Login

"बाप : मायेची ढाल" भाग - ८

एका सर्वसामान्य माणसाचा कुटुंबासाठीचा लढा.
"बाप : मायेची ढाल" भाग - ८

मायाला वेदना असह्य झाल्या होत्या. अर्जुनला सर्व सत्य सांगण्याचा निर्धार मायाने केला होता. अर्जुन देखील तिला सर्व सत्य सांगण्यासाठी बोलला होता. अगदी पहिल्यापासून आत्तापर्यंत जे झाले ते सर्व त्याला ऐकायचे होते.

खोलीत एक भयाण आणि जीवघेणी शांतता पसरलेली होती.
अर्जुनचे कान मायाकडे लागून होते. ती काय सांगते याची तो वाट बघत होता. आणि सत्य कितीही भयानक असले तरीही ते ऐकण्याची त्याची तयारी होती.

मायाच्या डोळ्यात अश्रू होते. अर्जुनचा चेहरा शांत होता. पण मनात उठलेलं वादळ काही थांबत नव्हते. मायाने एक दीर्घ श्वास घेतला. अर्जुनला विक्रमबद्दल सांगणे इतके सहज तिच्यासाठी नव्हते. पण पुढे तिचा संसार नीट होण्यासाठी हे सांगणे गरजेचे होते.

माया भूतकाळ सांगायला सुरुवात करते.

"अर्जुन, तुम्हाला माझी जिवलग मैत्रीण कावेरी माहितीच आहे. तुम्हीही तिला बऱ्याचदा भेटला आहात, आणि चांगलं ओळखतात देखील. कावेरी मला सख्या बहिनीसारखी होती. आम्ही दोघी एकमेकींना आमच्या आयुष्यातील अडीअडचणी, सुखदुःख सर्वकाही एकमेकींना सांगायचो."

अर्जुनने फक्त मान डोलावली. तो शांतपणे मायाचे शब्द ऐकत होता.

माया पुढे सांगू लागली, "कावेरीच्या घरात तिची एक मोठी जाऊ होती. तिचं नाव राजेश्वरी. राजेश्वरी आणि कावेरी या दोघी जावा असल्या तरी त्यांच्यातल नातं सख्या बहिणीसारखंच होतं. याच राजेश्वरीचा भाऊ होता विक्रम."

"एकदा कावेरीच्या घरी एक मोठी कौंटुबिक पार्टी होती. कावेरीनं मला देखील त्या पार्टीला बोलावले होते. सुरवातीला मी नकार दिला, कारण मला अशा पार्ट्यांना जायची सवय नव्हती."

"पण कावेरीने हट्टच धरला. मग मला जावे लागले. तिथेच पार्टीत माझी आणि विक्रमची पहिल्यांदा ओळख झाली. त्याच वागणं, बोलणं खूपच आदबशीर होतं. तो प्रत्येकाशी खूप नम्रपणे बोलत होता."

"त्याने स्वतःहून येऊन माझी चौकशी केली. अत्यंत सभ्यपणे तो बोलत होता. त्या दिवशी त्याच्या बोलण्यात, वागण्यात मला असा कोणताही वाईट हेतू दिसला नाही. तो एक चांगला, सुसंस्कृत कुटुंबातला मुलगा आहे, असच मला वाटल होतं."

माया थोडा वेळ थांबली. तिने पाण्याचा एक घोट घेतला. अर्जुनची नजर तिच्यावरच खिळलेली होती. काहीक्षण थांबल्यानंतर माया पुन्हा बोलायला लागते.

"सर्वकाही ठीक चालू होते. विक्रम त्या पार्टी नंतर मला बराचदा भेटला पण त्याच्या वागण्या, बोलण्यातून मला कधीच काही चुकीचे जाणवले नाही. आम्ही एकमेकांसोबत हसून, खेळायला बोलायला लागलो."

"सर्व काही सुरळीत चालू असताना माझ्याकडून एक चूक घडली. कावेरी मला चारचाकी गाडी चालवायला शिकवत होती. कावेरीला गाडी चांगली चालवता येत होती म्हणून मीच तिच्याकडे गाडी शिकण्याचा आग्रह धरला. आणि तिने ते मान्यपण केले."

