Login

"बाप : मायेची ढाल" भाग - ११

एका सर्वसामान्य माणसांची कुटुंबासाठीची लढाई
"बाप : मायेची ढाल" भाग - ११

सकाळची वेळ होती. सूर्यकिरणांनी संपूर्ण घर उजळून गेले होते. पण अर्जुन आणि माया यांच्या नात्यातील अंधार मात्र अजूनही दाटच होता.

मायाला विक्रमचा फोन आला होता. अर्जुन देखील बाजूलाच उभा होता. विक्रम मायाला ब्लॅकमेल करत होता. पण मायाने त्याला सांगितले की तिने अर्जुनला सर्व सांगितले आहे. त्यामुळे तिला आता कशाचीच भीती नाहीये.

मायाने विक्रमचा फोन कट केला आणि त्याला ब्लॉक केले. तिला आता खूप मोकळे वाटत होते. "मी अर्जुनला सर्वकाही सांगितले आहे" असे सांगताना तिला एक वेगळीच ऊर्जा जाणवली होती.

मायाने अर्जुनकडे पाहिले, तिला वाटले ती विक्रम बरोबर असे बोलल्याने अर्जुनला आवडले असेल. अर्जुन तिच्याबरोबर बोलेल. पण अर्जुन काहीच बोलत नाही. अर्जुन काहीच बोलत नाही हे लक्षात आल्यावर ती स्वतःच बोलण्याचा पुढाकार घेते.

"अहो, मला आता खूप मोकळं वाटत आहे. कसलीही भीती वाटत नाहीये." माया म्हणाली.

अर्जुन काहीच प्रत्युत्तर देत नाही. तिच्याकडे बघत पण नाही.

काही क्षणांनी माया पुन्हा बोलते, "आज डब्याला तुमच्या आवडीची भाजी बनवली आहे."

अर्जुन पुन्हा काहीच बोलत नाही. त्याने आपले घड्याळ हातात घातले, पाकीट खिशात ठेवले आणि एकही शब्द न बोलता, अत्यंत निर्विकार चेहऱ्याने तो घराबाहेर पडला.

त्याच्या त्या शांत निघून जाण्याने मायाच्या आनंदावर विरजण पडले. विक्रमला ठणकावून सांगितल्याबद्दल अर्जुन काहीतरी बोलतील असे तिला वाटले होते पण तसे काहीच झाले नाही.

दुकानात गेल्यावर अर्जुनचे कामात लक्ष नव्हते. तो हिशोबाची वही समोर घेऊन बसला होता, पण त्याचे लक्ष वहीत नव्हते. ज्या चेहऱ्यावर कायम हास्य असायचे आज त्या हास्याची जागा एका भयाण शांततेने घेतली होती.

अर्जुनला असे बघून दुकानात काम करणारा कामगार विचारतो, "दादा, आज तब्येत बरी नाहीये का?" नाही म्हणजे तुमचे कामात लक्ष नाहीये म्हणून म्हटले."

"अरे, नाही काही नाही." अर्जुन चेहऱ्यावर एक खोटे हसू आणून बोलतो.

"तुम्ही एकटक वहीत बघत होता. हात थांबलेला होता. तुम्हाला आजपर्यंत असे कधीच बघितले नाही म्हणून विचारले."

"आरे हिशोबात थोडा घोळ वाटत होता, म्हणून विचार करत होतो की काय घोळ असेल?"

"मग मी बघू का वही? काही राहिले आहेका लिहायाचे?"

"नाही... नाही... काही गरज नाहीये. माझ्या लक्षात आले आहे."

इकडे माया घरी नव्या जिद्दीने उभी राहिली होती. त्या वाईट घटनेतून ती आता पूर्णपणे बाहेर आली होती. आता तिचे एकमेव ध्येय होते, अर्जुनचा गमावलेला विश्वास आणि प्रेम परत मिळवणे.

मायाने घरातील सर्व कामं आटोपली आणि अर्जुनसाठी काय काय करता येईल याचा विचार करू लागली. तिने अर्जुनचे सर्व कपडे इस्री करून ठेवले. त्यांची खोली पूर्ण आवरून घेतली. एकदम अर्जुनला आवडते तशी. अर्जुनचे सर्व सामान
एकदम व्यवस्थित लावून ठेवले.

मायाला वाटते दुकानात जावे. म्हणजे अर्जुन बरोबर वेळ देखील घालवता येईल. दुकानातल्या कामात पण मदत करता येईल. माया आवरून घेते आणि दुकानात निघते. बाहेर हॉलमध्ये सावित्रीबाई बसलेल्या असतात.

"आई, मी दुकानात चालले आहे." माया सांगते.

"दुकानात असे मध्येच काय काम निघाले?" सावित्रीबाई विचारतात.

"तसे काही खास काम नाही. घरात काही काम नाहीये. मलाही कंटाळा आला आहे. म्हणून मला वाटले दुकानात जावे. बघू तिथे यांना काही मदत झाली तर." असे बोलून माया निघते.

माया गेल्यावर सावित्रीबाई गजाननरावांना बोलतात, "अहो, तुमच्या लक्षात आले आहे का? माया परत पहिल्यासारखे वागायला लागली आहे."

"हो, तिच्या वागण्यात गेले काही दिवस जो तणाव, चिंता दिसत होती ती आता नाही दिसत." गजाननराव बोलतात.

"तीचे वागणे बदललं आणि अर्जुनचे देखील. जो अर्जुन हसून खेळून रहायचा, तो आता एकदम शांत झाला आहे. पहिल्यासारखं बोलत नाही, वागत नाही."

"साविती, मला वाटते आपण त्या दोघांशी बोलले पाहिजे."

"मलाही तेच वाटते ओ. माया कदाचित आपल्याला सांगेल देखील पण अर्जुन सांगेल असे नाही वाटत. आपल्याला माहिती आहे त्याला दुःख मनातल्या मनात साठवून ठेवायची सवय आहे. तो कधीच कोणाला काही सांगत नाही."

"सावित्री, तरीदेखील आपल्याला प्रयत्न करायला लागतील. सावित्री मी त्यांच्यासोबत बोललो तर ते दोघेही मला काहीच सांगणार नाही. पण तुला सांगतील. तू बोल त्यांच्याशी."

"माया दुकानातून आली की मी दुकानात जाते. पहिले अर्जुन सोबत बोलते आणि मग मायासोबत. देवा... पांडुरंगा... माझ्या पोरांच्या आयुष्यात काही अडचण असेल तर ती दूर कर रे." सावित्रीबाई हात जोडून देवाला प्रार्थना करतात.

इकडे माया दुकानात आली होती. तिला दुकानात बघताच अर्जुनला आश्चर्य वाटते. पण तो काहीच बोलत नाही. आणि तिच्याकडे बघत सुद्धा नाही.

"अहो, मला एखादे पुस्तक सांगना वाचण्यासाठी." माया अर्जुन सोबत बोलण्याचा प्रयत्न करते पण अर्जुन काहीच उत्तर देत नाही.

मायाच्या लक्षात येते की अर्जुनला बोलतं करण्यासाठी तिला शक्कल लढवावी लागेल. माया खुर्चीवरून उठते आणि दुकानात फेऱ्या मारता मारता विचार करू लागते. माया दुकानाच्या मागच्या कोपऱ्यात आल्यावर तिला एक सुचते.

वरतून पुस्तकं काढण्यासाठी तिथे एक छोटी शिडी ठेवली होती. माया ती शिडी हाताने खाली पडते आणि स्वतः खाली हळूच झोपून किंचाळते, "आईsss... गं!"

अर्जुन धावत मागे येतो. मायाला बघून त्याला वाटते की ती पडली आहे. अर्जुन शिडी उचलून ठेवतो. त्याने बघितले की माया हाताला पकडून बसली आहे.

अर्जुन मायाच्या खांद्याला पकडून तिला उठवतो. पण बोलत काहीच नाही. माया एकटक अर्जुनकडे बघत होती. तिला पाहिजे होते तेच घडले होते. तिच्या चेहऱ्यावर हसू होते.

मायाला उठून बसल्यावर अर्जुन तिचा हात हातात घेतो आणि बघतो किती लागले आहे. मायाने जिथे दुसऱ्या हाताने हात पकडला होता. तिथे तो हळूच फुंकर घालू लागतो.

माया एकटक अर्जुनकडे बघत होती. अर्जुन मायाकडे बघतो. तिच्या चेहऱ्यावर हसू बघतो आणि त्याच्या लक्षात येते मायाला काहीच झाले नाही. तो रागाने तिच्याकडे नाही लागतो.

अर्जुनचे डोळे मोठे झाले होते. मायाच्या लक्षात येते की मला लागले नाही हे अर्जुनच्या लक्षात आले आहे. माया पुन्हा कण्हायला लागते. अर्जुन रागात उठून परत त्याच्या जागेवर जातो. पण अर्जुन मायाला बघायला आला, यामुळे मायाच्या चेहऱ्यावर हसू येते.

माया अर्जुन जवळ येऊन बोलते, "मला खात्री होतीच की तुमचे माझ्यावरचे प्रेम जराही कमी झाले नाही. या रागाचं काय एक दिवस कमी होईल की!" असे बोलून माया घरी निघून जाते.

अर्जुन पुन्हा दुकानात त्याचे काम करू लागतो. थोड्यावेळाने माया घरी पोहोचली होती. आणि ठरल्याप्रमाणे माया घरी येताच सावित्रीबाई दुकानात यायला निघतात.

अर्जुन कामात होता. आईला बघताच त्याला अजून एक धक्का बसतो. पहिली माया, आता आई. घरून सारखे आज कोणतरी दुकानात येत आहे. चालले तरी काय आहे?" असे अर्जुनला वाटते.

"आई, तू दुकानात आली! तुला काही लागत होते तर मला सांगायचे. मी घेऊन आलो असतो." अर्जुन बोलतो.

सावित्रीबाई दुकानातील कामगारांना बाहेर जायला सांगतात.

"अर्जुन, तुझे आणि मायाचे काय चालू आहे?" सावितीबाई थेट मुद्दाचं‌ बोलतात.

"कुठे, काय चालुये आई!." अर्जुन बोलतो.

"अर्जुन, आम्हाला कळत नाही असे वाटतं का तुम्हांला? या जगाचा तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे आम्हाला."

"आई, आता तुला कसे सांगू? खरंच आमच्यात काहीच चालू नाहीये. सगळं व्यवस्थित चालू आहे."

सावित्रीबाईनीं कितीही विचारले तरी अर्जुन त्यांना सत्य सांगू शकत नव्हता. शेवटी सावितीबाई विचारण्याचे थांबून घेतात आणि रागात घरी निघून जातात. अर्जुनला मात्र आई रागात घरी निघून गेल्याचे वाईट वाटत होते.

रात्र झाली होती. माया घरी जेवणाची तयारी करत होती. अर्जुनला खुश करण्यासाठी आज तिने त्याच्या आवडीचा पुरणपोळ्यांचा बेत आखला होता. माया एकदम मनापासून पुरणपोळी बनवत होती.

"पण आता या परिस्थितीत मी बनवलेली पुरणपोळी अर्जुन खातील की नाही?" हा प्रश्न तिचे मन खात होता.

थोडावेळ गेल्यावर अर्जुन घरी येतो. तो दरवाजूनच "माया... माया..." आवाज द्यायला लागतो. अर्जुनचा आवाज ऐकून माया एकदम खुश होते आणि धावतच बाहेर येते.

माया अर्जुनच्या समोर उभी होती. अर्जुन सोबत आणलेला गजरा तिच्या हातात देऊन बोलतो, "तुझ्यासाठी..."

क्रमश:
0

🎭 Series Post

View all