Login

"बाप : मायेची ढाल" भाग - ९

एका सर्वसामान्य माणसाची कुटुंबासाठीची लढाई.
"बाप : मायेची ढाल" भाग - ९

माया तिच्या आणि विक्रमबद्दल अर्जुनला सांगत होती. पाऊस येणे, झाडाखाली थांबणं हे मायाने अर्जुनला सांगितले होते.

ते ऐकून अर्जुनला मेल्याहून मेल्याहून मेल्यासारखे झाले होते. त्याच्या कानात शिशाचा रस ओतल्यासारखे त्याला वाटत होते. अर्जुन उठतो आणि खिडकीजवळ जातो. अर्जुन बाहेर आकाशात एकटक बघत होता. अचानक त्याचा राग अनावर होतो आणि तो संतापाने खिडकीवर हात मारतो.

खिडकीतील लोखंडी गज त्याच्या हाताला लागतो आणि हातातून रक्तस्राव सुरू होतो. तरीही अर्जुनला त्याच्या वेदना जाणवत नव्हत्या.

हातावरचा तो प्रहार बघून माया घाबरली. "अहो! हे काय केले तुम्ही!" माया रडतच त्याच्याजवळ जाते. ति साडीचा पदर फाडून अर्जुनच्या हाताला बांधायला लागली. अर्जुन तिचा हात जोरात झटकला.

त्याची नजर आता अंगाऱ्यासारखी लाल झाली होती. त्या नजरेत एक तिरस्कार आणि घृणा होती, जी मायाने आजवर कधीच पाहिली नव्हती.

अर्जुनच्या हाताच्या जखमेतून रक्त येत होते, पण त्या जखमेपेक्षा काळजाला झालेली जखम कितीतरी पटीने खोल होती.

"हात लावू नकोस मला!" अर्जुन मायावर ओरडला.

अर्जुन मायाच्या एकदम जवळ गेला. आणि अत्यंत विखारी आवाजात म्हणाला, "सांग... पुढे अजून किती माती खाल्ली! ऐकुदे मला तू किती खालच्या पातळीला गेली होती."

​माया जमिनीवर कोसळली. तिने अर्जुनचे पाय पकडले. पण अर्जुनने त्याचे पाय तिच्या तावडीतून सोडवले आणि पुन्हा बेडवर येऊन बसला.

मायाला हे सर्व सहन होत नाही. ती खोलीच्या बाहेर जायला लागतो. पण अर्जुन तिला थांबवून बोलतो, "माया मला अजून पूर्ण सत्य कळाले नाही."

मायाचे पाय बेडरुमच्या दरवाजात थबकतात. ती पुन्हा बेडवर येऊन बसते. मायाने डोळे पुसले आणि पुन्हा बोलू लागली.

"आम्ही दोघेही त्या झाडाखाली उभे होतो. पाऊसाने आम्ही दोघेही ओलेचिंब झालो होतो. थंडीने पूर्ण शरीर कापत होते. विक्रम माझ्या जवळच उभा होता. तो उभा होता तिथली माती ओलं असल्यामुळे ढासळली आणि त्याचा तोल गेला."

"मी त्याला सावरायला गेले आणि आम्ही दोघेही खाली पडलो. विक्रम माझ्या खूप, खूप जवळ होता. त्याने स्वतःचे नियंत्रण गमावले किंवा जाणूनबुजून केले, मला माहित नाही. पण त्या एका क्षणात माझ्या डोक्यात काय आले काय माहित.

"मी स्वतःवरचे नियंत्रण गमावले. त्या एका दुर्बल क्षणात माझ्याकडून खूप भयंकर, न भरून येणारी चूक घडली. विक्रमने संधीचा फायदा घेऊन त्या काही क्षणांचे फोटो, व्हिडिओ काढून घेतले."

"त्या काही क्षणातच मी भानावर आले. मला माझी चूक कळली आणि विक्रमला माझ्यापासून दूर केले. त्या दहा-पंधरा सेकंदानंतर मी परत त्याला कधीच मला हात देखील लावू दिला नाही."

"म्हणजे एका क्षणासाठी का होईना तू दुसऱ्याचा विचार केला." अर्जुन बोलतो.

"मला नाही माहित त्यावेळेस मी असे का केले? देवाने मला जीवापाड जपणारा, मनापासून प्रेम करणारा, स्वतःच्या अगोदर माझा विचार करणार जोडीदार दिला होता. आणि मी काही क्षणासाठी का होईना त्याला फसवले होते. मी स्वतःच्याच नजरेत गुन्हेगार झाले होते." माया बोलते.

"पुढे काय झालं?" अर्जुनने विचारल्यावर माया सांगू लागते.

"पुढे तो माझे मन वळवू लागला. प्रेमाचे शब्द वापरायला लागला. पण मी त्याला स्पष्टपणे सांगितले की माझे फक्त माझ्या अर्जुनवर माझे प्रेम आहे. मी फक्त त्यांचीच आहे. पण तो काही ऐकत नव्हता."

"मी तयार होत नाही म्हटल्यावर त्याने माझ्यावर जबरदस्ती करायला सुरुवात केली. मी त्याला जोरात धक्का दिला. तो माझ्यावर पुन्हा चाल करून येत होता. मी बाजूलाच पडलेले लाकूड घेतले आणि त्याच्या पोटात जोरात मारले. तो वेदनेने कळवळून खाली वाकला. मी लगेच तिथून जीव मुठीत घेऊन पळ काढला."

"विक्रम माझा पाठलाग करत होता. त्याने पुन्हा मला पकडले. मी विनवण्या करत होते, पण त्याच्या डोक्यात वासनेचे भूत शिरले होते. मला कोणताच मार्ग सुटकेचा दिसत नव्हता. मग मी काहीही विचार न करता माझे दोन बोटं त्याच्या दोन्ही डोळ्यात घातले."

"विक्रमला असह्य वेदना होत होत्या आणि काहीही दिसत नव्हते. मी पुन्हा तिथून सुसाट सुटले आणि थेट फार्महाऊसवर आले."

अर्जुनने एक दीर्घ श्वास घेतला. आता मायावर कितीही राग असला तरी माया सुखरूप फार्महाऊसवर पोहोचली होती. हे ऐकून त्याला मनाच्या एका कोपऱ्यात बरे वाटले होते. माया फार्महाऊसवर काय घडले ते सांगू लागते.

"मी फार्महाऊसवर भिजलेल्या, चिखलाने माखलेल्या अवस्थेत आले होते. माझी अवस्था बघून सर्वजण माझ्याजवळ आले. मी सर्वांना घडलेला प्रकार सांगितला. मला वाटले माझी मैत्रीण कावेरी तरी माझी बाजू घेईल."

"पण माझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. कावेरीने देखील नाही." मायाच्या आवाजात मैत्रिणीच्या विश्वासघातचे दुःख होते.

"थोड्याच वेळात तिथे विक्रम आला. तिथे आल्यावर त्याने सर्व बनाव रचला. त्याने सर्वांसमोर माझ्यावर घाणेरडे आरोप करायला सुरुवात केली. त्याने जे माझ्यासोबत केले त्याने मी त्याच्यासोबत केले असे सर्वांना सांगितले."

"सर्वजण माझ्या विरोधात गेले. कावेरीने तर खालच्या पातळीवर जाऊन माझ्यावर आरोप केले. ती सर्वांना म्हटली, "ही पहिल्यापासून अशीच आहे. हिला कायम अनेक पुरुष लागत आले आहे."

"मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. त्यांनी सगळ्यांनी मला चरित्रहीन ठरवले आणि तिथून अपमानित करून धक्के मारून काढून दिले."

"मला घरी येण्याची हिंमत नव्हती. म्हणून मी माझ्या भावाकडे गेले. मी त्याला काहीच सांगितले नाही. आणि मग सकाळी घरी आले.

"मला वाटले विक्रम ते प्रकरण तिथेच संपले असेल. पण एक-दोन दिवसांंनीच विक्रमने मला त्रास द्यायला सुरूवात केली. धमकीचे फोन येऊ लागले, त्याचे गुंड रस्त्यात अडवून मला धमकी देऊ लागले. विक्रमने मला ते फोटो आणि व्हिडिओ पाठवले आणि ब्लॅकमेल करायला सुरुवात केली."

"मला हे सर्व काही तुम्हाला सांगायचं होतं... पण माझी हिंमतच होत नव्हती. माझ्या आयुष्यातला तो सर्वात मोठा कलंक होता. तो मी तुम्हाला कसा सांगू शकणार होते."

"त्या क्षणापासून मी विक्रमला नेहमी टाळत आले. पण काल त्याने माझ्याकडे विचित्र मागणी केली. जी मी कधीच पूर्ण करू शकले नसते. त्यात मी तुम्हाला बाथरूममध्ये रडताना ऐकले. तुम्हाला समजले हे माझ्या लक्षात आले."

"तुम्ही माझ्यावर वेड्यासारखे प्रेम केले. आणि मी मात्र तुम्हाला फसवले. मी स्वतःच्याच नजरेत पडले. माझी जगण्याची इच्छा संपली होती. मुलांची काळजी वाटली पण मला खात्री होती की तुम्ही त्यांना आईचे प्रेम देखील द्याल. आणि मी नदीत उडी मारली..."

मायाचे सर्व सत्य प्रामाणिकपणे अर्जुनला सांगितले होते. माया बेडवर बसलेली होती. अर्जुन खुर्चीवर जाऊन छताकडे बघत होता. खोलीत भयाण शांतता होती. अर्जुनची नजर शून्यात होती."

मायाच्या डोळ्यांतील अश्रू आटले होते. पण आता चेहऱ्यावर प्रचंड पश्चात्ताप होता. आणि मनातील ओझे मोकळे झाल्याचे समाधान पण होते. बराच वेळ जातो. दोघंही एकमेकांशी बोलत नाही.

"तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे." माया अर्जुनला बोलते.

अर्जुन काहीच बोलत नाही. मायाला समजते की अर्जुन काहीच बोलण्याचा मनस्थितीत नाही. पण माया शांत राहत नाही.

"मला तुमची एका गोष्टीसाठी परवानगी पाहिजे." माया अर्जुनला विनंती करते.

अर्जुनला काहीच बोलत नाही. पण त्याची नजर मायाकडे फिरवतो. नजरेच जणू तो काय विचारतो.

"मी उद्या सकाळी ही घर सोडून जाणार आहे. मी तुमचा तिरस्कार घेऊन इथे राहू शकणार नाही. मला खात्री आहे, मी नसताना तुम्ही मुलांना आईचे आणि बापाचे प्रेम द्याल. आणि हो मी माझ्या माहेरी, मैत्रीण, किंवा नातेवाईक असे कोणाकडेही जाणार नाही. मी इतकी लांब जाईल की तिथून येणे मला शक्य होणार नाही. आणि मला कोणीही शोधू शकणार नाही."

मायाच्या बोलण्यात एक निर्धार होता. स्वतःच्या चुकीची शिक्षा म्हणून तिने हा निर्णय घेतला होता. अर्जुन मात्र मायाकडे एकटक बघत होता...

क्रमशः
0

🎭 Series Post

View all