"एका रात्री कावेरी मला गाडी शिकवत होती. मलाही थोडीफार गाडी चालवता यायला लागली होती. आम्ही रस्त्यावरून चाललो होतो. रस्ता पूर्णपणे रिकामा होता. पण माझ्याकडून गाडीचा ताबा सुटला. आणि गाडीचा अपघात झाला."

हे ऐकताच अर्जुन डोळे मोठे करून बोलतो, "तुझा अपघात झाला होता आणि तू साधे मला सांगितले पण नाही."

मायाच्या डोळ्यात भीती होती, "मी सांगणार होते तुम्हाला पण...." माया थरथरत बोलते.

मायाचे बोलणे पूर्ण होण्याच्या अगोदरच अर्जुन बोलतो, "पण काय माया? तुला काही झाले असते तर माझ्या जीवाचे..."
अर्जुन बोलता बोलता थांबतो. त्याचे डोळे पाणावतात.

"ते प्रकरण तेव्हा मिटले होते. आणि तुम्हाला त्रास नको व्हायला म्हणून मी सांगितले नाही." माया सांगते.

"अजून काय काय लपवून ठेवले माझ्यापासून?" अर्जुन चिडलेला होता.

"तुम्ही चिडू नका. मी तुम्हाला सर्वकाही सांगते." माया अर्जुनच्या हातावर हात ठेवून बोलते. अर्जुन तिच्या हातातून हात काढून घेतो.

अर्जुन शांत होतो. माया पुन्हा बोलायला सुरुवात करते,

"त्या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण एका रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानाचे खूप नुकसान झाले. तो दुकानदार पोलिसात जाण्याची धमकी देत होता. मी खूप घाबरले होते."

"अपघाताच्या ठिकाणी पोलीस आले होते. कावेरीने विक्रमला फोन करून बोलावून घेतले. विक्रमने त्याची ओळख वापरून ते प्रकरण वाढवू दिले नाही. त्या दुकानदारालाही त्याने खूप मोठी रक्कम दिली. ते प्रकरण तिथेच संपले."

"मला कावेरीने सांगितले की प्रकरण आता संपले आहे त्यामुळे तू भाऊजींना म्हणजे तुम्हाला काहीच सांगू नको. मलाही वाटले कशाला तुम्हाला त्रास द्यायचा."

"मी विक्रमच्या उपकराच्या ओझ्याखाली दबले गेले. माझ्या मनात त्याच्याबद्दल कृतज्ञतेची आणि आदराची भावना निर्माण झाली. मला वाटलं की त्याने माझी, माझ्या घरची बदनामी होण्यापासून वाचवले आहे."

"हळूहळू आमच्यात मैत्री झाली. पण माझ्या बाजून ही मैत्री अगदी साधी, निखळ, आणि फक्त उपकाराच्या भावनेतून निर्माण झाली होती. मला त्याच्यात कधीच काही वाईट दिसले नाही."

"विक्रम मला नेहमीच घरगुती छोट्या-छोट्या कार्यक्रमांना, पार्ट्यांना बोलवू लागला. तिथे कावेरी नेहमी माझ्या सोबत असायची म्हणून मला कधीच काही वावग वाटलं नाही. मी एक चांगला माणूस म्हणून त्याच्याकडे बघत होते."

अर्जुनने एक दीर्घ श्वास सोडला. त्याच्या लक्षात येत होते की विक्रम कशाप्रकारे मायाला उपकाराच्या ओझ्याखाली दाबून तिला फसवत होता.

"एवढं सगळं तो करत होता. घरातील छोट्या-छोट्या कार्यक्रमांना, पार्ट्यांना बोलवत होता. तुला त्याच्यावर एकदाही संशय आला नाही." अर्जुन मायाला विचारतो.

"अहो, मी मनापासून सांगते. मलाही एकदाही काही वावगं वाटलं नाही. आणि कावेरी बरोबर असायची त्यामुळे मला आधार मिळायचा." माया सांगते.

"तुला वावगं वाटलं नाही का तू वाटून घेतले नाही." अर्जुन संशयाच्या नजरेने बघतो.

"तुमचा संशय मी समजू शकते. पण विश्वास ठेवा माझ्यावर." मायाच्या डोळ्यातून अश्रू येतात.

"ठीक आहे. पुढे काय झाले?" अर्जुन बोलल्यावर माया पुढे सांगायला सुरुवात करते.

"असेच काही दिवस निघून गेले होते. सर्व छान चालले होते. विक्रम त्याची मर्यादा राखून होता. आणि एकदिवस राजेश्वरीचा वाढदिवस आला. विक्रमने राजेश्वरीला सरप्राइज पार्टी द्यायचे ठरविले."

"त्यासाठी त्याने माझी मदत मागितली. तो मला म्हटला की, तुमची निवड चांगली आहे. तुम्ही मला गिफ्ट देण्यासाठी, पार्टीची थीम ठरवण्यासाठी मदत कराल का? त्याने अगोदर केलेल्या मदतीमुळे मलाही त्याला नाही म्हणता आले नाही."

"मी इच्छा नसतानाही त्या विक्रम सोबत पार्टीची तयारी करू लागले. आमची सर्व तयारी झाली. पार्टी विक्रमच्या फार्महाऊसवर होती."

"पार्टीचा तो काळा दिवस उजाडला. फार्महाऊसवर तयारी झाली होती. पार्टीला कावेरी, आणि इतर भरपूर सारे लोकं जमले होते. त्यामुळे मला काही चुकीचे होईल असे वाटले नव्हते."

"तितक्यात विक्रम माझ्याजवळ आला. त्याने मला सांगितले की पार्टीमध्ये जो ड्रेस राजेश्वरी घालणार आहे तो ड्रेस नेमका डिझायनरकडे राहिला आहे. त्याने मला ड्रेस आणण्यासाठी जायचे आहे असे सांगितले."

"मी त्याला नाही म्हणू शकले नाही, हिच माझी घोडचूक झाली. विक्रमने मोटारसायकल काढली आणि आम्ही राजेश्वरीचा ड्रेस आणण्यासाठी निघालो."

"रस्त्यावरची वर्दळ एकदम कमी होती. आजुबाजूला झाडं होती. आम्ही अर्ध्या रस्त्यात गेलो होतो आणि अचानक पावसाचे वातावरण झाले. मुसळधार पाऊस सुरू झाला. पाऊस इतका जास्त होता की समोरचे काही दिसत नव्हते."

"आजुबाजूला आडोसा घेण्यासाठी पण काहीच नव्हतं. शेवटी विक्रमने गाडी एका मोठ्या झाडाखाली थांबवली. आम्ही दोघेही त्या झाडाखाली थांबलो."

मायाचा श्वास जड पडला. शब्द मुखातून बाहेर येत नव्हते. अर्जुनसाठी जग थांबले होते. आणि मायाच्या डोळ्यातून फक्त अश्रूच्या धारा वाहत होत्या.

"माया, पुढे काय झाले?" अर्जुन मायाला विचारतो. पण माया काहीच बोलत नव्हती.

"तुला त्यावेळेस लाज नाही वाटली मग आज बोलायला का लाज वाटत आहे? तू स्वतःहून बोलली होती की तुम्हाला सर्वकाही सांगायचे आहे. मग आता का शांत बसली? तुझी वाचा आता का बंद झाली?" अजून मायावर खवळला होता.

अर्जुनचा आवाज वाढला होता. पण त्याच्या आवाजात वेदना होत्या, दुःख होते, फसवणुकीची सल होते. मायाच्या डोळ्यांतील अश्रुंच्या वाटे अपराधी पणाची भावना व्यक्त होत होती. अर्जुन मायाच्या समोरुन उठला आणि खिडकी जवळ गेला. त्याने त्याचा हात जोराने खिडकीवर मारला आणि त्याच्या हातातून रक्त येऊ लागली...

क्रमश:
0

🎭 Series Post

View all