Login

"बाप : मायेची ढाल" भाग - १०

एका सर्वसामान्य माणसाचा कुटुंबासाठीचा लढा.
"बाप : मायेची ढाल" भाग - १०

रात्रीचे दोन वाजले होते. भूतकाळ सांगितल्यावर मायाने अर्जुनला घर सोडण्याचा निर्णय सांगितला होता. अर्जुन मायाकडे एकटक बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर तिच्या निर्णयासाठी कोणताही भाव नव्हता.

अर्जुन शांतपणे मायाला विचारतो, "मी नाही बोललो तर?

"तरीही मी जाणार... मी इथे राहून तुम्हाला तुटताना नाही बघू शकत. तुमच्या नजरेत माझ्यासाठी तिरस्कार नाही बघू शकत. मला बघून तुम्हाला रोज त्या नराधमाची आणि माझ्या चुकीची आठवण होईल. मी अचानक घरातून गेल्यावर तुम्हाला त्रास नको म्हणून मी तुम्हाला सांगत आहे." माया हरल्यासारखे बोलत होती.

मायाचे हे शब्द ऐकताच अर्जुनाच्या शांततेला तडा गेला. त्याच्या अंगाच्या तिळपापड झाला. रागाच्या भरात अर्जुन बोलतो, "मग आता कुठे जाणार आहेस तू? त्या विक्रमबरोबर जायचा विचार आहे का?"

अर्जुनच्या बोलण्याने मायाच्या काळजाचा तुकडा केला. अर्जुनचे शब्द एखाद्या विषारी बाणासारखे मायाला टोचत होते.

माया जागीच थिजली. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण तिने या प्रश्नावर काहीच उत्तर दिले नाही. तिला माहीत होते की, हे अर्जुन नाही तर त्याच्या आतली भयंकर वेदना आणि राग बोलत आहे.

"ज्या नवऱ्याने तिच्यावर जीवापाड प्रेम केलं, त्याच्या तोंडून असे शब्द ऐकणं हिच तिच्यासाठी तिच्या पापाची शिक्षा आहे," असे तिला वाटले.

काही क्षण विचार करून अर्जुन बोलतो, "तू कुठेच जाणार नाहीस!"

"मी माझा निर्णय सांगितला आहे. मी तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाईल." माया ठामपणे बोलते.

हे ऐकताच अर्जुनने अत्यंत विखारी निर्णय मायाला सांगितला. "जा... पण लक्षात ठेव, माझ्या परवानगीशिवाय तू या घराच्या उंबऱ्या बाहेर एक जरी पाऊल टाकले तर हा अर्जुन या जगात नसेल."

मायाच्या पायाखालची जमीनच सरकते. माया अर्जुनकडे बघत होती. अर्जुनही तिच्याकडेच बघत होता. दोघांच्याही नजरेत एक भयानक वेदना होती.

मायाच्या नजरेत फसवणुकीचा आणि अपराधाचा डोंगर होता, तर अर्जुनच्या नजरेत विश्वासघाताची खोल जखम होती.

एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे एकाच खोलीत एकमेकांपासून हजारो मैल दूर असल्यासारखे होते.

रात्र जसजशी पुढे सरकत होती, तसतशी खोलीतली शांतता अधिकच घुसमटवणारी होत चालली होती. अर्जुन तसाच खुर्चीवर बसलेला, माया तशीच बेडवर बसलेली. ती काळरात्र तशीच सरली.

सकाळ झाली होती. अर्जुनला खुर्चीवर थोडा डोळा लागला होता. अचानक त्याला जाग आली. त्याने डोळे चोळत समोर बघितले तर माया बेडवर नव्हती.

अर्जुनच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने झटकन आजुबाजूला पाहिलं. "माया..." त्याने आवाज देखील दिला पण त्याला प्रतिसाद नाही आला. त्याने बाथरूममध्येही बघितले, माया तिथेही नव्हती.

अर्जुनच्या अंगावर काटा आला. त्याला मायाचे बोलणे आठवते, "मी घर सोडून जाणार आहे." हे शब्द सारखे त्याच्या कानात घुमत होते.

अर्जुन वेड्यासारखा खोलीच्या बाहेर पळत गेला. त्याने हॉलमध्ये बघितले, तिथेही ती नव्हती. तो धावत स्वयंपाकघरात गेला, तिथेही माया नव्हती.

अर्जुनचे आई-वडील हॉलमध्ये बसलेले होते. त्यांना अर्जुन असा वेड्यासारखा का धावत असेल? असा प्रश्न पडला.

अर्जुनला घाम फुटला होता. त्याचे हातपाय थरथरत होते. छातीतली धडधड इतकी वाढली होती की त्याला श्वास घेणे कठीण झाले होते.

"माया खरंच मला सोडून गेली का? मी मायाशिवाय कसा जगू?" असे प्रश्न त्याच्या मनात येत होते. माया न दिसल्याने अर्जुन कासावीस होऊ लागला. अर्जुन धावत हॉल मध्ये जातो.

"आई... आई, माया कुठे आहे? तिला बघितले का?" त्याचा आवाज थरथरत होता.

"काय झाले अर्जुन? एवढा का घाबरला आहेस?" सावित्रबाईने विचारले.

अर्जुनच्या डोळ्यांत पाणी आले. त्याला काय बोलावे हे सुचत नव्हते. तो काहीतरी बोलणार, तेवढ्यात घरच्या मुख्य दरवाजातून माया दुधाची पिशवी घेऊन आली. अर्जुनने तिकडे बघितले आणि त्याच्या जीवात जीव आला.

मायाने अर्जुनची अवस्था बघितली. त्याचा घाबरलेला चेहरा मायापासून लपून राहिला नाही.

"घे! आली माया. किती घाबरला होता? सगळं घर डोक्यावर घेतलं होतं. माया दिसली नाही म्हणून. पण तू मायाला का शोधत होता?" सावित्रीबाई अर्जुनला विचारते.

मायाच्या संपूर्ण प्रकार लक्षात आला होता. पण ती काहीच बोलत नाही. अर्जुनला आईच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावे हेच कळत नाही.

अर्जुन स्वतःला सावरत बोलतो, "काही नाही आई. मी आंघोळीला जातो." असे बोलून अर्जुन खोलीत निघून जातो.

माया शांतपणे स्वयंपाक घरात निघून गेली. पण सावित्रीबाई आणि गजाननराव यांनी एकमेकांकडे बघितले. अर्जुनचे असे वागणे आणि मायाचा तो शांत चेहरा बघून, या दोघांमध्ये काहीतरी खूप मोठं आणि भयंकर बिनसले आहे, याचा संशय दोघांचाही पक्का झाला होता.

थोड्या वेळाने अर्जुन आंघोळ करून बाहेर आला आणि पाणी पिण्यासाठी स्वयंपाक घरात गेला. माया तिथेच कणिक मळत होती. अर्जुनला पाहताच तिचे हात थांबले.

"तुम्ही जग सोडून जाण्याची इतकी मोठी धमकी दिल्यावर कशी घर सोडून जाईल मी?" माया शांतपणे बोलते.

अर्जुनने पाण्याचा ग्लास तोंडाला लावला होता, पण त्याने मायाकडे वळून बघितले नाही.

माया पुढे बोलू लागली, "काल रात्री मी विचार केला. खूप विचार केला. मला एक गोष्ट पक्की समजली. जर मी घर सोडून गेले तर तो पळकुटेपणा होईल. पण जर मी इथेच थांबले आणि रोज तुमचा तो राग, तिरस्कार, ती घृणा हे सगळे सहन करणे हीच माझ्या पापाची खरी शिक्षा असेल."

अर्जुनची तहान भागली होती. पण माया पुढे काय बोलते हे त्याला ऐकायचे होते. म्हणून तो पुन्हा पाण्याचा ग्लास भरून घेतो.

माया पुढे बोलते, "मी फक्त तुमचा राग सहन नाही करणार तर तुमचं तेच प्रेम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. आणि मला ते एक दिवस मिळेल याची खात्री आहे. कारण मला माहिती आहे, तुमचे माझ्यावरचे प्रेम कमी झाली नाहीये. म्हणूनच तुम्ही मला घरात वेड्यासारखे शोधले. सध्या राग प्रेमाच्या वरचढ झाला आहे इतकेच. शेवटी काहीही झाले तरी अर्जुन फक्त मायाचे, आणि माया फक्त अर्जुनची आहे."

मायाचे बोलणे झाले आहे हे लक्षात आल्यावर अर्जुनने पाण्याचा ग्लास ठेवला आणि तो बाहेर हॉलमध्ये आला.

माया मुलांची शाळेची तयारी करत होती. अर्जुन तिथेच सोफ्यावर बसून विचारात होता. मायाचे लक्ष त्याच्याकडे होते.

मायाच्या वागण्यात आज घरात शांतता होती. नेहमीची चिडचिड, त्रागा आज दिसत नव्हते. आता तिच्या मनात विक्रमची कसलीच भीती नव्हती. आणि हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.

थोडावेळ गेल्यावर अर्जुन दुकानात निघण्याची तयारी करत होता. माया देखील खोलीत तिचे केस विंचरत होती. तोच मायाचा फोन वाजतो. तिला विक्रमचा फोन आला होता.
पण विक्रमचा फोन बघून मायाला जराही भीती वाटत नाही.

माया उलट फोन उचलून विक्रमला सांगते, "विक्रम, तू मला यापुढे फोन करायचा नाही. आणि जर केला तर मी पोलिसांत तुझी तक्रार करेल."

हे ऐकताच अर्जुन मायाकडे बघतो. माया अर्जुनकडे बघते.

विक्रम दुसऱ्या बाजूने बोलतो, "माया, मला तुझी काळजी वाटली म्हणून फोन केला. मी असे ऐकले तू नदीत उडी मारली?"

"मी नदीत उडी मारेल नाहीतर दुसरीकडे कुठे. तुझा काहीही संबंध नाहीये. मी तुला ब्लॉक करतेय." माया ठामपणे बोलते.

"तू मला ब्लॉक करणार. तुझ्यात एवढी हिंमत कुठून आली? आपले फोटो पाठवू का तुझ्या नवऱ्याला?" विक्रम मायाला पुन्हा धमकी देतो.

"तुझ्या धमक्यांनी मला आता काही फरक पडत नाही. मी माझ्या अर्जुनला सर्वकाही सांगितले आहे. आता मी तुला ब्लॉक करते."

माया असे बोलून विक्रमचा फोन कट करते. आणि त्याला ब्लॉक करते.

"अहो, मला आता खूप मोकळे वाटत आहे. कसलीही भीती वाटत नाही." माया अर्जुनकडे बघून बोलते.

अर्जुन मायाला काहीच उत्तर न देता दुकानात जायला निघते. आणि माया मोकळ्या मनाने घरातील कामं करायला लागते...

क्रमश:

0

🎭 Series Post

View all