Login

बालिका वधू- विवाहाचा कच्चा धागा..(भाग -५ अंतिम)

बालविवाह झालेल्या सावीची कथा..

बालिका वधू - विवाहाचा कच्चा धागा..

भाग:-५ (अंतिम)

इकडे तर सदाशिवरावांना नंतर कळले की प्रशांतने तिकडे जाऊन काय तमाशा केलाय तो. ते तडक शहरात त्याला जाब विचारला त्याच्या घरी गेले तर तिथे त्याच्या घरी एका मुलीला पाहून कळून चुकलं की प्रशांत असा का वागला? ते खूपच भडकले आणि त्याच्यासोबतचे सगळे संबंध त्यांनी तोडून टाकले. संपत्तीही काही मिळणार नाही हे देखील निःक्षून सांगितले आणि तावातावाने ते गावी निघून आले.

पण त्यांच्या अशा वागण्याबोलण्याने प्रशांतचा पुरूषी अहंकार दुखावला. 'हे सगळं त्या सावीमुळे होतेय आता तर तिला भर पंचासमोर बेइज्जत करीन. तेव्हाच मला समाधान मिळलं', असं त्याने मनात ठरवलं.

सदाशिवराव मात्र आपल्याचं मुलाच्या वागण्याचं वाईट वाटलं. 'एका हसत्या खेळत्या मुलीचं आयुष्य आपल्या एका निर्णयाने चुकला. आपलच नाणं खोटं ठरलं. सावी आणि राजासमोर कोणतं तोंड घेऊन जाऊ. मला स्वतःचीच लाज वाटतेय.' असे मनात बोलून ते स्वतःलाच कोसू लागले. सावीच्या दुःखाला आपणच कारणीभूत आहोत हे शल्य त्यांना सतत टोचत राहिलं आणि याच कारणाने त्यांनी अंथरूण धरलं.

नंतर पंचासमोर प्रशांतने खोटे पुरावे सादर केले. पुन्हा एकदा त्याने नाही नाही ते आरोप केले. खूप वादविवाद झाले. पंचाचा निर्णय ही ऐकायला तो थांबला नाही. तो निघून गेला.

आज सावीसमोर त्या सर्व घटना पुन्हा एकदा एखाद्या चित्रपटाप्रमाणे तरळून गेल्या. तिने मनाशी काही तरी ठरवलं आणि रूम बाहेर आली.

तिच्या आईबाबांना ती म्हणाली, "आई-बाबा, मी एक निर्णय घेतलाय. त्यांना नको आहे ना मी. मग पुन्हा पुन्हा त्यांना समजावण्यात काहीच अर्थ नाही. खूप झाली माझ्यावर चिखलफेक. त्यांना घटस्फोट देऊन मोकळी करते. जे व्हायचं ते झालं. मी कोणालाही दोष देत नाही. तुम्हीही मनातून सर्व काढून टाका. मी नव्याने आयुष्य जगायच ठरवलं आहे आणि अर्धवट राहिलेले शिक्षणही पूर्ण करेन." सावी खंबीरपणे आणि ठाम निर्णयाने म्हणाली.

"बेटा, आता तू जे म्हणशील तेच होईल. आम्ही आता पर्यंत तुझ्या आयुष्याचे निर्णय घेतले जे की चूकीचे ठरले, आम्हाला माफ कर, बेटा.  तुझा बालविवाह करून आम्ही खूप मोठी चूक केली."राजाराम आणि सावीची आई दोघेही हात जोडून म्हणाले.

डोळ्यांतील अश्रूतर थांबायचं नाव घेत नव्हते. सावी पटकन पुढे होऊन त्यांचे डोळे पुसले आणि त्यांचे हात हातात घेत म्हणाली," नाही बाबा, असे हात जोडू नका. हे हात कायम डोक्यावर आणि पाठीवर असू द्या. जे झालं ते झालं. मागचं आठवून उगाळून बसण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे आपल्यालाच त्रास होईल. ते गेलेत ना त्यांच्या आयुष्यात पुढे मग मीही पुढे जाईन. माझी कोणती ही तक्रार नाही. तुम्ही मला साथ द्याल ना."

"बघितलं का, सुमन? आपली सावू किती समजूतदार झाली ते. बेटा, आम्ही नेहमीच तुझ्या सोबत आहोत." राजाराम हसतं तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले.

तशी ती "बाबा" म्हणून त्यांच्या कुशीत शिरली.

आपल्या लेकीच्या समजूतदारीने सावीच्या आईचे डोळे वाहत होते.

काही दिवसांनी सावी आणि प्रशांत यांचा घटस्फोट झाला.

प्रशांतचे आईबाबांही सावीची माफी मागितली. तिनेही मोठ्या मनाने त्यांना माफ केले.

दिवसामागून दिवस निघून गेले. मागे वळून न पाहता सावीने तिचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण केले. पदवीधर होऊन बी एड केले आणि गावातील एका शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करू लागली. त्याच बरोबर समाजात बालविवाह होऊ नये म्हणून समोपदेश करू लागली. अंधश्रद्धा निर्मूलनावर ही संदेश देऊ लागली. या सर्वात तिला तिच्या आईबाबांनी नेहमीच तिची साथ दिली. आता गावकरीही तिला साथ देत होते. नंतर तर ती सरपंचही बनली. गावाच्या विकासासाठी नेहमी झटत राहिली.

समाप्त-

बालविवाह या अनिष्ट प्रथेने सावीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले ; पण ती वेळीच सावरली आणि पुन्हा नव्याने उभी राहिली.

आता बालविवाहाला कायद्याने बंदी घातली आहे. पण तरीही काही गावात आजही बालविवाह होतात. असे कित्येक सावी आणि प्रशांत यांचे बळी जातात. मग याला जबाबदार कोण? आपला समाज की प्रथा की आईवडील! 

ज्या वयात मुलांमुलीना लग्न म्हणजे काय हे नाही कळत, किंबहुना ते कसे निभावतात हेही कळत नाही. मग त्या वयात विवाह बंधनात बांधणे कितपत योग्य आहे? विचार करण्याची गोष्ट आहे.

©️ जयश्री शिंदे

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →