"बाप : मायेची ढाल" भाग - ५
अर्जुनला मायाचे सत्य कळले होते. दुकानातील खुर्चीवर अर्जुन बसला होता, पण त्याचे मन कुठेतरी खोल दरीत कोसळले होते. कुठूनतरी काहीतरी व्हावे आणि याक्षणी मृत्यू यावा असे त्याला वाटत होते.
हॉटेलमधले ते दृश्य... विक्रमाच्या मिठीत असहाय्यपणे उभी असलेली माया... आणि तिचे ते गयावया करणे... हे सर्व अजूनही अर्जुनला एक वाईट स्वप्नासारखे वाटत होते. कोणीतरी येईल, मला उठवेल आणि माझे ते वाईट स्वप्न भंग होईल असे त्याला वाटत होते.
अर्जुनला अचानक दुकानातला प्रसंग आठवतो. जेव्हा मायाने त्याला एक प्रश्न विचारला होता - "पुस्तकातल्या नायिकेच्या हातून एक चूक झाली असेल, तिला फसवले गेले असेल, तर नायकाने तिला माफ करावे का?"
तेव्हा अर्जुनाला समजले नव्हते पण आता त्याच्या लक्षात येते. ती कोणतीही काल्पनिक कथा नव्हती. तर त्याच्या स्वतःच्या खऱ्या आयुष्यातला प्रसंग होता. यावरून त्याच्या हेही लक्षात येते की माया त्याला सर्व सत्य सांगण्याच प्रयत्न करत आहे.
रात्री झाली होती. गडद अंधार पडला होता पण त्यापेक्षा जास्त अंधार अर्जुनच्या आयुष्यात पडला होता. अर्जुनला घरी जाण्याची इच्छा नव्हती, पण जाणं भाग होतं. त्याने दुकान बंद केले आणि जड अंतःकरणाने घरी निघाला.
अर्जुन घरी आला. घरात नेहमीसारखीच शांतता होती, पण आज ती शांतता त्याला खायला उठली होती. माया सोफ्यावर बसून भाजी निवडत होती. अर्जुनला बघताच तिने एक खोटं हसू चेहऱ्यावर आणण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
"आलात...!" माया अर्जुन सोबत बोलण्याचा प्रयत्न करते पण अर्जुनने तिच्याकडे बघितले नाही. त्याने चप्पल काढली, बॅग सोफ्यावर ठेवली आणि कोणाशीही न बोलता सरळ बेडरूममध्ये निघून गेला.
जो अर्जुन नेहमी घरी आल्यावर मुलांशी मस्ती करायचा, आई-बाबांना हाक मारायचा, सर्वांशी हसायचा. आज तो असा का वागला? असा प्रश्न मायाच्या मनात आला.
माया उठली आणि बेडरूममध्ये गेली.
माया उठली आणि बेडरूममध्ये गेली.
"अहो? काय झालंय? डोकं दुखतंय का? मी चहा टाकू का?" मायाने प्रेमाने अर्जुनला विचारले.
अर्जुन पाठमोरा उभा होता. त्याने मायाला काहीच उत्तर दिले नाही आणि सरळ बाथरूममध्ये गेला.
मायाला जाणवले की नक्कीच काहीतरी भयंकर झाले आहे. नाहीतर अर्जुन असे वागणार नाही. लग्नाच्या इतक्या वर्षात कितीही वाद झाले असतील तरीही अर्जुनने मायाला असे कधीच टाळले नाही.
जेवणाची वेळ झाली होती. सर्वजण जेवणासाठी बसले होते पण अर्जुन नव्हता.
"माया, अर्जुन जेवायला आला नाही." सासूबाई मायाला विचारतात.
"मी बोलावते त्यांना." असे बोलून माया अर्जुनाला बोलावण्यासाठी जाते.
अर्जुन खिडकीत उभा राहून एकटक बाहेर बघत होता. बाहेरच्या अंधारात स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करत होता.
"अहो, चला जेवायला. मुलं, आईबाबा वाट बघताय." माया अर्जुनला बोलते.
अर्जुन मायाकडे बघतो. त्याच्या नजरेत एक रिकामेपण होते.
"मला भूक नाहीये. तुम्ही जेवून घ्या." त्याचा आवाज कोरडा होता.
"असं काय करताय? आल्यापासून एकदम शांत आहात. आता जेवायचे नाही बोलतात. तब्येत बरी नाहीये का?" माया पुढे होऊन अर्जुनच्या कपाळाला हात लावण्याचा प्रयत्न करते.
अर्जुनने झटकन डोके मागे घेतले. "मी सांगितले ना एकदा मला भूक नाहीये! मला एकटं सोडा!" अर्जुन मोठ्या आवाजात बोलला.
मायाच्या आता खात्री झाली होती की नक्कीच काहीतरी गंभीर आहे. माया बेडरूम मधून बाहेर जाते.
"काय झालं? अर्जुन नाही आला का?" सासूबाईंनी विचारले.
"आई, त्यांना फार भूक नाहीये. ते थोड्यावेळाने जेवणार आहे. मीही त्यांच्यासोबतच जेवण करील." माया खोटे बोलत आहे हे लगेच साविती ( सासूबाई ) आणि गजानन ( सासरे ) यांच्या लक्षात येते.
दोघेही एकमेकांकडे बघतात. त्यांना वाटते नवरा-बायकोमध्ये काहीतरी एखादा छोटासा वाद झाला असेल म्हणून तेही जास्त काही विचारत नाही.
जेवण आटोपल्यावर माया सर्व इतर कामं आटपून घेते आणि झोपायला जाते. अर्जुन एका कुशीवर झोपला होता किंवा तसं नाटक करत होता. अर्जुनचे डोळे मिटलेले होते पण कान उघडे होते.
अर्जुनने ठरवले होते, "मी मायाला काहीच विचारणार नाही. जर तिचं माझ्यावर प्रेम असेल, आणि जर तिला पश्चताप झाला असेल, तर ती स्वतःहून बोलेल."
मायाही झोपण्याचा तयारीत होती. पण तेवढ्यात तिला विक्रमचा संदेश येतो.
"उद्या माझ्या फार्महाऊसवर ये."
"मला जमणार नाही."
"तुला यावेच लागेल. मला आता कोणतेही कारण नको."
"मला उद्या दुसरे काम आहे."
"ते सर्व बाजूला ठेव. मी तुला आज शेवटची संधी दिली होती. उद्या दुपारी चार वाजेपर्यंत आली नाही तर आपले सर्व फोटो तुझ्या नवऱ्यापर्यंत पोहचतील."
मायाला स्वतःचीच घृणा वाटू लागली. विक्रम तिला खेळणं समजायला लागला होता. आज कशीबशी सुटली होती. पण उद्या? उद्या फार्महाऊसवर काय करणार? कशी सुटणार? याचा विचार माया करत होती.
तिने एक नजर अर्जुनवर टाकली. अर्जुन शांत झोपला आहे. ( तिला वाटले ) "हा माणूस किती निष्पाप, स्वच्छ प्रेम माझ्यावर करतो आणि मी..."
विक्रमचे आता अती चालले होते. पाणी डोक्यावरून चालले होते. माया ठरवते की, "अर्जुनला ती सर्व सत्य सांगून टाकेल." तिच्या डोळ्यांत पक्का निश्चय होता.
"अर्जुन सोबत पुन्हा पतारणा करण्यापेक्षा त्यांनी मला सोडले तरी चालेल. घराबाहेर काढले, मारले किंवा जी शिक्षा देतील ती मी भोगायला तयार आहे. पण मी मात्र यांना सत्य सांगेल." असा दृढनिश्चय माया करते आणि झोपून घेते.
अर्ध्या रात्री मायाला तहान लागते म्हणून ती उठते. अर्जुन तिला बाजूला झोपलेला दिसत नाही. माया बेडवरून खाली उतरते. तोच तिला बाथरूम मधून रडण्याचा बारीक आवाज आला.
माया बाथरूमच्या दरवाजाजवळ जाते. आतून अर्जुनच्या रडण्याचा आवाज येत होता. माया दरवाजावर थाप मारायला जाते पण ती स्वतःला थांबवते.
"माया तू का अशी वागली?"
"माया मी तुझ्यावर प्रेम करण्यात, तुला सुख देण्यात कमी पडलो का?
"का तू त्या विक्रमकडे गेली?"
"देवा... मला मरण दे..."
"माया मी तुझ्यावर प्रेम करण्यात, तुला सुख देण्यात कमी पडलो का?
"का तू त्या विक्रमकडे गेली?"
"देवा... मला मरण दे..."
असे हलकेसे बोलणे माया ऐकते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिची तहानही आता पळून जाते. माया दरवाजावर थाप मारायला जाते पण यावेळेस मात्र तिची हिंमत होत नाही.
माया तशीच बेडवर जाऊन पडून घेते. माया थरथरत होती. तिचे डोळे छताकडे होते. त्या छतावर तिला तिचा विस्कटलेला संसार दिसत होता.
"अर्जुनला अगोदरच सर्व माहिती आहे. ते माझ्याबद्दल आता काय विचार करत असतील" या विचाराने माया चक्रावून जाते.
"स्नेहा आता मोठी होत आहे. तिलाही आता काही गोष्टी कळायला लागल्या आहे. ती माझ्याबद्दल काय विचार करेल?"
"आई-बाबा माझ्याबद्दल काय विचार करतील?"
असे प्रश्न मायाला भंडावून सोडत होते.
सकाळ झाली होती. घरात तणावपूर्ण वातावरण होते. अर्जुन अंघोळ करून घेतो. आणि बाहेर सोप्यावर येऊन बसतो. त्याला माया बाहेर दिसत नाही. त्याला वाटते बहुतेक स्वयंपाक घरात असेल.
"अर्जुन, रात्री जेवला का नाहीरे?" साविती अर्जुनला विचारते.
"आई, भूक नव्हती मला."
"माझ्याशी खोटं बोलतोय. तू कितीही मोठा झाला असला तरी तुझा फक्त चेहरा बघून सांगू शकते की तुझ्या मनात काहीतरी चालू आहे. तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी तुला."
"आई, खरंच काही नाही झाले."
"मग रात्री आमच्याशी बोलला नाही, मुलांशी बोलला नाही. खोलीत गेला तर परत आलापण नाही. हे का?"
"आई ते माझं जरा डोकं दुखत होतं."
"तू अजूनही खोटंच बोलत आहे."
सावित्री अर्जुनला प्रश्न विचारत होती. पण अर्जुन काहीही सांगू शकत नव्हता. अर्जुन शांत बसलेला होता.
"तुझ्यात आणि मायात काही झाले का?"
"नाही आई, तसे काहीच नाहीये." अर्जुन एकदम गडबडून जातो.
"आम्हाला कळत नाही असे समजू नका. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या दोघांच्याही वागण्यात बराचसा बदल झाला आहे."
अर्जुनला माहीत होते, तो आईच्या जास्त प्रश्नांना उत्तर नाही देऊ शकत. म्हणून तो "आई मला दुकानात जायला उशीर होत आहे." असे बोलून चालू पडतो.
"माया, अजून उठली का नाही?"
सावित्री असे बोलताच अर्जुनचे पाय दरवाजातच थांबतात.
"माया, उठली नाही म्हणजे?" ती आमच्या खोलीत नाहीये. अर्जुन बोलतो.
"अर्जुन काय बोलतोय तू? माया स्वयंपाक घरातपण नाहीये. आम्हाला वाटले झोपली असेल. म्हणून आम्हीपण बघायला आलो नाही." सावित्री बोलतो.
अर्जुन मायाला संपूर्ण घरात बघतो. माया घरात कुठेच नसते. अर्जुनला वाटते माया विक्रमला भेटायला गेली असेल म्हणून तो रागाच्या भरात घरच्या बाहेर पडतो...
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा