Login

"बाप : मायेची ढाल" भाग - ६

एका सर्वसामान्य माणसाची कुटुंबासाठीची लढाई.
"बाप : मायेची ढाल" भाग - ६

सकाळी उठल्यानंतर अर्जुनला समजते की माया घरात नाहीये. तरीपण तो परत एकदा खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा मायाला संपूर्ण घरात बघतो पण माया घरात कुठेच नव्हती.

अर्जुनला वाटते की माया विक्रमलाच भेटायला गेली असणार. त्याचा राग अनावर होतो. संतापाने त्याचे डोळे लाल झाले होते.

अर्जुनने त्याची दुचाकी काढली आणि विक्रमच्या बंगल्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाऊ लागला. डोक्यात भयंकर विचार सुरू होते. गाडीच्या वेगावर त्याचे अजिबात नियंत्रण नव्हते.

रस्त्यावरची ट्रॅफिक, सिग्नल कशाचेही त्याला भान नव्हते. त्याच्या डोळ्यासमोर होता तो फक्त, त्या दिवशीचा हॉटेल मधला प्रसंग.

"जर विक्रमने मायासोबत कुठलाही गैरप्रकार केला असेल तर आज मी त्याचा जीव घेईन आणि आनंदाने तुरुंगात जाईल" अशी भावना त्याच्या मनात धगधगत होती.

अर्जुनची गाडी विक्रमच्या बंगल्याच्या समोर येऊन थांबते. बंगल्याच्या बाहेर सिक्युरिटी होती. त्याची पर्वा न करता अर्जुन गाडीवरून उतरतो. हाताच्या मुठी आवळल्या होत्या आणि एकदम त्वेषात बंगालच्या दिशेने जात होता.

अर्जुन सिक्युरिटी पर्यंत पोहचणार तोच अर्जुनाचा फोन वाजतो. हेड कॉन्स्टेबल शिंदेंनी अर्जुनला फोन केला होता. शिंदेंचा फोन अर्जुन टाळु शकत नव्हता.

"शिंदे साहेब, मी तुम्हांला नंतर फोन करतो." असे बोलून अर्जुन फोन कट करायला लागतो.

"अर्जुन तू जिथे असशील तिथून ताबडतोब सिटी हॉस्पिटल ये."

"साहेब मला आता यायला नाही जमणार."

"अर्जुन, माया हॉस्पिटल मध्ये आहे. मायाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. लगेच इकडे ये."

हे ऐकून अर्जुन सुन्न झाला होता. जणू त्याचे काळीजच कोणीतरी काढून घेतले असे त्याला झाले होते. अर्जुनच्या डोळ्यातून अश्रु येतात. तो फोन खिशात घालतो आणि आहे तसाच माघारी फिरतो.

गाडीची गती काही कमी झाली नाही पण अर्जुनाच्या मनातील विचार संथ झाले होते. त्याचा राग क्षणात विरघळला होता. त्याची जागा एका भयाण भितीने घेतली होती.

अर्जुन धावतच हॉस्पिटल मध्ये जातो. त्याला समोरच शिंदे दिसतात. अर्जुन त्यांच्याकडे जातो. त्याच्या डोळ्यात अश्रू आणि भीती दोन्ही होते.

"साहेब, कुठे आहे माया? काय झाले तिला?" अर्जुन शिंदेंना विचारतो.

"अर्जुन, माया बेशुध्द आहे. डॉक्टर ICU मध्ये तिला तपासात आहे." शिंदे असे बोलून अर्जुनला माया दाखवतात.

मायाला बघताच अर्जुनचे हातपाय गळून जातात. तो जमिनीवर कोलमडून जातो. शिंदे त्याला सावरतात आणि पाणी प्यायला देतात.

थोडावेळ गेल्यावर शिंदे अर्जुनला विचारतात, "अर्जुन मला नाही माहित आता हे विचारणे बरोबर आहे की चुकीचे. पण राहवत नाही म्हणून विचारतो, मायाने आत्महत्येचा प्रयत्न का केला? तुमच्या दोघांचेही नाते एवढे चांगले आहे. एकमेकांवर प्रेम आहे. घरीही सर्व चांगले आहे. मग मायाने असे का केले?

शिंदेच्या प्रश्नांनी अर्जुन गडबडून जातो.

"मला नाही वाटत मायाने आत्महत्येचा प्रयत्न केला असेल. तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल." अर्जुन प्रसंग सावरण्याचा प्रयत्न करतो.

बाजूलाच एक मुलगा उभा होता. त्याच्याकडे बोट करून शिंदे बोलतात, "यानेच मायाला वाचवले आहे. याच्या समोर मायाने नदीत उडी मारली होती."

"साहेब, मी काहीच सांगू शकत नाही. मलाही हाच प्रश्न पडला आहे की मायाने असे केले असेल तर का केले असेल? तुम्ही आम्हाला गेल्या कित्येक वर्षांपासून ओळखत आहात. तुम्हीच सांगा आमच्या दोघांमध्ये काही वाद होते का? किंवा घरात मायाला त्रास होत का?" अर्जुन शिंदेंना त्यांच्याच प्रश्नात अडकवतो.

"मलाही तोच प्रश्न पडला आहे, मायाने असे का केले?" शिंदे विचार करत बोलतात.

अर्जुन त्या मुलाजवळ जातो.

"तुझे खरंच खूप उपकार झाले. मी तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. तुलाही कधीही माझी काही गरज लागली तर निःसंकोचपणे माझ्याकडे ये." अर्जुन बोलतो.

"तुम्ही याला उपकार वैगरे नका समजू. माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहे त्या ताई. मग मी त्यांचा जीव वाचवणार नाही का!"

"मला सांग तू नक्की मायाला उडी मारताना बघितले होते का? का ती तिथे उभी होती आणि ती नदीत पडली आणि तुला वाटले तिने नदीत उडी मारली. म्हणजे पडली की उडी मारली?" अर्जुनला माहीत होते मायाने विक्रमला वैतागून आत्महत्येचा प्रयत्न केला असणार. पण त्याला शिंदेंना ती आत्महत्या नाही तर अपघात आहे असे दाखवायचं होते.

तो मुलगा अर्जुनच्या प्रश्नाने गोंधळून बोलतो, "तसा मी खूप लांब होतो, त्यामुळे ताई पडल्या की उडी मारली हे सांगणे कठिण आहे."

"ऐ... जरा नीट सांग काय झाले ते? अगोदर बोलला उडी मारली. आणि आत्ता वेगळेच बोलतोय." शिंदे त्या मुलाला विचारतात.

"आता म्हणजे पहिल्यांदी मला वाटले होते त्यांनी उडी मारली असेल. पण कदाचित त्या पडल्यापन असतील." मुलगा परत गोंधळून जातो.

तेवढ्यात तिथे सिनिअर इन्स्पेक्टर भोसले येतात.

"अर्जुन हे काय आहे सगळे? माया मला छोट्या बहिणी सारखी आहे. ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. तेही घरात, तुमच्या दोघांत सर्वकाही सुरळीत चालू असताना!" भोसलेंच्या बोलण्यात काळजी होती.

"साहेब मायाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न नाही केला. तुम्ही याला विचार." अर्जुन त्या मुलाकडे इशारा करून बोलतो.

"साहेब म्हणजे मला असे वाटले होते की त्यांनी उडी मारली. पण कदाचित त्या पडल्यापन असतील." तो मुलगा भोसलेंना सांगतो.

"मायाने काय केलं हे ती शुद्धीवर आल्यावर कळेलच आपल्याला. पण शिंदे चार्जशीट मध्ये या मुलाने आता जे सांगितले तेच लिहा." भोसले शिंदेंना सांगतात.

"हो साहेब." शिंदे बोलतात.

"अर्जुन जर मायाने आत्महत्येचा प्रयत्न केला तर तो कायद्याने गुन्हा आहे. पण हे प्रकरण मला आमच्यापर्यंत येऊन द्यायचे नाही. तू आणि तुझा परिवार आमच्या खूप जवळचा आहे. आणि तुझ्या परिवाराची बदनामी व्हावी असे मला वाटत नाही. जर काही असेल तर घरातल्या घरात मिटवून घे." भोसले अर्जुनला सांगतात.

"नाही साहेब तसे काहीच नाहीये." अर्जुन बोलतो.

थोडावेळ जातो. ICU मधून डॉक्टर बाहेर येतात. त्यांच्या चेहऱ्यावर एक विश्वास होता.

"पेशंट सुखरूप आहे. थोड्यावेळाने त्यांना शुद्ध येईल." डॉक्टरांनी असे सांगितल्यावर अर्जुनच्या जीवात जीव येतो.

"डॉक्टर, मी तिला कधी भेटू शकतो?" अर्जुन डॉक्टरांना विचारतो.

"त्यांना शुद्ध आली की तुम्ही त्यांना भेटू शकतात." डॉक्टर बोलतात.

"डॉक्टर तुम्हांला काय वाटते हा आत्महत्येचा प्रयत्न होता का नाही? म्हणजे पेशंटने उडी मारली की पडली?" भोसलेंनी डॉक्टरला असे विचारताच अर्जुन गडबडून जातो. त्याला वाटते आता डॉक्टर काय सांगतील?

"तशा त्याच्या शरीरावर कुठल्याच खुणा नाहीये. त्यामुळे त्यांनी उडी मारली की त्या पडल्या हे सांगणं कठीण आहे." डॉक्टर असे बोलल्यावर अर्जुनच्या जीवात जीव येतो.

"डॉक्टर मी तिच्या जवळ बसू शकतो का?" अर्जुन डॉक्टरांना विचारतो.

"तसं ICU मध्ये पेशंटच्या नातेवाईकांना बसण्याची परवानगी नसते. पण थोडावेळ तुम्ही बसू शकता." डॉक्टर अर्जुनला परवानगी देतात.

अर्जुन जरावेळ मायाजवळ बसतो. त्याला माया बरोबर घालवलेले सर्व चांगले क्षण आठवायला लागतात. थोडावेळ गेल्यावर डॉक्टर अर्जुनला परत बाहेर बोलावतात.

अर्जुनच्या लक्षात येते घरी आई, बाबा, मुले चिंता करत असतील. त्यांना घरी फोन करून सांगितले पाहिजे. आता माया सुखरूप आहे मग सांगायला काहीच अडचण नाहीये.
अर्जुन घरी फोन करून "माया नदीत पडली होती असे सांगतो आणि आता ती सुखरूप आहे हेही सांगतो." माया सुखरूप आहे कळले तरी घरी सर्वजण तिची काळजी करत होते.

थोड्यावेळाने नर्स बाहेर येऊन सांगतात की मायाला शुद्ध आली आहे. अर्जुन आतमध्ये जायला लागतो. पण भोसले साहेब त्याला अडवतात.

"अर्जुन, अगोदर मी मायासोबत बोलणार. मला जाणून घ्यायचे आहे की खरे काय आहे? नाही, मी पोलिस कारवाई नाही करत. पण मी मायाला लहान बहिणीसारखी मानतो. तीही न चुकता रक्षाबंधनाला मला पहिली राखी बांधते. त्यामुळेच मला तिच्या आयुष्यात नक्की काय चालू आहे? हे जाणून घ्यायचे आहे." असे बोलून भोसले आतमध्ये जातात.

अर्जुन मात्र बाहेर विचार करत होता की माया, भोसले साहेबांना काय सांगते...?

क्रमशः
0

🎭 Series Post

View all