली नाही.

अर्जुन मायाच्या रस्त्याकडे बघत होता. मायाचे वागणे त्याला जरा विक्षिप्त वाटले. मायाचे वागणे त्याला खटकत होते. अर्जुनला आता दुकानात बसवेना झाले. तो मायाच्या वागण्याचा विचार करू लागला.

अर्जुनला दुकानात राहवत नव्हते. मायाशी बोलून, काय झाले आहे? याची आता माहिती काढल्याशिवाय शांत बसायचं नाही. असा विचार करून अर्जुन माया सोबत बोलण्यासाठी घरी निघतो.

माया घरी पोहोचली होती. तिचे हातपाय गळून गेले होते. घरात कोणीच नव्हते. सोप्यावर बसून माया रडत होती. तेवढ्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवर तोच विक्रमचा नंबर होता. माया थरथरत फोन उचलते.

"काय मग कशी वाटली आपली रॅली?" विक्रम मायाला विचारतो.

"कशाला छळतोय मला? मी काय बिघडवले तुझे? काय गुन्हा केला आहे मी?" माया रडत रडत बोलत होती.

"तुझं सुंदर दिसणं हाच तुझा गुन्हा आहे. मी तुला नाही छळत. तूच मला छळतेय. त्या दिवशी ते क्षण तू माझ्या बरोबर घालवले आणि तेव्हापासून तुला बघितले का माझीच झोपच उडून जाते." विक्रम बोलतो.

"तो फक्त अपघात होता. मी विसरण्याचा प्रयत्न करतेय, तू मला का विसरून देत नाही. माझा नवरा एकदम साधा आणि सरळ मार्गी माणूस आहे. जगूदे आमचं आम्हाला." माया विक्रमला विनंती करते.

"मी कुठे तुम्हांला जगायला नाही म्हटलं! तुम्ही आनंदात जगा आणि मलाही तू आनंदी कर. आपल्या नेहमीच्या हॉटेलवर मला भेटायला ये." विक्रम मायाला सांगतो.

"मला नाही जमणार." माया स्पष्टपणे नकार देते.

"एक लक्षात घे माया, मी तुझ्या दुकानात येऊ शकतो तर तुझ्या नवऱ्याला आपले फोटो, व्हिडिओ पण दाखवू शकतो. मला निवडणुकांची कामं आहेत लवकर ये." विक्रम मायाला धमकी देतो. आणि फोन कट करतो.

विक्रम समोर झुकल्याशिवाय मायाकडे दुसरा पर्याय देखील नव्हता. मायाने डोळे पूसले. तिने आरशात स्वतःच्या रडवेल्या चेहऱ्याकडे पाहिले. तिला स्वतःचीच घृणा वाटत होती पण आता माघारी रस्ता नव्हता. तिने पर्स घेतली आणि घराबाहेर पडली.

त्याच वेळी अर्जुन घरी येत होता. अर्जुनने लांबूनच मायाला घराबाहेर पडताना बघितले. "आता यावेळेला माया कुठे चालली असेल?" असा प्रश्न त्याला पडला होता. मायाने चेहऱ्यावर स्कॉर्प बांधलेले होते. मायाने काही अर्जुनला बघितलेले नसते.

मायाने एक रिक्षा थांबवली आणि त्यात बसून निघाली. अर्जुनच्या मनात द्वंद चालू झाले, "बायकोवर नजर ठेवणे, तिचा पाठलाग करणे हे चुकीचे आहे. तिच्यावर अविश्वास ठेवल्यासारखे होते. पण सत्य जाणून घेण्यासाठी हे गरजेचे आहे." असेही अर्जुनला वाटत होते. म्हणून तोही मायाच्या मागावर जातो.

काही वेळाने रिक्षा हॉटेल समोर येऊन थांबली. हे हॉटेल काही चुकीच्या गोष्टींसाठी प्रसिद्ध होते. मायाला तिथे आलेले बघून अर्जुनला प्रश्न पडतो की, "माया इथे कशासाठी आली असेल?"

अर्जुनने गाडी एका बाजूला लावली. चेहऱ्यावर रुमाल बांधला. त्याने बघितले का माया हॉटेलच्या रिसेप्शनच्या तिथे उभी होती. अर्जुन मायाच्या नजरेत येणार नाही अशा पद्धतीने एका बाजूला जाऊन उभा राहतो.

तेवढ्यात विक्रम तिथे येतो. विक्रम मायाला इशारा करून बोलावून घेतो. विक्रमला बघून अर्जुनला धक्का बसतो. " एवढ्या मोठ्या माणसाबरोबर मायाची काय ओळख असेल" असा प्रश्न त्याला पडतो.

नंतर विक्रम मायाला पार्टी हॉल मध्ये घेऊन जातो. तिथे आता कोणीच नसते. अर्जुन देखील त्यांच्या मागे जातो. हॉलच्या भीतींच्या बाहेरच्या बाजूने लपून अर्जुन माया आणि विक्रमला बघत होता.

विक्रमने मायाकडे एक पाऊल टाकले. माया मागे सरकली, पण विक्रमने जबरदस्तीने तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढले. त्याने मायाला जबरदस्ती मिठी मारली.

हे दृश्य बघून अर्जुनचे रक्त सळसळले. त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. त्याला वाटले की, "धावत जाऊन विक्रमचा जीव घ्यावा. पण तो स्वतःवर नियंत्रण ठेवतो. त्याला माया काय करते हे बघायचे होते.

मायाने पूर्ण ताकदीने विक्रमला धक्का दिला.

"सोड मला नीच माणसा! तुला लाज वाटत नाही का?" माया रडत रडत बोलते.

"तुला आता लाज वाटतेय. आणि त्यादिवशी नाही लाज वाटली का?" विक्रम हसत बोलतो.

"तो फक्त एक अपघात होता." माया जीवाच्या आकांताने बोलत होती.

"पण माझ्यासाठी तर आनंदाचे क्षण होते. असे जे कायम स्मरणात राहतील." विक्रम बोलतो.

मायाने विक्रमला हात जोडले. त्याच्या पाया पडायला लागली.

"माझे माझ्या नवऱ्यावर, माझ्या अर्जुनवर खूप प्रेम आहे. मी तुझ्या पाया पडते विक्रम. मला सोडून दे. आमचा संसार खूप सुखी आहे. त्यात विष नको कालवू. मला मान्य आहे, त्यादिवशी मी तुझ्यासोबत असताना स्वतःवरचे नियंत्रण गमावले. पण मला माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा नको देऊ." माया रडत होती.

मायाच्या तोंडून हे ऐकल्यावर बाहेर ऐकत असलेला अर्जुन मात्र कोलमडून जातो. त्याच्या कानात कोणीतरी शिशाचा रस ओतल्यासारखे त्याला झाले. काळजात कोणीतरी सळई घातल्यासारखे त्याला वाटत होतं.

त्याची माया त्याला फसवेल असे त्याला कधीच वाटले नव्हते. या क्षणाला मृत्यू यावा अशी प्रार्थनाच जणू मनोमन अर्जुन देवाला करत होता. पण माया पुढे काय बोलत आहे, हे त्याला ऐकायचे होते. त्याच्या डोळ्यात अश्रू होते तर कान
मायाकडे होते.

विक्रमने मायाला उभे केले.

"तुझे प्रेम आहेना तुझ्या नवऱ्यावर मग राहूदे की. मला फक्त तुझे शरीर पाहिजे. तू आणि तुझा नवरा सुखाने संसार करा. मला काहीच अडचण नाहीये. तुम्हांला काहीही कमी पडणार नाही याची शाश्वती मी देतो. फक्त मी तुला जेव्हा बोलावेल तेव्हा तू यायची." विक्रम बोलतो.

"विक्रम तू किती विकृत आहे." माया बोलते.

"मला विकृत म्हणते, आणि तू. तू तर तुझ्या नवऱ्याला फसवले. मी तर असे कोणालाच फसवले नाही." विक्रम हसून बोलतो.

"मला आता कशाला बोलावले आहे? मुलं घरी येतील आता. मला लवकर घरी जायचे आहे." माया बोलते.

"जा की लगेच जा. फक्त जरावेळ माझ्याबरोबर चल." विक्रम बोलतो.

"मी कुठेही येणार नाही." माया विक्रमला साफ नकार देते.

"मग ठीक आहे. आपले फोटो, व्हिडिओ तुझ्या नवऱ्याला लगेच पाठवतो." विक्रम मायाला धमकी देतो.

बाहेर उभ्या असलेल्या अर्जुनला लगेच कळते की विक्रम दुकानात या फोटो, व्हिडिओ बद्दल बोलत होता.

"मी तुला नकार नाही देत. पण मला आता वेळ नाहीये. घरी गेल्यावर माझ्या सासूबाईंना मी दिसले नाहीतर त्या मला हजार प्रश्न विचारतील. मला परत तुझ्याकडे येणे पण कठीण होईल. म्हणून बोलतेय नंतर कधीतरी." माया विक्रमला मनवण्याचा प्रयत्न करते.

"तू या अगोदरही मला अशी अनेक कारणे देऊन फसवले आहे. आता मी तुझेच काहीच ऐकणार नाही." विक्रम मायाचा हात पकडतो.

तेवढ्यात मायाचा फोन वाजतो. माया त्याला फोन दाखवत बोलते, "हे बघ माझ्या सासूबाईंचाच फोन आला आहे. मला जावे लागेल."

विक्रम काही सुरवातीला मायाचे ऐकत नाही. पण मायाने खूप विनंती केल्यावर अखेर तो तयार होतो.

"ठीक आहे. या वेळेस तुला जाऊन देतो. पण हे शेवटचे. पुढच्या वेळी तुझ्या घरी काहीही झाले तरी तुझं काहीच ऐकणार नाही. आणि तू माझे ऐकले नाहीतर आपले फोटो तुझ्या नवऱ्याला पोहचले म्हणून समज." विक्रमला मायाला धमकी देतो.

माया आणि विक्रम येत आहे हे बघून अर्जुनही लगेच तिथून निघतो. माया घरी पोहोचते. आणि अर्जुन दुकानात. अर्जुन दुकानात हताश होऊन बसलेला होता. एका वाळवंटात तहानलेला हरवावा अशी गत त्याची झाली होती.

आज त्याचे प्रेम, अभिमान, स्वाभिमान सर्वकाही गळून पडले होते. याक्षणी कुठून काहीतरी व्हावे आणि त्याला मृत्यु यावा अशीच त्याची भावना होती...

क्रमश:
0

🎭 Series Post

View all