"बाप : मायेची ढाल" भाग - १३
सकाळची वेळ होती. अर्जुन दुकानात जाण्याची तयारी करत होता. अर्जुन तयार होऊन हॉलमध्ये आला. तिथेच सावित्रीबाई आणि गजाननराव बसलेले होते. त्यांना बघून अर्जुन मुद्दाम मायाला आवाज देत होता.
"माया... माया... माझा जेवणाचा टिफीन तयार झाला का?" अर्जुन प्रेमाने बोलतो.
अर्जुनने आवाज दिल्यावर माया टिफीन घेऊन बाहेर येते. तिच्या चेहऱ्यावर खोटे हसू होते. अर्जुन आणि माया सावित्रीबाई आणि गजाननराव यांना सर्वकाही ठीक आहे असे दाखवत येते.
"माया... तू बनवलेले जेवण पोटात गेल्याशिवाय जेवण केल्यासारखे वाटत नाही." अर्जुन मुद्दाम बोलतो.
"तुम्ही आवडीने खाता म्हणून मलाही बनवायला आवडते." माया अर्जुनला बोलते.
अर्जुन नेहमीप्रमाणे सर्वांचा निरोप घेऊन दुकानात निघतो. थोड्यावेळाने मुलंही शाळेत गेले होते. घरात आता फक्त सासु-सासरे आणि मायाच होती.
रात्रीचे आणि सकाळचे अर्जुन आणि मायाचे वागणे कुठेतरी सावित्रीबाई आणि गजाननराव यांना खोटे वाटत होते. ते फक्त दाखवण्याकरता वागत आहे असेच त्यांना वाटत होते.
माया स्वयंपाकघरात काम करत होती. तिचे कामात फार लक्ष नव्हते. तिच्या मनात एकच चालू होते. तिचा संसार पुन्हा कसा सुरु होईल? तिला काहीही करून अर्जुनचे मन जिंकायचे होते.
माया तिच्या विचारांत होती तोच हॉलमधून सावित्रीबाईंचा गंभीर आणि कडक आवाज येतो, "माया... जरा इकडे ये..."
माया हातातील काम तिथेच सोडले... आणि बाहेर आली.
"आई, काही हवं होतं का?" मायाने विचारले.
"इथे सोफ्यावर बस. मला तुझ्याशी बोलायचे आहे." असे बोलून सावित्रीबाई गजाननरावाकड बघतात. गजाजनराव उठून बाहेर निघून जातात.
माया सोफ्यावर बसते. पण गजाननराव तिथून गेल्याने मायाच्या प्रश्न निर्माण होतो की आईंनी बाबांना जायचा इशारा का केला असेल? आईंना काही गंभीर तर बोलायचे नसेल.
"माया, अर्जुन आणि तुझ्यात काय चालू आहे? तुमच्या दोघांचे वागणे आजकाल भरपूर बदलले आहे. तुम्ही दोघंही विचित्र वागत आहात. काही बिनसले का आहे तुमच्यात?" सावित्रीबाई थेट मुद्द्याला हात घालता.
"आई, कुठे काय चालू आहे! सर्व ठीक आहे." माया नजर चोरत म्हणाली.
"माया, माझ्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस. आम्हाला कळत नाही असे वाटले का तुम्हाला!" सावित्रीबाईंचा आवाज वाढला होता.
मायाने खोटे हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, "आई, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आम्ही कुठे काही वेगळे वागतोय. रात्री त्यांनी तुमच्यासमोर मला गजरा दिला, मी पुरणपोळी केली होती म्हणून जरा जास्तच जेवले, सकाळी दुकानात जाताना तुमच्यासमोरच कौतुक केले. एवढं सगळं चांगलं असताना तुम्ही उगाच बोलताय आमच्यात काहीतरी बिनसले आहे."
"माया, मला माहित आहे अर्जुनचे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तो नेहमीच तुझ्यासाठी गजरा आणत असतो, तुझे कौतुक करत असतो. पण तुमच्या लग्नाला इतकी वर्षे झाली पण अर्जुनने कधीच आमच्या समोर कधीच असा गजरा दिला तुला नाही. आमच्या समोर तुझ्यासाठीचे प्रेम व्यक्त केले नाही. रात्री त्याने केले कारण मी त्याला दुकानात तेच विचारले जे आत्ता तुला विचारले. आणि यामुळेच अर्जुनने रात्री जे केले ते आम्हाला दाखवण्यासाठीच होते. याची मला खात्री आहे." सावित्रीबाईंचा आवाज खंबीर होता.
सावित्रीबाई असे बोलताच माया गडबडली पण स्वतःला सावरून माया बोलते, "तसे काही नाही. हा काही दिवसांपूर्वी आमच्यात थोडे वाद झाले होते. पण तो गैरसमज आता दूर झाला आहे."
"गैरसमज? एवढा कसला गैरसमज झाला होता. तुमच्या वागण्यावरून तरी काही छोटा वाद वाटला नाही. आम्हाला एकच वाटते माया, आमच्या मुलांचा संसार नीट व्हावा. इतकी वर्षे तुम्ही दोघांनाही आनंदाने, प्रेमाने संसार केला आहे आणि तो इथून पुढेही तसाच सुरू रहावा एवढेच आम्हाला वाटते." सावितीबाई काळजीने बोलतात.
"आई, तुम्ही काहीच काळजी करू नका. आमचं नातं इतकही तकलादू नाहीयेका असे सहज तुटेल." माया सावितीबाईला दिलासा देते.
सावित्रीबाईंनी अनेक प्रश्न विचारले, पण मायाने परिस्थिती सावरून नेली. माया पुन्हा स्वयंपाक घरात गेली. तिथे गेल्यावर मायाला घामच फुटला.
आईंचा संशय आता खूप वाढला आहे आणि याबद्दल जर आपण अर्जुनला सावध केले नाही, तर अर्जुनच्या आणि आपल्या बोलण्यात तफावत येईल, ही भिती मायाला वाटू लागली.
आईंनी पुन्हा अर्जुनला काही प्रश्न विचारले आणि त्यांनी वेगळे काही सांगितले तर सगळा बनाव उघडा पडेल. हे सर्व अर्जुनला सांगण्यासाठी माया दुकानात निघते.
दुपार होत होती. मायाने घरातील कामे पटकन आवरले आणि दुकानात जायला निघाली.
दुपारची वेळ होती. म्हणून दुकानात फारसी गर्दी नव्हती. दुकानातले दोन कामगार देखील जेवायला गेले होते. अर्जुन खाली बसून पुस्तकांची नीट मांडणी करत होता. त्याचे दोन्ही हात कामात होते.
माया दुकानात आली. अर्जुनने तिच्याकडे पाहिले, पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो पुन्हा आपले काम करत राहिला.
"अहो... मला तुमच्याशी जरा महत्वाचे बोलायचे आहे." मायाने सावकाश बोलत होती. पण अर्जुनने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आणि त्याचे काम सुरू ठेवले.
"अहो... मला तुमच्याशी जरा महत्वाचे बोलायचे आहे." मायाने सावकाश बोलत होती. पण अर्जुनने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आणि त्याचे काम सुरू ठेवले.
"आई, मला घरी आपल्यात काय चालू आहे? हे खोदून खोदून विचारत होत्या. तुमचं रात्रीचं वागणं देखील त्यांना संशयास्पद वाटलं. मी त्यांना सांगितले आपल्यात छोटे वाद आणि गैरसमज झाले होते. ते आता दूर झाले आहेत. कशीतरी मी वेळ सांभाळून घेतली." माया अर्जुनला सर्व सांगते.
"का? आईला खरे सांगायची हिंमत नव्हती का?" अर्जुन मायाला रोखून बोलतो.
मायाच्या डोळ्यांत पाणी येते. अर्जुनचे बोलणे तिच्या काळजात घाव करते.
"जर तुम्हाला वाटत असेल तर आईंनाच काय मी सर्व जगासमोर माझा गुन्हा कबुल करायला तयार आहे. मी लगेच घरी जाऊन आईंना आणि बाबांना खरे सांगते."
असे बोलून माया उठते आणि घरी जायला निघते. अर्जुन तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो.
"मला त्रास दिला तो कमी नाही झाला का! म्हणून माझ्या आई-वडिलांना त्रास द्यायचा विचार करते." अर्जुन रागाने बोलतो.
"मग काय करू मी? त्या नीच माणसाने मला इतके दिवस छळले. आणि आता तुम्ही छळताय! एक एक क्षण झुरत होते मी. रात्र रात्र डोळ्याला डोळा लागत नव्हता. फक्त एकच विचार यायचा की मी माझ्या अर्जुनला फसवले. झालं, माझ्याकडून चूक घडली. पाप घडलं! तुम्हाला मला जी शिक्षा द्यायची आहे ती द्या. पण असे तिळ तिळ छळू नका." मायाचा बांध फुटतो. तिच्या डोळ्यांतून अश्रुंच्या धारा वाहत होत्या.
बाहेर कोणाला हे समजू नये म्हणून अर्जुन पटकन दुकानाचे शटर बंद करतो.
"मी तुला छळतोय माया का, तू मला छळले. आरे जिवंतपणी तू मला मारले. आणि मी तुला छळतोय." अर्जुन देखील इतके दिवस मनात साठवले बाहेर काढतो.
"मला मान्य आहे, मी माती खाल्ली आहे. पण त्यातच अडकून रहायचे का? तुम्ही मला शिक्षाही देत नाही आणि माफीही देत नाही." माया शांतपणे पण रडून बोलते.
"माफ तर मी तुला करणार नाही. आणि राहिला प्रश्न शिक्षेचा. तर कोणती शिक्षा देऊ तुला! तू म्हणाली होती तसं तू घर सोडून जाणार. आणि तू गेल्यावर काही दिवसांनी, महिन्यांनी मुलं, आई-बाबा विचारतील तू कुठे गेलीये? तर मी काय सांगू त्यांना?" अर्जुनचा आवाज वाढला होता.
"जे मी केले आहे तेच सांगा." माया बोलते.
"मी सांगितले आणि ते माझ्यावर विश्वास ठेवतील. आणि मी का सांगायचे?" अर्जुनच्या डोळ्यांत अश्रू येतात.
"ठीक आहे, तुम्ही काहीच सांगू नका. मी सर्वकाही सांगून कायमची घर सोडून जाते. मला माझ्या पापाची शिक्षा मिळालीच पाहिजे." असे बोलून माया डोळे पुसत उठते.
मायाच्या डोळ्यांत एक वेगळाच निर्धार होता. मायाने दुकानाचे शटर उघडते.
मागे वळून अर्जुनकडे बघून बोलते, "जाता जाता एकच सांगेन, जीवापाड प्रेम करते मी तुमच्यावर. तुमच्यासाठी घर काय, माझा जीव सोडून देईल. फक्त देवाकडे एकच मागणे आहे. प्रत्येक जन्मी तुम्हीच माझे पती म्हणून पाहिजे. ही माया अर्जुनशिवाय अपूर्ण आहे."
मायाच्या डोळ्यांत अश्रू येतात. माया पुढे जाऊन अर्जुनला घट्ट मिटून मारते. काही क्षणांनी माया फिरते आणि घराकडे जायला लागते. अर्जुन मात्र तिच्याकडे रस्त्याकडे बघत होता...
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा