"बाप : मायेची ढाल" भाग - १२
"माया... माया..." अर्जुनचा तो हसरा आवाज ऐकून मायाच्या काळजाचा ठोकाच चुकला. किती दिवस झाले होते? अर्जुनच्या मुखातून स्वतःचे नाव इतक्या प्रेमाने ऐकायला हे तिलाच आठवत नव्हते. माया धावतच बाहेर आली. अर्जुनने तिच्या हातात गजरा दिला. त्याच्या चेहऱ्यावर एक पुसटसे हसू होते.
तो गजरा हातात पडताच मायाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. तिला वाटले की तिने दुकानात केलेली धडपड, तिचे माफी मागणे, आणि तिचे अश्रू अर्जुनच्या काळजापर्यंत पोहोचले आहे.
"अर्जुनने मला माफ केले... माझं प्रेम मला परत मिळाले." या विचारात माया स्वंयपाक घरात निघून गेली. तिने तो गजरा अत्यंत प्रेमाने आपल्या केसांत माळला. तो मोगऱ्याचा सुगंध आज तिच्या सुखी संसाराच्या परतीचा सुगंध वाटत होता.
थोड्या वेळाने अर्जुन फ्रेश होऊन बाहेर आला. घरातले सगळे जेवायला बसले. आज घरातील वातावरण एकदम बदलले होते. अर्जुन सर्वांशी हसून बोलत होता. घरात खेळीमेळीचे वातावरण आज कितीतरी दिवसांनी होते.
"कार्तिक, आज शाळेत काय काय मस्ती केलीस रे?" अर्जुनने हसत विचारले.
"बाबा, आज मी मॅथ्स टेस्टमध्ये आऊट ऑफ मार्क्स मिळवले!" कार्तिक अभिमानाने म्हणाला.
"अरे वा! असेच मार्क्स मिळवत रहायचे." अर्जुनने कार्तिकची पाठ थोपटली.
"कार्तिक, तुझ्या बाबांना विचार की त्यांना किती मार्क्स पडायचे?" माया हसत म्हणाली.
"माया, कशाला माझी फजिती करायचे?" अर्जुन म्हणतो.
"बाबा, सांगना तुम्हाला किती मार्क्स पडायचे?" स्नेहा हट्टच धरते.
"मुलांनो मी सांगतो तुम्हाला. एकदा तुमच्या बापाला गणितात तीस पैकी साठ मार्क पडले होते." गजाननराव बोलतात.
"आजोबा, असे कसे होईल?" कार्तिक गोंधळून विचारतो.
"अरे याला सहा मार्क होते. ते पण याच्या मित्राने याचा पेपर लिहिला म्हणून. शिक्षकांनी घरी पेपर दाखवण्यासाठी दिला. मला पेपर दाखवायचा होता म्हणून याने सहा पुढे अजून एक शून्य स्वतःच दिला. मी पेपर बघतोय, तीस पैकी पेपर आणि मार्क साठ." सर्वजण हसायला लागतात.
"आजोबा, मग पुढे काय झाले?" स्नेहा कुतुहलाने विचारते.
"मग काय होणार!तुझ्या बाबाची पाट लाल लाल झाली." गजाननराव हसून सांगतात.
सर्वजण हसत होते.
"माया, आज माझ्या आवडीचा पुरणपोळीचा बेत आहे तर. एकदम मस्त झालंय जेवण. आज मी जरा जास्तच जेवणार. अजून एक पोळी दे मला."
अर्जुन आज नेहमीपेक्षा जास्त जेवला होता. मायाला हे बघून सुखावल्या सारख्या झाले. तिला वाटले विक्रम नावाचे वादळ तिच्या संसाराची एवढी एवढी एक वीट पण हलवू शकले नाही.
जेवण आटोपले. घरातील सर्व कामं आटपून माया बेडरूममध्ये गेली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज आले होते. खोलीत मंद प्रकाश होता. अर्जुन खिडकीत पाठमोरा उभा होता.
माया हळूच त्याच्या मागे गेली. तिने मागून दोन्ही हातानी अर्जुनला एक घट्ट मिठी मारली. मायाने आपला चेहरा त्याच्या पाठीवर टेकवला.
"अहो, आय लव यू... मला माहित होतं तुम्ही माझ्यावर जास्त काळ रागावू शकणार नाही. तुमचं माझ्यावरचं प्रेम रागाला टिकून देणार नाही." माया अत्यंत लाडाने आणि भावूक होऊन बोलत होती.
पण पुढच्याच क्षणी जे घडले, त्याने मायाच्या पायाखालची जमीनच सरकली. अर्जुनने तिचे हात झटक्यात बाजूला केले आणि तो तिच्या मिठीतून बाहेर आला आणि वळून मायाकडे बघितले.
अर्जुनच्या चेहऱ्यावर आता मगाशी जेवताना असलेले ते हसू किंवा तो जिव्हाळा अजिबात नव्हता. तिथे फक्त एक शून्य आणि कोरडा भाव होता.
"गैरसमज करून नको घेऊस माया. मी बाहेर जे काही वागलो ते फक्त एक नाटक होते." अर्जुन एकदम शांतपणे बोलत होता.
माया जागीच थिजली. तिच्या काळजाचे तिला तुकडे तुकडे झाल्यासारखे वाटत होते. ती ज्याला प्रेम समजत होती, ते प्रेम नसून फक्त एक दिखावा होता.
"का? का केले तुम्ही असे नाटक? मला कशाला खोटी आशा दाखवली." माया अर्जुनला रडत विचारते.
"आई दुकानात आली होती. आई-बाबांना असे वाटतंय की आपल्यात काहीतरी बिनसले आहे. आपल्यामुळे घरातील कोणालाच त्रास होऊ नये म्हणून मी तसे वागलो." अर्जुन असे बोलून बेडवर झोपायला जातो.
मायाला आता तिच्या केसातील गजरा आता काटेरी वाटू लागला होता. माया आहे त्याच जागेवर सुन्न होऊन उभी होती. तिच्या मनात असंख्य प्रश्नांचे काहूर चालू होते.
काही क्षण गेल्यावर माया पुन्हा स्वतःशीच निर्धार करते की, "ती एकदिवस तिच्या अर्जुनचे प्रेम नक्की जिंकेल." आणि ती बेडवर झोपायला जाते.
माया बेडच्या एका बाजूला झोपताच अर्जुन उठला आणि बेडच्या खाली एक सतरंजी टाकली आणि तिथे झोपला.
मायाला मात्र हे बघवले नाही.
मायाला मात्र हे बघवले नाही.
"अहो हे करताय तुम्ही? तुम्हाला माझा स्पर्श नको असेल ते आता मी समजू शकते. पण तुम्ही असे खाली झोपलेलं मला आवडणार नाही. मी खाली जमीमीवर झोपते. तुम्ही वर येऊन झोपा." माया केविलवाणे होऊन बोलत होती.
पण अर्जुनने तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्याने डोळ्यांवर हात ठेवले आणि तो तसाच पडून राहिला. जणू काही माया जे बोलली ते त्याच्या कानावर पडलेच नाही.
माया हतबल झाली. तिला समजले की अर्जुन तिचे काहीही ऐकणार नाही. मग तीही उठली आणि बेडच्या दुसऱ्या बाजूला जमिनीवर एक सतरंजी अंथरूण झोपली.
अर्जुनचा हा अनोळखीपणा तिला खूप शिक्षा देऊन जात होता. मायाला वाटत होते, "कदाचित हिच तिची शिक्षा असेल! ज्या नवऱ्यासाठी ती सर्वकाही होती, आज तोच या चार भिंतीच्या मध्ये अनोळखी म्हणून वावरत आहे."
अर्धी रात्र उलटून गेली. रात्रीचे तीन वाजले असावेत. बाहेर चांगलीच थंडी पडली होती. अर्जुनला तहान लागली होती म्हणून तो उठला. पण त्याचे लक्ष मायाकडे गेले.
माया थंडीने कुडकुडत होती. तिने अंगावर पांघरुन घेतले नव्हते. अर्जुन आता कितीही कठोर वागत असला तरी त्याला मायाची काळजी होती.
अर्जुनने कपाटातून एक ब्लँकेट काढून सावकाश मायावर टाकले. तो कितीही दुखावलेला होता तरी त्याचे मायावर अजूनही खूप प्रेम होते.
अर्जुन मायाजवळ बसला. त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि सावकाशपणे फिरू लागला. त्याचे डोळे हलकेसे पाणावतात.
"माया... किती सुंदर नातं होतं आपलं? पण कोणाची नजर लागली आपल्या नात्याला काय माहिती! मला घडाघडा तुझ्याशी बोलावे वाटते पण... " अर्जुन स्वतःशीच मायाच्या डोक्यावरून सावकाश हात फिरवत पुटपुटत होता.
सकाळ झाली होती. मायाचे डोळे उघडलेले. तिला तिच्या अंगावर पांघरुन दिसले. पण तिला आठवले की तिनेतर पांघरूण घेतलेच नव्हते. मग मायाला वाटते अर्जुनने टाकले असेल.
मायाला पहिल्या क्षणी वाटते यांनी केवळ दिखावा करण्यासाठी पांघरूण टाकले असेल. पण दुसऱ्याच क्षणी मायाच्या लक्षात आले की खोलीत ते दोघेच असताना अर्जुन कोणासमोर दिखावा करतील.
मायाच्या चेहऱ्यावर हसू आले. तिच्यात जणू एक उर्जाच संचारली. मायाने सर्व तिचे आवरून घेतले. थोड्यावेळाने अर्जुन पण उठला. मायाचे अर्जुन उठल्यापासून त्याच्याकडेच लक्ष होते. अर्जुनलाही हे समजले होते. पण तो मायाकडे लक्ष देत नाही.
"रात्री तुम्ही पांघरूण टाकले तेही नाटक होते का? नाही म्हणजे खोलीत तर आपण दोघेच होते मग तुम्ही पांघरूण का टाकले? आणि नाही म्हणू नका! मला माहिती आहे ते तुम्हीच टाकले." माया बोलताना तिच्या चेहऱ्यावर एक चमक होती.
"खरं तर मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा नाहीये. पण तुझा गैरसमज होऊ नये म्हणून सांगतो. तू थंडीने कुडकुडत होती म्हणून फक्त माणुसकी खातर टाकले. तू आजारी झाली असती तर परत घरातल्यांनी काळजी केली असती म्हणून टाकले." अर्जुन असे बोलून आंघोळ करण्यासाठी जातो.
माया उभी राहून स्वतःशीच बोलत होती.
"अर्जुन तुम्ही कितीही नाही बोलला तरी मला खात्री आहे. तुमचे प्रेम अजूनही तसेच आहे. हा आता त्या प्रेमावर राग हावी झाला आहे इतकेच. पण मी हळूहळू त्या रागावर माझ्या प्रेमाने फुंकर घालेल आणि तुमचे ते प्रेम परत मिळवेल. अर्जुन मायाचे होते, आहे कायम असतील...
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा