बालिका वधू- विवाहाचा कच्चा धागा..
भाग:-२
सावी एका छोट्याशा गावात राहणारी मुलगी हसरी, बडबडी. पाचवी इयत्तेत शिकणारी. आईवडिलांची एकुलती एक, मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली, आईवडिलांची लाडकी.
एक दिवस त्यांच्याच नात्यातील व त्यांच्या शेजारच्या गावी राहणारे सदाशिवराव माने जे की तिच्या बाबांचे मित्र होते. ते खूप दिवसांनी त्यांच्या घरी आले होते.
सावी नुकतीच शाळेतून “आईऽऽ” अशी ओरडतच घरात आली; पण समोर अनोळखी सदाशिवरावांना पाहून जागीच थांबली.
तेवढ्यात तिची आई स्वयंपाक घरातून बाहेर आली. राजारामने तिला खुणेने जवळ बोलावले. तो पर्यंत सदाशिवराव तिलाच पाहत होते.
“राजा, ही आपली छकुली ना रे. किती मोठी झाली रे ! छान ही दिसतेय अगदी बाहुलीसारखी ! ए छकुली, चल ये, बरं माझ्याजवळ ये.” ते राजारामला तिच्याकडे पाहत तिला जवळ बोलावत म्हणाले.
तसं राजाराम सावीला त्यांच्याजवळ जायला सांगितले. त्यांनी तिला जवळ घेत सदाकडे पाहून ते म्हणाले,“राजा, मुलं कधी मोठी होतात ते कळतच नाही बघ."
" हो ना. सावी, हे सदाशिवराव, तुझे मामा आणि माझे मित्र पण.” राजारामने त्यांची ओळख करून देताच तिने पटकन त्यांना वाकून नमस्कार केला.
“अरे, बेटा, हे काय करतेस?” त्यांनी लगेच तिचे खांदे धरत तिला उठवत म्हणाले.
सावी लगेच हसून म्हणाली, “अहो, मामा, आईबाबांनी सांगितले की मोठ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घ्यायचा असतो. ते मी करत होते.”
“अरे वा ! खूपच छान संस्कार केलेत त्यांनी. सुखी राहा, बाळा.” असे म्हणत सदाशिवराव तिच्या डोक्यावर हसत हात ठेवले.
तिला पाहिल्यावर त्यांच्या मनात एक विचार आला. मनाशीच काहीतरी ठरवून ते पाहुणचार घेऊन आपल्या घरी गेले.
जाताना ते सावीकडे पाहत 'मी पुन्हा येईन, आता तर यावंच लागेल मला'मनात म्हणत स्मित करत निघून गेले. राजाराम मात्र गोंधळून गेले.
काही दिवसांनी पुन्हा सदाशिवराव राजारामच्या घरी आले.
आदरातिथ्य झाल्यावर राजारामने त्यांना विचारले,“अरे, सदा, असं अचानक कसं काय येणं केलंस?”
सदाशिवराव म्हणाले, “अरे, तुझ्याकडे खूप महत्त्वाच काम आहे. मला तुझ्याकडून तुझी अमूल्य ठेव पाहिजे. सांग देशील ना?”
राजाराम म्हणाले, “मी पडलो गरीब बापडा, माझ्याकडे असे आहेच काय जे मी तुला देऊ शकेन?”
“आहे खूपच मौल्यवान, तुझी सावी !” सदा म्हणाले.
“काय.. काय बोलतोस तू?” राजाराम आश्चर्याने म्हणाले.
“तू जे ऐकलेस, तेच म्हणालो मी.” सदाशिव हसत म्हणाले.
“अरे,पण..तू कुठे अन् मी कुठे?” राजारामला विश्वास बसला नाही तेव्हा त्यांनी विचारले.
“राजा, त्या दिवशी सावीला पाहिली आणि हिच माझ्या घराची लक्ष्मी बनेल असं मला मनापासून वाटलं, नाही म्हणू नकोस रे, माझ्या प्रशांतसाठी तुझ्या छकुलीला मागतोय. ताई, तुम्ही तरी सांगा ना.”
सावीच्या आईकडे बघत सदाशिव विणवनीच्या सुरात म्हणाले.
सावीच्या आईकडे बघत सदाशिव विणवनीच्या सुरात म्हणाले.
सावीच्या आईने राजारामकडे पाहिले.
थोडा विचार करून राजाराम म्हणाले, "आम्हाला थोडा वेळ दे. विचार करून कळवतो तुला."
"बरं, ठीक आहे." असे म्हणत ते प्रशांतचा फोटो त्यांच्या हातात दिला आणि निघून गेले.
सावीचे आईवडील विचार करतात की स्थळ चांगलं आहे. मुलगा, माणसं ओळखीची आहेत. आर्थिक सुबत्ता ही चांगली आहे. असंही गावाकडे लवकर लग्न करतात. खरं तर आपल्या पोरीन नशीब काढलं, तिला इतकं चांगल घर मिळतयं. हा विचार करून ते तिकडे होकार कळवला.
दोन्ही परिवाराकडून बोलणं झालं आणि लग्नाचा घाट घातला. जे वय खेळण्याचं, बागडण्याचं होत, त्याच वयात सावी आणि प्रशांत विवाह बंधनात बांधले गेले.
खरं तर विवाह/ लग्न याचा अर्थ ही त्यांना माहिती नाही. तरीही ते त्यांची लग्नगाठ बांधली गेली. दोघेही नाबालिक, त्यांना कसलीच समज नव्हती. मग कसं होणार पुढे?
क्रमशः
काय झालं पुढे? वाचा पुढील भागात..
©️ जयश्री शिंदे
